सामाजिक कार्याचा ‘श्रीगणेशा’

27 Jul 2021 21:25:06

Ganeshchandra Pingale_1&n
 
 
 
निवृत्तीपश्चात खर्‍या अर्थाने स्वतःला पूर्णवेळ सामाजिक कामात झोकून देत सामाजिक कार्याचा श्रीगणेशा करणार्‍या गणेशचंद्र पिंगळे यांच्या कार्याविषयी...
 
 
 
सामाजिक कार्य करत असताना हवी असते ती केवळ इच्छाशक्ती. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कार्य करणार्‍या व्यक्तीस वयाचे कोणतेही बंधन कधीही येत नसते. हीच प्रचिती येते नाशिक येथील गणेशचंद्र दत्ताराम पिंगळे यांच्या कार्यातून. ‘एम.कॉम.’ (अकाऊंट)पर्यंत शिक्षण झालेले पिंगळे यांनी ‘बीडीसी ग्रुप’ येथे खासगी नोकरी केली. निवृत्तीपश्चात खर्‍या अर्थाने त्यांनी स्वतःला पूर्णवेळ सामाजिक कामात झोकून देत सामाजिक कार्याचा श्रीगणेशा केला.
 
 
सन २००९ मध्ये ‘दीपस्तंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थे’ची स्थापना त्यांनी केली. या संस्थेत संस्थापक सचिवपदावर ते आजही कार्यरत आहेत.
 
 
या संस्थेच्या माध्यमातून ते गरजू विद्यार्थ्यांना व महिलांना गेल्या नऊ वर्षांपासून संगणक प्रशिक्षण देत आहेत. तसेच अभिक्षण गृहातील मुलांना गणवेश वाटप, वंचित कुटुंबाला रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, महिलांचा सामाजिक व आर्थिक स्तर वाढावा, यासाठी महिला बचतगट तयार करून व्यावसायिक प्रशिक्षण देणे त्यात घरगुती पापड, लोणचे, शिवणकाम, संगणक प्रशिक्षण असे अनेक प्रकारचे प्रशिक्षण पिंगळे यांनी महिलांना उपलब्ध करून दिले आहे.
 
त्यात आजपर्यंत साधारण ७५० महिलांनी सहभाग नोंदवला आहे. ग्रामीण भागात निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे कराटेचे प्रशिक्षक देणे. रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम अशा प्रकारचे वेगवेगळे सामाजिक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत.
 
 
‘कोविड’काळात ‘कोविड सेंटर’ला भेट देऊन १५ वाफेचे मशीन (स्टीमर) एकूण १५ भेट स्वरूपात संस्थेच्या माध्यमातून व पिंगळे यांच्या पुढाकारातून देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना मास्कवाटप, सॅनिटायझर वाटप, अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे परिवहन मंडल विभागातील वाहक व चालकांना मास्क, सॅनिटायझर, ‘फेसशिल्ड’ असे ‘कोविड’ बचाव होण्यासाठी ‘किट’वाटप करण्यात आले. कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी सरकारी स्तरावर प्रधानमंत्री साहाय्यता निधी, मुख्यमंत्री साहाय्यता निधी, ‘साई बाबा संस्थान ट्रस्ट’, ‘सिद्धिविनायक ट्रस्ट’ यांच्या मदतीने रुग्णांना आर्थिक मदतीसाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असतात.
 
 
गरीब व आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा व शिका’ संकल्पना राबविण्यात येत असून, त्यात दरवर्षी २० विद्यार्थी लाभ घेत आहेत. आजवर संस्था व पिंगळे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा २५० मुलांनी लाभ घेतला आहे. “समाजाला आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेने आपण आपल्या परीने समाजासाठी सामाजिक कार्याच्या माध्यमातून खारीचा वाटा उचलणे व कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता सामाजिक कार्य करत राहणे आवश्यक आहे,” असे पिंगळे आवर्जून नमूद करतात.
 
“‘कमवा व शिका’ संकल्पनेतून घडलेली मुले नोकरीमध्ये चांगल्या हुद्द्यावर आहेत. काहींनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. महिला बचतगटातील महिलांनी स्वतःचा पापड उत्पादन व्यवसाय सुरू केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चालवत असलेला सामाजिक कार्याचा वारसा तरुण मुले पुढे चालवत आहेत, हाच आपल्यासाठी आनंददायी क्षण आहे,” असे पिंगळे अभिमानाने सांगतात. पिंगळे यांना गुरुवर्य शिवानंद सरस्वती महाराज व आई-वडील याच्या प्रेरणेने व आशीर्वादाने सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली.
 
 
ज्येष्ठांनी आपल्या अनुभवाचा व ज्ञानाचा वापर पुढच्या पिढीला कसा होईल, तसेच आपल्या कौशल्याचा वापर तरुण युवा पिढीसाठी कसा होईल, या भूमिकेतून ज्येष्ठांनी सामाजिक कार्य करावे, अशीच भूमिका पिंगळे मांडतात. सध्या हिंदू संस्कृतीविषयी तरुणांना संपूर्ण माहिती नाही. ती माहिती ज्येष्ठांकडून तरुणांना माहिती होईल व तरुणांकडे असलेले आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ज्येष्ठांना होऊ शकतो, ज्येष्ठांचा अनुभव व ज्ञानाचा वापर व तरुणाईची काम करण्याची क्षमता एकत्र आल्याने अधिक चांगल्या गतीने काम उभे राहण्यास मदत होईल. अशा प्रकारे सर्वच गोष्टीचा समतोल राखत सामाजिक कार्यात बदल घडू शकतो, अशीच पिंगळे यांची धारणा आहे.
 
 
“आपण आपल्या मातृभूमी व समाजाचा विकास होण्यासाठी सामाजिक कार्य करावे, तसेच आपले सामाजिक योगदान सत्पात्री असावे, ज्याला खरंच गरज असेल त्यालाच मदत करावी, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता प्रामाणिकपणे सामाजिक मदतकार्य करत राहवे, अशीच भावना सामाजिक कार्यकर्त्याने उराशी बाळगावी,” असे पिंगळे सांगतात. आजमितीस केवळ प्रसिद्धीसाठी म्हणून सामाजिक कार्य करणारे काही लोक आपल्याला दिसतात. अशावेळी पिंगळे यांनी आयुष्याच्या संध्याकाळी सामाजिक कार्याचा जोपासलेला वसा हा नक्कीच प्रेरणादायी आहे. तरुण आणि ज्येष्ठ यांच्या एकत्रीकरणातून सामाजिक चित्र हे नक्कीच बदलता येणे शक्य आहे. हा पिंगळे यांचा आशावाद नवनिर्मितीची पालवी प्रफुल्लित करणारा आहे.
 
 
ज्येष्ठांचे समाजात असणारे महत्त्व हे अनन्यसाधारण आहेच. मात्र, ज्या वेळी पिंगळे यांच्यासारखे ज्येष्ठ तरुणांनादेखील विचार करायला भाग पाडणारे काम करतात, तेव्हा मात्र समाजात एक स्फुल्लिंग जागृत होण्यास नक्कीच मदत होते. पिंगळे यांच्या आगामी कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 
Powered By Sangraha 9.0