कोरोनाचा 'केरळ पॅटर्न' फोल : केंद्रीय पथक रवाना

29 Jul 2021 17:39:57

Keral _1  H x W


नवी दिल्ली : केरळमध्ये भयावह वेगाने होत असलेल्या करोना रुग्णवाढीवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने उच्चस्तरीय पथक पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. केरळमध्ये वेगाने वाढत असलेल्या करोना रूग्णावाढीमुळे देशासमोरील चिंता वाढली आहे. त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यात उच्चस्तरीय पथक पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
 
पथकाचे नेतृत्व राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे (एनसीडीसी) संचालक डॉ. एस. के. सिंग करणार आहेत. हे पथक आज केरळमध्ये दाखल होणार असून तेथील करोना संसर्गाची मोठी संख्या असलेल्या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या आरोग्य विभागास मार्गदर्शन करण्याचे काम केंद्रीय पथक करणार आहे.
 
 
केरळमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १.५४ लाख असून देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी ती संख्या ३१.७ टक्के आहे. राज्यात गेल्या सात दिवसात १.४१ टक्के दराने रुग्णवाढ झाली आहे, दररोज सरासरी १७,४४३ पेक्षा अधिक रुग्णवाढ होत आहे. राज्यातील पॉझिटीव्हिटी दरही वाढून १२.९३ झाला असून साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर ११.९७ टक्के आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पॉझिटीव्हिटी दर १० टक्क्यांहूनही अधिक आहे.
 
 
देशात गेल्या २४ तासात ४३,५०९ नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. सलग ३२ दिवस ५०,००० पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या आज ४,०३,८४० आहे आणि देशातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या ती १.२८% इतकी आहे. चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ करीत, देशभरात गेल्या २४ तासात १७,२८,७९५ चाचण्या करण्यात आल्या.
 
 
आतापर्यंत भारताने ४६ कोटींपेक्षा अधिक (४६,२६,२९,७७३) चाचण्या केल्या आहेत. एकीकडे देशभरात चाचणी क्षमतेत वाढ करण्यात आली आहे, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या २.३८% आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर आज २.५२% आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सलग ५२ व्या दिवशी ५% पेक्षा कमी आहे.
 
 
सर्व स्रोतांच्या माध्यमातून केंद्र सरकारने आतापर्यंत ४७.४८ कोटींपेक्षा जास्त (४७,४८,७७,४९०) लसींच्या मात्रा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना पुरविल्या आहेत आणि आणखी ५३,०५,२६० मात्रा पुरवठ्याच्या मार्गावर आहेत. वाया गेलेल्या मात्रांसह एकूण ४४,७४,९७,२४० मात्रा देण्यात आल्या आहेत. याशिवाय लसीच्या २.८८ कोटीपेक्षा जास्त (२,८८,५५,०५०) शिल्लक आणि न वापरलेल्या मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत.


Powered By Sangraha 9.0