समर्थांचे प्रच्छन्न आत्मचरित्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2021
Total Views |

Samarth_1  H x
 
 
 
दासबोधात स्वामींनी जे विचार मांडले आहेत, त्यातून त्यांचे आत्मचरित्र दृग्गोचर होते. दासबोधातून समर्थांनी परमार्थज्ञान आणि त्याचबरोबर प्रपंचाचे विज्ञानही सांगितले आहे. त्यामुळे या ग्रंथाला विशेष महत्त्व आहे. एका विशिष्ट अर्थाने त्यात समर्थांचे आत्मचरित्र आले आहे, असे म्हणता येते.
 
 
परमार्थप्राप्तीसाठी प्रत्येकाला साधना करावी लागते. साधनेशिवाय सहजसाध्य अशी ती वस्तू नाही. संतपदाला पोहोचलेले महात्मेही साधना करीत असतात. साधना करीत असताना संतांना काही विलक्षण अनुभव येतात. त्यांच्या त्या अनुभवात मानवी जीवनाचा गूढार्थ संतांना सापडतो. साधकाच्या दशेतून जात असताना जीवनाच्या सर्व अंगांचे दर्शन घडते. भगवंताच्या हेतूची साधकाला प्रचिती येऊ लागते. त्यामुळे अखेरीस मानवी जीवनाचे रहस्य उलगडते. मानवी जीवनाचे रहस्य उलगडल्याशिवाय साधकाची अध्यात्मात प्रगती होत नाही. त्यानंतर साधकाला अंतरात भगवंताचे दर्शन होते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो. साधकाला अखंड समाधानाची उन्मनी अवस्था प्राप्त होते. आपल्याला उलगडलेले जीवनाचे रहस्य आणि आपण अनुभवलेली अखंड समाधानाची सहजावस्था लोकांना सांगून त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून द्यावा, या उदार हेतूने संत ग्रंथलेखन करीत असतात. आपल्याला प्रसिद्धी मिळावी अथवा लोकांत मानसन्मान मिळावा, यासाठी संत ग्रंथ लिहीत नाहीत. संतांच्या ग्रंथांतून अनुभवांची प्रचिती दिसून येते. समर्थांनी सर्व ठिकाणी प्रचितीला महत्त्व दिलेले आढळून येते. स्वामी म्हणतात,
 
 
प्रपंच अथवा परमार्थ। प्रचितीवीण अवघे वेर्थ।
प्रत्ययेज्ञानी तो समर्थ। सकळांमध्ये॥ (दा. २०.३.२८)
 
 
प्रपंच असो नाहीतर परमार्थ असो, दोन्हीकडे संत स्वानुभवाच्या ज्ञानाने, आत्मप्रचितीने संपन्न असतात. ते प्रत्ययाचे ज्ञान संत आपल्या ग्रंथांतून मांडत आले आहेत. संतांच्या ग्रंथांतील विचार स्वानुभवाचे, प्रचितीचे असल्याने त्या ग्रंथांत संतांचे चरित्र दडलेले असते. ग्रंथ अनेक आहेत. तथापि दासबोधाच्या समास ७.९ मध्ये ग्रंथ कसा असावा आणि कसा नसावा, यावर स्वामींनी भाष्य केले आहे. स्वामी म्हणतात,
 
 
जेणें धारिष्ट चढे। जेणें परोपकार घडे।
जेणें विषयवासना मोडे। त्या नांव ग्रंथ॥ (७.९.३३)
 
 
सद्ग्रंथाच्या अभ्यासाने माणसाच्या ठिकाणी धैर्य उत्पन्न होते, परोपकार करण्याची बुद्धी निर्माण होते आणि इंद्रियसुखाची वासना नाहीसी होते. स्वामींनी उत्तम ग्रंथाच्या ज्या कसोट्या या समासात सांगितल्या आहेत, त्या सर्व त्यांच्या दासबोध ग्रंथाला लागू पडतात.
 
 
दासबोधात स्वामींनी जे विचार मांडले आहेत, त्यातून त्यांचे आत्मचरित्र दृग्गोचर होते. दासबोधातून समर्थांनी परमार्थज्ञान आणि त्याचबरोबर प्रपंचाचे विज्ञानही सांगितले आहे. त्यामुळे या ग्रंथाला विशेष महत्त्व आहे. एका विशिष्ट अर्थाने त्यात समर्थांचे आत्मचरित्र आले आहे, असे म्हणता येते.
 
 
समर्थस्थापित अनेक मठांत फिरून मोठ्या कष्टाने समर्थसाहित्य जमा करून ते लोकांना उपलब्ध करून देणारे समर्थवाङ्मयाचे अभ्यासक शं. श्री. देव म्हणतात की, “दासबोधाच्या अकराव्या दशकातील दहावा समास हे समर्थांचे प्रच्छन्न आत्मचरित्र आहे. लोकसंग्रह करणारा महंत कसा असतो, ते या समासात स्वामींनी सांगितले आहे. आत्मसाक्षात्कारी असणे, एकांताची आवड असणे, भगवंताच्या कथाकीर्तनात रममाण होणे, लोकोद्धाराची चिंता वाहणे आणि लोकसंघटन उभारून ते कार्यान्वित करणे इत्यादी गुण महंतांच्या अंगी असतात, हे त्या समासातून पाहिल्यावर त्यात समर्थांचे आत्मचरित्र गुप्तपणे दडलेले आहे.” हे श्री. शं. श्रीदेव यांचे विधान मान्य होण्यासारखे आहे. तीर्थाटनाहून परत आल्यावर समर्थ चाफळच्या खोर्‍यात येऊन राहिले. तेव्हाचे समर्थांचे जीवन पाहिले, तर ते दासबोधातील समास ११.१० मध्ये सांगितलेल्या गुणांशी मिळतेजुळते आहे. जणू काही समर्थ त्यातून आपलाच जीवनक्रम सांगत आहेत असे वाटते. या समासाचे नाव ‘नि:स्पृह वर्तणूक’ असे आहे. समर्थांशिवाय दुसरा आदर्श नि:स्पृह क्वचितच आढळेल. समर्थांचे त्या समासातील बोल आत्मप्रचितीचे आहेत, यात शंका नाही. शं. श्री. देव म्हणतात की, ‘समर्थांनी जे चरित्र केले, ते या ११.१० समासात सांगितले आहे, असे खुद्द स्वामींचेच वचन आहे.’ या समासाच्या शेवटी स्वामी म्हणतात,
 
 
हें प्रचितीचे बोलिलें। आधी केले मग सांगितले।
मानेल तरी पाहिजे घेतलें। कोणी येकें॥
 
 
समर्थ सांगतात की, “मी स्वतः अनुभव घेऊन नंतरच हे बोलत आहे. त्यात कल्पनाविलास नाही, हे मी आधी करून पाहिले आणि मग जगाला सांगितले आहे. तुम्हाला जर ते पटले तर तुम्हीही तसे वागून पाहा. समर्थांच्या आत्मचरित्राला यापेक्षा आणखी वेगळा पुरावा हवा कशाला?”
 
 
चाफळ खोर्‍यात आल्यावर समर्थांनी लोकांना उपासनेला लावायला व दीक्षा द्यायला सुरुवात केली. उपासनेसाठी एकत्र जमणार्‍या सज्जन माणसांचे संघटन स्वामी तयार करीत होते. स्वामी चाफळला किंवा त्यांच्या आसपासच्या गावांत आलेल्या तरी आपले काम झाल्यावर ते उठून जात. समर्थांचा मुक्काम जवळच्या डोंगरात, एखाद्या घळीत असे. सुरुवातीच्या काळात स्वामी भिक्षेच्या निमित्ताने लोकांच्या गाठीभेटी घेत. लोकांना उपासनेसाठी एकत्र आणून त्यांना आपले आध्यात्मिक अनुभव सांगत. ते सांगून झाले की, उगीचच इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत न थांबता समर्थ तेथून निघून जात. त्यामुळे स्वामींचे अनुभव ऐकण्याची व त्यांच्या सहवासाची लोकांना चटक लागे. स्वामींचे त्या भागात आगमन होण्यापूर्वी लोकांना धार्मिक उपासनेचे परंपरागत मार्ग माहीत होते. लोक धर्मकृत्ये पार पाडीत असत. पण, ते सारे यंत्रवत असल्याने त्याद्वारा त्यांना आत्मिक समाधान मिळत नव्हते. समर्थांनी तेथे आल्यावर देवाच्या उपासनेमागील रहस्य सांगून त्यांच्या देवपूजेला अर्थ प्राप्त करून दिला. त्याचा परिणाम असा झाला की, लोक आपला कर्मठपणा सोडून समर्थांना शरण येऊ लागले. स्वामी सांगतात,
 
 
प्रत्यय बोलोन उठोन गेला। चटक लागली लोकांला।
नाना मार्ग सांडून त्याला। शरण येती॥
 
 
लोकांना भक्तिमार्गाचे व उपासनेचे महत्त्व सांगून स्वामी सर्वांची मने वेधून घेत, लोकांना उपासनेला व भजनाला लावून स्वामी तेथून निघून जात. हिंदू धर्म व संस्कृती यांना परकीय आक्रमणांपासून वाचवून त्यांचे संवर्धन करण्यासाठी स्वामींना लोकसंग्रह वाढवायचा होता. चाफळला आल्यावर स्वामींच्या ओळखी होऊ लागल्या. पण, स्वामी त्यांना सोडून त्यांच्याशिवाय नवीन माणसांचा परिचय करून घेऊन त्यांच लोकांना आपलेसे करून घेत. लोक स्वामींच्या अंतःकरणाचा शोध घेऊन पाहात. या स्वामींना नेमके काय हवे आहे, याचा शोध घेऊ पाहात. पण, त्यांना स्वामींच्या ठिकाणी कुठलाही स्वार्थ अथवा इच्छा किंवा वासना आढळत नसे. स्वामी नेमके कोणत्या कार्याकरिता चाफळ खोर्‍यात येऊन राहिले, याचाही अंदाज लोकांना येत नसे. स्वामींचे वर्तन असे होते की,
 
 
त्यागी वोळखीचे जन। सर्वकाळ नित्य नूतन।
लोक शोधून पाहाती मन। परि इच्छा दिसेना॥
 
 
स्वामींना ओळखणे फार कठीण होते. लोक स्वामींबद्दल काही अंदाज बांधत. परंतु, समर्थ आपल्या वागण्याने लोकांचे अंदाज चुकीचे ठरवीत. कारण, स्वामींचे वागणे हे जीवनमुक्त महात्म्याचे अंतःप्रेरणेवर अधिष्ठित असे वागणे होते. स्वामींच्या बाबतीत लोकांचा अनुभव होता.
 
 
‘पाहों जातां न सांपडावें। येकायेकी॥’
समर्थांचे अपार विचारसामर्थ्य व चरित्र शब्दांत पकडणे कसे कठीण आहे, हे पुढील लेखात पाहू. (क्रमश:)
 
 
- सुरेश जाखडी
 
 
@@AUTHORINFO_V1@@