भेटोत मज जीवनी, सर्वोत्तम सद्गुरु ज्ञानी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2021
Total Views |

Samarth Ramdas Swamy_1&nb
 
 
 
शाळेच्या वेळापुरतेच किंवा कार्यक्रमस्थळी प्रवचने व व्याख्याने देण्याच्या प्रसंगापुरतेच गुरू हे मर्यादित नसतात, तर त्यांच्यात गुरुपदाची आदर्श तत्त्वे ही अहर्निशी वा क्षणोक्षणी सदैव विद्यमान असतात. म्हणूनच मानवी मूल्यांची रुजवण करणारे ते पूर्णकालिक अखंड ज्ञानस्रोत होत.
 
 
 
सं पूषन् विदुषा नय,
यो अञ्जसानुशासति।
य एवेदमिति ब्रवत्॥
(ऋग्वेद-६.५४.१)
 
 
अन्वयार्थ
 
 
(पूषन्) हे सर्वांना पुष्ट- बलवान करणार्‍या परमेश्वरा, तू आम्हास (विदुषा) अशा विद्वान-ज्ञानी गुरूंशी, (सं नय) संयुक्त कर, जवळ ने की, (य:) जो (अञ्जसा) सरळ मार्गाने, त्वरित (अनुशासति) सर्व शास्त्रांचे ज्ञान प्रदान करेल, उपदेश देत राहील. तसेच (य:) जो (एव इदम्) हे असेच आहे, अशा प्रकारच्या निश्चयात्मक ज्ञानतत्त्वांना (ब्रवत्) सांगण्यास तत्पर होईल.
 
 
विवेचन
 
 
देश व काळ कोणताही असो, जीवनात गरज असते, ती योग्य दिशा देणार्‍या व पदोपदी मार्गदर्शन करणार्‍या खर्‍याखुर्‍या विद्वान गुरुजनांची! माता-पित्यांनी आम्हा सर्वांना जन्म दिला. त्यांच्याकडून आपणांस पंचमहाभूतांनी बनलेले भौतिक शरीर व इंद्रिये तर मिळालीत, पण प्राप्त झालेल्या देहाला सुसंस्कारित करण्याचे व इंद्रियांमध्ये ज्ञानाचे नवतेज संप्रेषित करण्याचे कार्य खर्‍या अर्थाने गुरुजन करीत असतात. चर्मचक्षूंचे प्रज्ञाचक्षूत रूपांतरित करण्याचे अनमोल कार्य गुरूंशिवाय दुसरे कोण करणार? अक्षरी ज्ञानासोबतच सच्चारित्र्य व आत्मकल्याणाचे संवर्धन होते ते गुरुजनांमुळेच!
 
 
 
सदरील मंत्रात मानवाच्या ’जीवनप्रवासात उत्तम प्रकारचे गुरू भेटोत’ असा उपदेश मिळतो. जे शाळेत व महाविद्यालयात आपल्या विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमांशी संबंधित विविध विषयांचे ज्ञान प्रदान करतात. एखाद्या विषयाशी निगडित अशी सखोल माहिती विद्यार्थ्यांना करून देतात, ते शिक्षक होत. त्यांच्या सान्निध्यात राहणारे विद्यार्थीही त्या विषयात पारंगत होऊन परीक्षेत खूप चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतील आणि त्याआधारे मोठ्या हुद्द्यावरची नोकरी मिळवून आर्थिकदृष्ट्या संपन्नदेखील होतील. पण, जगण्यासाठी अत्यावश्यक असणारा नैतिकतेचा, सदाचाराचा व अध्यात्माचा मार्ग दाखवणारे गुरू न भेटल्याने ते धार्मिक व सामाजिक जीवनकौशल्यांपासून व आत्मसुखापासून वंचित राहतात. प्रचंड धनवैभव, मान-सन्मान व प्रतिष्ठा प्राप्त होऊनदेखील शाश्वत सुखापासून दूरच राहतात. म्हणूनच विद्वत्तेबरोबरच सदाचार, सद्व्यवहार, सेवा, परोपकार, राष्ट्रभक्ती, समाजभान यांचे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये बीजारोपण करणारे तेच खरे आचार्य किंवा गुरू होत.
 
 
 
या मंत्रात ईश्वराला ‘पूषन्’ या नावाने संबोधले आहे. कारण, भगवंत सकल जगतातील सर्व जीवांना सर्व दृष्टीने नेहमीच पुष्ट म्हणजेच बलशाली बनवतो. त्याचबरोबर तसे करण्याची प्रेरणादेखील देतो. या पुष्टतेकरिता प्रेरणा देण्याचे माध्यम म्हणजेच गुरू, आचार्य किंवा विद्वान होत. इतरांच्या साहाय्याने एखादवेळी आम्ही शारीरिक, आर्थिक दृष्टीने पुष्ट व बलिष्ठ बनू शकू! पण, सद्विद्या व सत्यज्ञानाने पुष्ट होण्याकरिता आम्हांला प्रेरक गुरूंची आवश्यकता भासतेच! यासाठीच तर ज्याच्याकडे पुष्ट होण्याचे मागणे मागायचे आहे, तोदेखील सर्व दृष्टीने पुष्ट असला पाहिजे. यासाठीच ‘महामृत्युंजय’ मंत्रात भगवंताकरिता ‘सुगंधिम्’, ‘पुष्टिवर्धनम्’ ही विशेषणे आली आहेत.
 
 
गुरू हा ज्ञानियाचा राजा असतो. पण, आपल्या विद्येची किंवा ज्ञानाची बीजे विद्यार्थ्यांमध्ये रुजवितांना ती अगदी सुलभ व सोपी पद्धत अवलंबणे अगत्याचे ठरते. शिकवण्याचा विषय हा कितीही अवघड असला, तरी विद्यार्थ्यांना तो सोपा करून शिकवण्याचे कौशल्य गुरूंमध्ये असावे. सर्व विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता ही सारखी नसते. कोणाला लवकर समजते, तर कोणाला उशिरा! याचा अर्थ कोणीही मोठा नाही की छोटा! सर्व शिष्य वेगवेगळ्या क्षेत्रात पारंगत असल्याने एक समानच असतात. गरज असते ती त्यांच्या क्षेत्रात सर्वोत्तम बनवण्याची! हे कार्य असते ते गुरूंचे! अगदी मठ्ठ बुद्धीच्या विद्यार्थ्यांपर्यंत आपले ज्ञान संप्रेषित होण्यासाठी गुरू तत्पर असले पाहिजेत.
 
 
प्राचीन काळी गुरुकुलांमधून अशाच प्रकारची दृश्ये पाहावयास मिळत असत. आपले शिष्य कोणत्या क्षेत्रात निपुण आहेत किंवा ते कोणत्या वर्णातील आहेत, हे गुरू ओळखतो. तसेच त्याची पूर्वजन्मांची प्रवृत्ती ओळखून त्याला त्याच्या गुण, कर्म स्वभावानुसार आवडीचा कलेतील शिक्षण प्रदान करण्यास प्रारंभ करतो. तोही अगदी सहजपणे व सोप्या पद्धतीने! गुरूंना कठीण अशा शास्त्रांतील संदर्भ शिकवत असताना रोचक कथा, प्रबोधनपर दृष्टांत व महापुरुषांचे ऐतिहासिक प्रसंग यांचा आधार घेणे गरजेचे भासे. उपनिषदांमध्ये येणार्‍या कथा किंवा पंचतंत्र, हितोपदेश यांसारखे ग्रंथ हे याचीच उदाहरणे होत. म्हणूनच वेदमंत्र म्हणतात-
 
 
यो अञ्जसानुशासति, तं विदुषा सं नय।
 
 
हे देवा, तू आम्हाला अशा गुरूंकडे ने, जे आपले विषयज्ञान अगदी सोप्या व सरळ मार्गाने आत्मसात करण्यास प्रवृत्त करतील. त्याचबरोबर गुरूंचे ज्ञान हे निश्चयात्मक असावे. कोणत्याही प्रकारचे द्वंद्व असता नये, ज्यांचे आचरण सदाचाराच्या मार्गावर अढळ व ज्यांच्या जीवनात नैतिक मूल्यांचे अधिष्ठान हे अगदी निश्चल दृढ व एकनिष्ठ असते. तेच गुरुजन ज्ञानानेदेखील पूर्णपणे सबल ठरतात. त्यांची वाणी अपरिवर्तनीय असते. सर्व बाबतीत ते मनसा, वाचा, कर्मणा एकरूप असतात. म्हणूनच म्हटले आहे-
 
 
य एव इदम् इति ब्रवत्।
 
 
 
गुरुजन किंवा आचार्य हे बोलताना किंवा व्यवहार करीत असताना सर्व प्रकारच्या संशयांपासून दूर असतात. म्हणूनच अशा गुरुजनांचा शिष्यांवर लवकर प्रभाव पडतो. ज्यांच्या मनात संशय, द्विधावस्था किंवा अनिश्चिततेची वादळे सुटतात, असे गुरू विद्यार्थ्यांना काय शिकवणार? म्हणूनच गुरू हे योगशास्त्रात सांगितलेल्या यम, नियम, आसन ,प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या अष्टांग योगाद्वारे ब्रह्मतत्त्वाचे साक्षात्कारी बनतात. तेव्हा त्यांची आंतरिक वृत्ती निश्चयात्मक बनते व तेच खर्‍या अर्थाने गुरुपदी विराजमान होतात आणि सगळ्या जगाचे उपदेशक बनतात.
 
 
 
गुरू म्हणजे आचार, विचार व उच्चार यांची एकरूपता असलेली दिव्य मूर्ती! सुंदर व सुमधुर अशा फुलांनी डवरलेल्या वृक्ष-लतांकडे ज्याप्रमाणे भ्रमर आकर्षित होतात, तद्वतच सामान्य लोकदेखील ज्ञान, गुण व सदाचारसंपन्न असलेल्या गुरुंकडे आकर्षित होत असतात. विद्यार्थी, शिष्य किंवा भक्तजनांमध्ये व्यवहारांना धारण करण्याचे सामर्थ्य असते, ते श्रेष्ठ गुरूंमध्येच! असे चांगले गुरू लाभले की, त्या विद्यार्थ्यांचे भाग्य उजळलेच समजा! अन्यथा अयोग्य गुरूंमुळे अनेक होतकरू व बुद्धिमान विद्यार्थी मागे पडतात व त्यांची होणारी प्रगतीदेखील खुंटते. खरेतर गुरू म्हणजे ईश्वराचा प्रतिनिधी! परमेश्वर ज्याप्रमाणे समग्र ब्रह्मांडातील जड-चेतन तत्त्वांमध्ये जीवनशक्ती धारण करवितो, त्याचप्रमाणे तत्त्वनिष्ठ गुरूदेखील आपल्या शिष्यांमध्ये सद्शील धारण करवितो. परमेश्वराइतकेच गुरूंमध्येदेखील पावित्र्य असले पाहिजे. सर्वांशी सद्व्यवहार व समदृष्टी असलेल्या गुरूंवर सर्वांची निष्ठा असते. सर्व प्रकारच्या शूद्र भेद भावनांपासून गुरू फारच दूर असतो. त्याच्या दृष्टिकोनातून सगळे मानव एक समानच! सत्यज्ञान वितरणाबरोबरच गुरू हा शिष्यांना सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांची जाणीव करून देतो. समाजात वाढत जाणार्‍या अज्ञान, अविद्या, अन्याय, अभाव व इतर दोषांना दूर करण्यासाठी तत्पर राहण्याची प्रेरणा गुरूंकडून आपल्या विद्यार्थ्यांना मिळत असते. गुरू हा केवळ अक्षरज्ञान वितरित करणारा पारंपरिक शिक्षकच असतो असे नव्हे, तर तो त्याच्याही पुढे जाऊन विद्यार्थ्यांसोबतच समाजातील सर्व घटकांमध्येही सत्य, अहिंसा, परोपकार, दया, क्षमाशीलता, दान, सच्चारित्र्य इत्यादी श्रेष्ठ तत्त्वांचे संवर्धन करणारा खरा लोकशिक्षक असतो. परिसरातील जनतेची दुःखे पाहून गुरूंचे अंतःकरण भरून येते. रंजल्या गांजल्यांची सेवा करण्यासाठी गुरू हा नेहमी तत्पर असतो. शाळेत किंवा महाविद्यालयात आपल्या विषयांचे सुव्यवस्थित अध्यापन करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आदर्श मूल्यांची जोपासना करण्याचे कार्य गुरुजन करीत असतात. शाळेच्या वेळापुरतेच किंवा कार्यक्रमस्थळी प्रवचने व व्याख्याने देण्याच्या प्रसंगापुरतेच गुरू हे मर्यादित नसतात, तर त्यांच्यात गुरुपदाची आदर्श तत्त्वे ही अहर्निशी वा क्षणोक्षणी सदैव विद्यमान असतात. म्हणूनच मानवी मूल्यांची रुजवण करणारे ते पूर्णकालिक अखंड ज्ञानस्रोत होत. एखाद्या विषयाची सखोल माहिती मग ती धार्मिक क्षेत्रातील असो की आध्यात्मिक, सामाजिक असो की राष्ट्रीय, व्यक्तिगत असो की सामूहिक, या सर्वांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणार्‍या सर्व प्रश्नांची उकल करून शिष्यांचे समाधान करण्याचे कार्य गुरु नेहमीच करतो. गुरूंच्या अंगी ज्ञानतत्त्वांबरोबरच सदाचारशीलतादेखील रुजलेली असते, अन्यथा सदाचारशून्य गुरूंमुळे समाजात काय बदल होणार? ’लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’ याप्रमाणेच गुरू असेल, तर त्याचा इतरांवर अजिबात प्रभाव पडणार नाही. शास्त्रात म्हटले आहे- ’आचारं ग्राह्यति इति आचार्य:।’ म्हणजेच जो स्वतः आचार ग्रहण करतो, तोच खरा गुरू किंवा आचार्य होय. शुक्राचार्य म्हणतात, ‘हितोपदेष्टा शिष्यस्य सुविद्याध्यापको गुरू:।’ अर्थात, सर्वहितकारी अशा उपदेशवचनांनी जो आपल्या शिष्यांचे इहलोकीचे व परलोकीचे कल्याण साधतो, तोच खरा अध्यापक, गुरू होय. पुराणकार म्हणतात
 
 
अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानाञ्जनशलाकया।
चक्षु: उन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः॥
 
 
 
ज्या गुरूने आपल्या ज्ञानरुपी अंजनशलाकेने अज्ञान व अंधकारात भटकणार्‍या शिष्यांचे डोळे उघडले आहेत, अशा खर्‍या श्रेष्ठ गुरूंना आमचा नमस्कार असो!
 
 
जे नि:स्वार्थ भावनेने, मानवतेच्या कल्याणासाठी जीवनभर अखंडपणे झिजले, असंख्य आदर्श शिष्यांची नवनिर्मिती करून त्यांच्या माध्यमाने ज्यांनी सामाजिक, राष्ट्रीय व वैश्विक कल्याण साधण्याचा यशस्वीपणे प्रयत्न केला, अशा ज्ञात-अज्ञात थोर गुरुवृंदांना शतशः सादर अभिवादन!
 
 
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
@@AUTHORINFO_V1@@