एवढी मग्रुरी येते कुठून?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2021
Total Views |

Bhaskar Jadhav_1 &nb
 
  
 
मुख्यमंत्र्यांनाही भास्कर जाधव यांच्या अरेरावीत काही वावगे वाटले नाही, हेच स्पष्ट होते. त्यावरून उद्धव ठाकरेंचीही आपल्या आमदारांकडून होणार्‍या दमदाटीला मूकसंमती असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही आणि भास्कर जाधवांनी शनिवारी सर्वांसमोर दाखवलेली मग्रुरी त्यातूनच आलेली आहे.
 
 
 
आस्मानी संकटाने गांजलेल्या चिपळूणवासीयांना आशा होती ती मायबाप सरकार तरी आपल्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी धाव घेईल. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महापुराने उद्ध्वस्त झालेल्या जनतेच्या भेटीसाठी तीन दिवसांनी चिपळूणमध्ये दाखल झाले आणि त्यांच्यासमोरच आमदार भास्कर जाधव यांनी सुलतानी जुलूमशाहीचा प्रत्यय दिला. पावसाच्या पाण्याने घरदार, व्यापार, सर्वस्व गमावलेली एक महिला अतिशय आर्ततेने, “साहेब, आमच्याकडे लक्ष द्या हो, आम्हाला मदत करा, सोडून जाऊ नका,” अशी विनवणी करत होती आणि भास्कर जाधव त्या महिलेवर हात उगारून, अरेरावी करून मग्रुरी दाखवत होते, तेही मुख्यमंत्र्यांसमोर! भास्कर जाधव यांची दमदाटीची भाषा ऐकून, त्यांची वर्तणूक पाहून खरे म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्याच ठिकाणी त्यांना तत्काळ हटकायला हवे होते, त्यांचे कान धरायला हवे होते, तसेच संबंधित महिलेची माफी मागण्यासही सांगायला हवे होते. त्यातून मुख्यमंत्र्यांची प्रतिमादेखील उजळून निघाली असती व पक्षातील आमदारांपेक्षाही त्यांना जनतेची फिकीर असल्याचे जगजाहीर झाले असते. पण, तसे झाले नाही, ते पाहता मुख्यमंत्र्यांनाही भास्कर जाधव यांच्या अरेरावीत काही वावगे वाटले नाही, हेच स्पष्ट होते. त्यावरून उद्धव ठाकरेंचीही आपल्या आमदारांकडून होणार्‍या दमदाटीला मूकसंमती असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही आणि भास्कर जाधवांनी शनिवारी सर्वांसमोर दाखवलेली मग्रुरी त्यातूनच आलेली आहे. भास्कर जाधवांच्या मते, आपले पक्षप्रमुखच मुख्यमंत्री किंवा राज्याचे सर्वेसर्वा आहेत, ते जनतेची सेवा करण्यासाठी नव्हे, तर सत्तेची मस्ती दाखवण्यासाठीच आणि ती त्यांच्यासमोर दाखवली तर ते आपल्याला शाबासकीच देणार. कारण, शिवसेना भवनवर मोर्चा नेणार्‍या भाजयुमो कार्यकर्त्यांवर हल्ला करणार्‍या पक्षाच्या गुंड कार्यकर्त्यांचे कौतुक यापूर्वी खुद्द उद्धव ठाकरे यांनीच केले होते. तसेच खासदार संजय राऊत आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी अशाप्रकारचा मुजोरपणा वेळोवेळी दाखवलाही होता. संजय राऊत यांनी तर ‘आम्ही सर्टिफाईड गुंड’ असल्याची कबुलीही दिली होती. तोच गुंडगिरीचा दाखला देत, आपला पक्षप्रमुखच राडेबाज कार्यकर्त्यांचा सत्कार करत असल्याचे पाहून भास्कर जाधव यांनी याआधी विधानसभेतील भाजपचे १२ आमदार निलंबित केले होते. पण, त्याचा जीवंत अनुभव सर्वसामान्य नागरिकांनी घेतला नव्हता, बहुसंख्यांनी त्यासंदर्भातील चित्रफीतच पाहिली होती, तोच दमदाटीचा अनुभव भास्कर जाधव यांनी चिपळूणमध्ये महापुराने कोलमडून पडलेल्या, महिलेला अरेरावी करत दिला.
 
 
 
 
वस्तुतः राज्यकर्त्यांची जबाबदारी संकटात सापडलेल्या जनतेला धीर देण्याची, सावरण्याची असते. लोकशाही व्यवस्थेत, संवैधानिक देशात राज्यकर्त्यांचे तेच कर्तव्यही असते. पण, महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंच्या सरकारने आपली जबाबदारी कधी ओळखलेली नाही वा निभावलेलीही नाही. आपले घटनात्मक कर्तव्यही त्यांनी कधी पार पाडलेले नाही. कोरोना महामारी, ‘निसर्ग’, ‘तोक्ते’ चक्रीवादळ, विदर्भातील महापूर आदी भीषण घडामोडींतून त्यांचे जबाबदारी टाळण्याचे, कर्तव्यात कसूर केल्याचे दर्शनही घडलेले आहे. त्यातून धडा घेत सत्तेत बसून दीड वर्ष झाल्यानंतरही त्यांना भान आलेले नाही. म्हणूनच, आताच्या महापुराच्या संकटातही सरकारमधील घटक असलेल्या शिवसेनेच्या भास्कर जाधव यांनी चिपळूणमधील महिलेसमोर मग्रुरी दाखवली. तसेच पक्षप्रमुखासमोर एका असहाय महिलेला दमदाटी करून आपण फार मोठी कर्तबगारी केल्याचेही भास्कर जाधव यांना वाटले असावे. त्यांच्या या कर्तबगारीत सत्तेच्या मस्तीबरोबरच, खंडणीखोरी, हप्तेवसुली वगैरेतून आलेल्या मुजोरपणाचाही वाटा आहे. पण, त्यांचा मुजोरपणा फार काळ चालणार नाही. कारण, भास्कर जाधव यांचे कृृत्य इतके संतापजनक होते की, ते पाहून कोणालाही चीड येईल, जोड्याने झोडपून काढण्याची इच्छा होईल. अर्थात, इथल्या जनतेच्या अंगात लोकशाही भिनलेली असल्याने तसे काही होणार नाही किंवा होऊही नये. पण, मतदानाच्या माध्यमातून जनता भास्कर जाधव यांना झोडपून काढेल, हे नक्की! कारण, जनतेच्या हातात मतदानरूपी शस्त्रच मस्तवालांना वठणीवर आणण्यासाठी संविधानाने दिलेले आहे आणि त्याचा वापर केल्यावर भास्कर जाधव आज जी मस्ती, जी अरेरावी, जी मग्रुरी दाखवत आहेत, ती उतरल्याशिवाय राहणार नाही.
 
 
 
 
दरम्यान, शिवसेना स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालणारी संघटना, पक्ष वगैरे म्हणवून घेत असते. जिथे-जिथे शिवसेनेची सत्ता येते, त्या-त्या ठिकाणी शिवशाही अवतरल्याचेही शिवसेना नेते-कार्यकर्ते आणि पक्षप्रमुखही सांगत असतात. पण, भास्कर जाधव यांचे उद्धव ठाकरेंसमोरचे वर्तन पाहता, ते किंवा ठाकरेही शिवरायांचे पाईक नव्हे, तर मोगलाईचे अंमलदार असल्याचेच स्पष्ट होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना, जनतेच्या गवताच्या पात्यालाही हात लावता कामा नये, अशी ताकीद दिली होती. तसेच, स्त्री शत्रूच्या गोटातील असो वा स्वकीय, तिचा आदरच केला पाहिजे, अशी शिकवणही त्यांनी दिली होती. पण, स्वतःच्या नावात शिवरायांच्या नावावरून ‘शिव’ लावणारी, स्वतःच्या कार्यकर्त्यांना ‘शिवबाचे शिवसैनिक’ म्हणणारी, स्वतःच्या सत्तेला शिवाजी महाराजांची ‘शिवशाही’ ठरवणारी शिवसेना चिपळूणमध्ये त्यांच्याच विचारांना तिलांजली देताना दिसली. भास्कर जाधवांच्या माध्यमातून ३५० वर्षांपूर्वीच्या मोगलाईचा कारभार किती क्रूर, जनतेला त्राहिमाम करून सोडणारा असेल, हे दाखवून दिले. त्यामुळे शिवसेनेने आता आपल्या नावातील ‘शिव’ काढून टाकावे, त्याऐवजी ‘मोगलसेना’ वगैरे स्वतःच्या कर्तृत्वाला साजेसे ठरणारे नाव धारण करावे. जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांचाही ठाकरेंच्या सेनेमुळे, कार्यकर्त्यांमुळे, नेते-आमदारांमुळे अपमान होणार नाही; अन्यथा निराधार महिलेसमोर मग्रुरी दाखवणार्‍या भास्कर जाधव यांना पक्षातून निलंबित करावे. पण, ते होण्याची शक्यता नाही. कारण, उद्धव ठाकरेंनाही भास्कर जाधवांनी केले तो योग्यच, असे वाटत असावे. पण, यातून संपूर्ण राज्यभरात चुकीचा संदेश जातो आणि ठाकरेसैनिकांना यातूनच अधिकाधिक मग्रुरी करण्याचे प्रोत्साहन मिळते. पण, सत्ताधीशांची मग्रुरी संपवायला फारसा वेळ लागत नाही; मतदानाची वेळ आली की, जनता ती संपवतेच आणि शिवसेनेचीही मग्रुरी संपवली जाईलच!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@