
आधी पंचनामे, नंतरच मदतीबाबत अंतिम निर्णय
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
मुंबई : राज्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे.राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवार, दि. २८ जुलै रोजी झालेल्या बैठकीत पूरग्रस्त भागातील नुकसानभरपाईबाबत महाविकास आघाडी सरकार निर्णय घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, या बैठकीत आर्थिक मदतीबाबत चर्चा तर झाली. मात्र, अद्याप नुकसानभरपाईचे नेमके आकडे समोर न आल्याने अंतिम निर्णय होऊ शकला नाही. “सध्या तत्काळ मदत म्हणून पूरग्रस्तांना दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत,” अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली.
“एनडीआरएफ’च्या निकषानुसारच सध्या तात्पुरती मदत दिली जाणार आहे. घरांचे नुकसान आणखी काही नुकसान झाले असेल, त्यांना सध्या तत्काळ मदत म्हणून दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. पंचनामे पूर्ण होऊन सर्व आकडेवारी हातात आल्यावरच अधिकची मदत जाहीर करण्यात येईल.” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मात्र, पूरग्रस्तांना मदत देण्यात इतका विलंब का, असा प्रश्न विरोधकांनी राज्य सरकारला केला आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्यात विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे नैसर्गिक आपत्ती आली आहे.
पूरग्रस्त भागातील बहुतांश ठिकाणी अद्याप पाणी ओसरले नसल्याने व बाधितांचे पंचनामे सुरू असल्याने पुढील १५ दिवसांत वाढीव मदतीबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीसमोर आणावा, असे मंत्रिमंडळ बैठकीत ठरले. सध्या बाधित कुटुंबांना त्यांच्या घरातील साहित्य, कपडे, भांडी यांच्या नुकसानीसाठी ‘एसडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे तत्काळ मदत करणे सुरू आहे, अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीनंतर देण्यात आली.
}