चीनला सूचक इशारा अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दलाई लामांच्या प्रतिनिधीची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2021
Total Views |

dalali lama_1  

नवी दिल्ली : भारत दौर्‍यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अ‍ॅन्टोनी ब्लिंकन यांनी बुधवार, दि. २८ जुलै रोजी दलाई लामा यांचे प्रतिनिधी नगोदूप डोंगचंग यांची भेट घेतली. त्यामुळे तिबेटविषयी अमेरिकेची भूमिका काय असेल, याविषयी सूचक इशाराच यानिमित्ताने ब्लिंकन यांनी चीनला दिला आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अ‍ॅन्टोनी ब्लिंकन हे सध्या भारत दौर्‍यावर आहेत. त्यांनी बुधवारी सकाळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. त्यापूर्वी त्यांनी सिव्हील सोसायटीशी संबंधित काही व्यक्तींची भेट घेतली. यामध्ये दलाई लामा यांचे प्रतिनिधी नगोदूप डोंगचंग यांचाही समावेश होता.
तिबेट आणि दलाई लामा हे दोन्ही मुद्दे चीनसाठी अडचणीचे आहेत. तिबेटवर चीन आपला हक्क सांगत असला तरीदेखील दलाई लामा आणि त्यांचे अनुयायी भारतात राहून चीनच्या विस्तारवादास आव्हान देत आहेत. त्यामुळे दलाई लामा यांच्या प्रतिनिधीची भेट घेऊन तिबेटविषयी अमेरिकेचे धोरण बदलत आहे, असा स्पष्ट इशाराच ब्लिंकन यांनी यानिमित्ताने दिला आहे. भेटीविषयी  चीनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नसली, तरी चीनला हा घाव वर्मी बसला आहे, यात कोणतीही शंका नाही.
 
भारत अमेरिकेचा महत्त्वाचा सहकारी, अफगाणिस्तानात शांतता गरजेची : ब्लिंकन
 
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अ‍ॅन्टोनी ब्लिंकन यांनी बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेस संबोधित केले. भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सहकारी असून कोरोना काळात भारताने केलेल्या मदतीविषयी कृतज्ञ असल्याचे ब्लिंकन यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, “अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानातून माघारी जात असले तरीदेखील अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी भारत आणि अमेरिका सहकार्याने काम करीत आहे.

तालिबान सध्या आंतरराष्ट्रीय पाठिंबा प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी तालिबानला रोखणे गरजेचे आहे,” असे ब्लिंकन म्हणाले. “त्याचप्रमाणे ‘क्वाड सहकार्य गट’ हा लष्करी गट नसून प्रादेशिक सहकार्यासाठी कार्यरत असणारा समूह आहे. त्याचप्रमाणे हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातही भारतासोबत सहकार्य असल्याचे ब्लिंकन म्हणाले. अफगाणिस्तान हा भारताचा शेजारी देश असून तेथे शांतता प्रस्थापित होणे, भारतासाठी महत्त्वाचे असल्याचे जयशंकर यांनी सांगितले. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचे संबंध आता वेगळ्या उंचीवर पोहोचले असून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही देश तोडगा काढू शकतात,” असेही जयशंकर यांनी नमूद केले.





@@AUTHORINFO_V1@@