वैदिक परंपरा आणि साधना (भाग-४)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2021
Total Views |

Vedic_1  H x W:
 
 
 
नाद हा आकाशतत्त्वाचा गुण मानल्यामुळे आकाशतत्त्वाचे साधक नादाची उपासना करतात. उदा. ‘ॐ’ कार उपासना किंवा नामसंकीर्तन साधना. हे नामसंकीर्तन आकाशतत्त्वाच्याच देवतांचे करण्यात येते.
 
 
काही साधकांचा पिंड निराकारी असतो, म्हणजे त्यांच्या मनाची रचना अशी की, तिला साकार दर्शनाची रूची नसते. असे श्रेष्ठ साधक संपूर्ण विश्व एकप्रकारच्या सजीव अशा नीलिमेने भरलेले पाहून धन्य होतात. परंतु, अशी अवस्था सामान्य साधकाला असाहाय्य वाटते. साधारणतः मनाची रचनाच अशी आहे की, तिला आकाराशिवाय कशाचीच कल्पना करवत नाही. मन म्हणजे अनेक संस्कारांचा ठेवा. म्हणून मन आपल्या पूर्वसंस्कारानुसार दृष्टमान किंवा अनुभूत अशा अवस्थेत काहीना काहीतरी आकार देते. मन आहे म्हणून आकार आहे. मन लुप्त झाल्यास आकाराचीही अस्मिता नाही. ९९.९ टक्के लोक ’साकार पिंडी’ असतात म्हणून सर्वसाधारण लोकांकरिता साकार दर्शनच सुसाध्य व क्रमप्राप्त आहे. काही संप्रदायांमध्ये साकार दर्शन किंवा मूर्तिपूजा मानत नाहीत. परंतु, अशा निराकार संप्रदायांमध्ये कालौघात अशा काही परंपरा घुसल्या आहेत की ज्या मूर्तिपूजन किंवा साकार दर्शन याहूनही कनिष्ठ दर्जाच्या आहेत. उदाहरणार्थ पीरपूजा, कबरपूजा. स्वतःच्या पूजा स्थानाचे विलक्षण वेड व अन्य सांप्रदायिकांच्या पूजास्थानाबद्दल कमालीचा अनादर, अशा संप्रदायांमध्ये भूतप्रेतपिशाच्च यांची पूजा मूर्तिप्रमाणेच करतात. शेवटी मूर्ती म्हणजे तरी काय? तर प्रतिमा प्रति + आत्मा म्हणजेच प्रतिमा. आपल्या आत्म्याचे प्रतिबिंब समोरच्या वस्तूत कल्पिले जाते. म्हणजे आत्म्याची प्रतिष्ठापना समोरील वस्तूत केली जाते. म्हणून वैदिक परंपरेत प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते, केवळ मूर्तिपूजन नव्हे. म्हणजे प्रतिमा पूजन हा साधकाच्या प्राणांचा व्यवहार तरी आहे. पण प्रेत, पिशाच्च, पीर, कबर यांची पूजा म्हणजे स्वतःची प्राणशक्ती सोडून अन्य मृत व्यक्तींच्या प्राणशक्तींचे पूजन आहे. हा एक अशास्त्रीय तसेच मानव जातीच्या मन व बुद्धीला संभ्रमात टाकणारा प्रकार आहे, यात शंका नाही.
 
 
 
साकार पिंडी साधक आकाशतत्त्व दर्शनाच्या या अवस्थेमध्ये कोणत्यातरी साकार अवस्थेचा अनुभव घेतल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून त्याच्या मनाला आपोआप एखाद्या आकाराचा साक्षात्कार होतो. जसा संस्कार असेल तसा साक्षात्कार होईल म्हणून व्यक्तिमत्वाला संस्कारानुगामी साक्षात्कार होईल. वैदिक परंपरेच्या अखेरच्या काळात प्रतिमा पूजनाचा किंवा मूर्तिपूजनाचा प्रकार सुरू झाला. साकार दर्शनामध्ये भगवान श्रीविष्णू, श्रीराम व श्रीकृष्ण यांचे साकार दर्शन अत्युच्च प्रतिचे मानले जाते आणि हीसुद्धा लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की, या तिन्ही आकाशतत्त्वीय देवतांचा वर्ण नीलश्यामल आहे. देवता दर्शनाचेसुद्धा एक शास्त्र आहे. शास्त्रमान्य मार्ग सोडल्यास देवतेचे दर्शन किंवा साक्षात्कार होत नाही. आकाशतत्त्वाचा अनुभव हा अत्युच्च प्रकारचा अनुभव आहे. निराकार पिंडी साधकाला याचा अनुभव एका ज्वलंत, सजीव, सर्वव्यापी, सर्वस्थित व सर्वगामी नीलिमेच्या रुपाने होईल, तर साकार पिंडी साधकाला याचा अनुभव श्रीविष्णू, श्रीराम किंवा श्रीकृष्ण यांच्या दर्शन साक्षात्कारातून होईल. दर्शन साक्षात्कार कसा व कोणत्या क्रमाने होतो हे नंतर बघू.
 
 
नादमय ब्रह्म
 
 
आकाशतत्त्वाची ओळख त्याच्या नादगुणावरूनसुद्धा होऊ शकते. या गुणाला ‘तन्मात्रा’ असेसुद्धा म्हणतात. ज्यामुळे मोजता येते किंवा जाणता येते, त्याला ’तन्मात्रा’ म्हणतात. म्हणून नीलवर्ण आणि नादगुण यांना आकाशतत्त्वाच्या ’तन्मात्रा’ मानल्या जातात. नाद का ? तर ‘न + आद’ म्हणजे आदी अवस्थेव्यतिरिक्त जी अवस्था तो ‘नाद.’ नादालाच काही लोक ‘आवाज’ असे समजतात. पण, नाद म्हणजे आवाज नव्हे. ज्याला स्फुरण आदी वगैरे काही नाही, तो नाद होय. आकाशतत्त्वाच्या गुणाची अनुभूती जड घटकाद्वारे होते, जसे शब्द, ध्वनी किंवा आवाज, ‘ॐ’ सर्व नादांचा मूळ नाद मानला जातो. मांडुक्योपनिषदात ‘ॐ’ लाच ब्रह्म मानलेले आहे. ‘ब्रह्म ॐ’ - ‘ॐ ब्रह्म’ अशा प्रकारे जड अनुभवात मन रममाण होत असल्यामुळे काही साधकांना आकाशतत्त्व धारणेच्या वेळी सतत ‘ॐ’ नाद ऐकू येतो. या मूळ ‘ॐ’ अन्य छटा म्हणजे ‘हंसो’, ‘सोहं’ आणि ‘हरी ॐ’ आहेत. या शब्दांचा उच्चार करताना तोंड उघडावे लागते व शब्दोच्चार संपला की तोंड बंद होते. ‘ॐ’चा उच्चार करताना प्रथम मुख गोलाकार आकारात उघडावे लागते आणि शेवटी ‘म’ संपताना मुख आतील बाजूस बंद होते. ‘ॐ’चा उच्चार करताना मुखाला सर्व अवस्थांमधून जावे लागते. यातच ‘ॐ’ चे श्रेष्ठत्व आहे. आकाशतत्त्व देश, काल व वर्तमान यांनी सीमित नाही. कारण, ते सर्वठायी व सर्वकाळी आहे.
 
 
गतिमानतेमुळे स्थळ व काळ भिन्नतेचा भास होतो. यालाच विख्यात वैज्ञानिक आईनस्टाईन यांनी Time-Space-continuum असे म्हटले आहे. एक विमान नागपूरहून मुंबईला प्रयाण करते. कारण, ते त्यावेळी मुंबईत नसते. म्हणून निघण्याच्या वेळेला त्याचे स्थान नागपूर, तर पोहोचण्याच्या वेळेला मुंबई असेल. विमानाला नागपूरहून मुंबईला पोहोचण्यास त्याच्या वेगाच्या प्रमाणात वेळ लागेल. काळही वेगाचाच सोबती आहे. विमान जर मुंबईलाच असेल तर त्याला मुंबईला पोहोचावयास काहीच वेळ लागणार नाही. म्हणून त्या वायुयानाला वर्तमान, भूत किंवा भविष्य असे काहीच नाही. हीच अवस्था आकाशतत्त्वाची आहे. ते सर्वस्थित, सर्वव्यापी आणि सर्वगामी असल्यामुळे त्याला देश, काळ व वर्तमान या अवस्था नाहीत. त्याचे केवळ अस्तित्व आहे. पण ते कोठे, कसे व केव्हा याचे उत्तर ‘नेति नेति’ असे आहे.
 
 
नामसंकीर्तन
 
 
नाद हा आकाशतत्त्वाचा गुण मानल्यामुळे आकाशतत्त्वाचे साधक नादाची उपासना करतात. उदा. ‘ॐ’ कार उपासना किंवा नामसंकीर्तन साधना. हे नामसंकीर्तन आकाशतत्त्वाच्याच देवतांचे करण्यात येते. अन्य तत्त्वांच्या देवतांचे नाही. आकाशतत्त्वाच्या देवतांचे नामसंकीर्तन ‘रघुपती राघव राजाराम पतितपावन सीताराम’, ‘राधेकृष्ण गोपालकृष्ण’, ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ इत्यादी पदावलींनी किंवा मंत्रांनी करण्यात येते. महाराष्ट्रात पंढरपूरला भगवान विष्णूचे रूप मानण्यात आलेल्या विठ्ठलाचे संकीर्तन ज्याप्रमाणे व ज्या प्रेमाने केले जाते, त्याला तोड नाही. सारे पंढरपूर ‘विठ्ठल विठ्ठल’ गजराने नादमय होऊन जाते. आकाशतत्त्वाच्या देवतेची ही अतिरम्य, भव्य, दिव्य अनुभूती आहे. आकाशाचा वर्ण नीलश्याम असून त्याचा नाद हा गुण आहे. नादब्रह्म!
 
 
वायू
 
 
आकाश म्हणजे आभाळ नव्हे आणि वायू म्हणजे हवा किंवा गॅस नव्हे. वायुतत्त्व ही प्रकृतीची द्वितीयावस्था आहे व ती आकाशापासून स्पंदन पावते. मूळ आकाशतत्त्वात स्पंदन होते तेव्हा त्याला वायुतत्त्व म्हणतात. हा फरक वस्तुरूप नसून अवस्थारूप आहे. निराळ्या अवस्थेमुळे निराळी वस्तू असल्याचा भास होतो, पुढील लेखात वायुतत्त्वाची विस्तृतपणे चर्चा करू. हरी ॐ!
(क्रमशः)
 
 
- योगिराज हरकरे
 
 
शब्दांकन - राजेश कोल्हापुरे
 
 
@@AUTHORINFO_V1@@