‘व्हिक्टरी पंच’ अभियानात सहभागी व्हा : नरेंद्र मोदी

26 Jul 2021 10:39:38
NARENDRA MODI_1 &nbs

 नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, दि. २५ जुलै रोजी देशवासीयांशी ‘मन की बात’द्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी देशवासीयांना आपल्या सर्व ‘ऑलिम्पिक’ खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्याचे तसेच ‘व्हिक्टरी पंच’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी पंतप्रधानांनी २६ जुलै रोजी असणार्‍या ‘कारगिल विजय दिवसा’चे स्मरण केले आणि त्यानिमित्ताने कारगिल योद्ध्यांना वंदन केले.
तसेच यावेळी पंतप्रधानांनी ‘राष्ट्रगान.इन’ (RASHTRAGAAN.IN) या संकेतस्थळावर जाऊन एकाच वेळी जास्तीत जास्त भारतीयांनी राष्ट्रगीत गाण्याच्या अभियानामध्ये सामील होण्याचे आवाहन केले. पंतप्रधान पुढे म्हणाले की, “आपण जेव्हा कधी खादीचे उत्पादन खरेदी करतो त्यावेळी त्याचा लाभ आपल्या गरीब विणकर बंधू-भगिनींना होतो,” हे सांगून त्यांनी आपणा सर्वांना ग्रामीण भागात तयार होणार्‍या हातमागाच्या वस्तू खरेदी करण्याची विनंती केली.
 
‘मन की बात’ कार्यक्रमांमध्ये आपले संदेश आणि सूचना पाठवणार्‍या सर्व तरुणांचे पंतप्रधानांनी आभार मानले  आणि हे युवक ‘मन की बात’ कार्यक्रमाला दिशा देण्याचे काम करत आहेत, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. यावेळी देशाच्या वेगवेगळ्या भागात तरुण-तरुणी वेगवेगळ्या नवीन उपक्रमांद्वारे तसेच नवोन्मेषी कार्यक्रमांद्वारे करत असलेल्या विविध प्रयत्नांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली आणि ओडिशाचे इसाक मुंडा, आंध्र प्रदेश मधील साई प्रनीथ आणि अशी इतर उदाहरणे पंतप्रधानांनी यावेळी दिली.
 
केळीच्या फायबरपासून वस्तू तसेच केळीच्या पिठापासून इतर खाद्यपदार्थ तयार करणार्‍या लखीमपूर-खिरी येथील उपक्रमांचे यावेळी पंतप्रधानांनी कौतुक केले.‘सेंट क्वीन केटेवान’ यांचे पवित्र अवशेष जपून ठेवणार्‍या गोव्याच्या जनतेचे पंतप्रधानांनी आभार मानले आणि यामुळे गोवा आणि जॉर्जिया यांच्यामधील संबंध अधिक दृढ झाले आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. यावेळी समारोप करताना पंतप्रधानांनी पाणी वाचवण्याचे तसेच ‘कोविड’ योग्य वर्तणूक जारी ठेवण्याचे आवाहन केले.





Powered By Sangraha 9.0