देशातील ५० टक्क्यांहून जास्त रुग्ण केरळमध्येच; पिनाराई विजयन सरकारचे अपयश ठळक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2021
Total Views |

PINRAYI_1  H x
नवी दिल्ली : कोरोना व्यवस्थापनाचा आदर्श नमुना म्हणून गाजविण्यात आलेल्या ‘केरळ मॉडेल’चा फोलपणा आता उघड होऊ लागला आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४३ हजार, ६५४ नवे रुग्ण आढळले, त्यापैकी तब्बल २२ हजार, १२९ म्हणजेच ५० टक्क्यांहून अधिक रूग्ण हे एकट्या केरळ राज्यातील आहेत. त्यामुळे देशात तिसर्‍या लाटेची सुरूवात केरळमधून होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
 
कोरोना व्यवस्थापनामध्ये केरळ राज्याने अभूतपूर्व कामगिरी केल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, केरळमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये होणारी भयावह रूग्णवाढ पाहता कथित ‘केरळ मॉडेल’ हा पूर्णपणे फोलपणा असल्याचे उघडकीस येत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे ४३ हजार, ६५४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक म्हणजे २२ हजार, १२९ रूग्ण हे एकट्या केरळ राज्यातील आहेत. गेल्या ५१ दिवसांत प्रथमच एखाद्या राज्यात २० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता त्याची सुरूवात केरळमधून होण्याची शंका आता व्यक्त करण्यात येत आहे.
 
धक्कादायक म्हणजे राज्यात एका दिवसात १५६ रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. आतापर्यंत केरळमध्ये १६ हजार, ३२६ रूग्णांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये १,१६५ आरोग्य कर्मचार्‍यांचा समावेश आहे. सध्या केरळमध्ये १ लाख, ४५ हजार, ३१७ सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये दोन हजारांहून अधिक कोरोना रूग्ण आढळले आहेत. सर्वाधिक ४ हजार, ३७ रुग्ण मलप्पुरम येथे, थ्रिसूरमध्ये २ हजार, ६२३, कोझिकोडे २ हजार, ३९७, एर्नाकुलममध्ये २ हजार, ३५२ आणि पलक्कड जिल्ह्यात २ हजार, ११५ रुग्ण आहेत.
केरळमध्ये सातत्याने रुग्णवाढ होत असतानाही डाव्या आघाडीचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी बकरी ईद साजरी करण्यासाठी राज्यात तीन दिवसांसाठी कोरोनाविषयक निर्बंधांमधून सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यास निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असता राज्यातील व्यापार्‍यांच्या दबावाखाली येऊन सवलत दिल्याचे केरळ सरकारने न्यायालयास सांगितले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयानेदेखील तीव्र नाराजी व्यक्त करून केरळ सरकारला झापले होते.
उत्तर प्रदेशात २४ तासांत केवळ १८ रूग्ण
कोरोना व्यवस्थापनासाठी केरळचे कौतुक करताना उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य करण्यात येत होते. मात्र, उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासांमध्ये केवळ १८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात सध्या ७९८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत ६ कोटी, ४५ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उ. प्र. प्रशासनाने चाचण्या, उपचार आणि लसीकरणासाठी आक्रमक धोरण अवलंबविल्यानेच उत्तर प्रदेशात कोरोना संसर्ग नियंत्रणात आला आहे.‘केरळ मॉडेल’मुळे ‘कोरोना’च्या तिसर्‍या लाटेची शक्यता?



 
 
@@AUTHORINFO_V1@@