हळवे मन माझे....

26 Jul 2021 23:36:39

Overthinking_1  
 
 
इतर मंडळींना या अतिहळव्या मंडळींशी नक्की कसं वागायचं, हे कळत नाही आणि मोकळेपणे वागता येत नाही. लोक चक्कं घाबरूनच वागतात. कशाने काय बिनसेल, सांगता येत नाही. या दबावाखाली मित्रमंडळी अनेक गोष्टी जरा जपूनच आणि लपूनच करतात. त्यामुळे अनेकदा होतं काय की, या मंडळींची मैत्री, रोमॅन्टिक नाती नाजूक होतात.
 
 
 
आपण अनेकदा अशा काही लोकांना भेटतो की, त्यांच्याशी बोलताना आपल्याला जागरुक राहावे लागते. जपून बोलावेसे वाटते. ही मंडळी काय बोलल्यामुळे आणि कशाने दुखावतील, याचा अंदाज आपल्याला बांधता येत नाही. ही अतिसंवेदशील माणसे असतात. अशा माणसांना आरडाओरडा, भांडणं, तणाव वा कधीकधी भावनिक भारावलेपण सहन होत नाही. अशी ‘अतिसंवेदनशील’ माणसं मग ज्या परिस्थितीत अशा गोष्टी घडतात, त्या परिस्थितीचा वा माणसांना नियोजित प्रयत्नांनी टाळायचा प्रयत्न करतात. दुसर्‍या बाजूने जर आपण पाहिलं तर ही मंडळी उच्च दर्जाची विधायकता दाखवितात. त्यांची वैयक्तिक नाती संपन्न असतात. त्यांच्या वातावरणात असणार्‍या सौंदर्याचा आणि सर्जनशीलतेला जोपासतात. त्या गोष्टींचे त्यांना विशेष कौतुक असते. अतिसंवेदनशील व्यक्तिमत्त्व हे इतर अनेक व्यक्तिमत्त्वांप्रमाणे सर्वसाधारण आहे. जवळ जवळ १५ ते २० टक्के लोकांमध्ये अतिसंवेदनशील व्यक्तिमत्त्वाची लक्षणे दिसून येतात. या व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तींना बर्‍याच वेळा नकारात्मक भूमिकेतून पाहिले जाते. जरा अतिच संवेदनशील किंवा कधी कधी रडकी वा ‘पटवून न घेणारी’ असंही म्हटलं जातं. पण, हे एक स्वभाववैशिष्ट्य आहे, ज्यात काही जमेच्या बाजू आहेत आणि काही आव्हानंही आहेत.
 
 
 
आपल्याला कसं ओळखता येईल की, आपण अतिसंवेदनशील आहोत की नाही! कदाचित कोणी तुम्हाला सांगितलं असेल, ‘तू जरा जास्तचं हळवी आहेस.’ विशेषत: अशा लोकांनी जे तुम्हाला थोडे ‘भावनाशून्य’ वा ‘कोडगे’ वाटतात. या लोकांनी थोडा अधिक विचार केला पाहिजे, असे तुम्हाला वाटते. थोडक्यात, या स्वभाववैशिष्ट्याबद्दल सांगायचं म्हटलं तर असं म्हणता येईल की, या व्यक्ती सकारात्मक वा नकारात्मक गोष्टींना जरा अधिक भावूकतेने तीव्र प्रतिक्रिया देत असतात किंवा सामान्य माणसांच्या तुलनेत तीव्र प्रतिक्रिया देतात. त्यांची भावूकता चटकन इतरांच्या लक्षात येते. त्यांच्या हळवेपणामुळे त्यांना आपल्या भावना परिणामकारकरित्या व्यक्त करणं सोप्पं जातं. कारण, हे लोक नुसते शब्द ऐकत नाहीत, पण त्या शब्दामागे असलेले भाव किंवा हावभाव दोन्हीही आणि कधीकधी सूरही व्यवस्थित ओळखू शकतात. इतर बाह्य गोष्टी जसे की, प्रकाशाचा झगझगाट, अत्तरांचा तीव्र सुवास, कर्कश आवाज किंवा जेवणातले तिखट या सगळ्या गोष्टींनी त्यांना त्रास होतो. अनेकदा चमत्कारिक वाटेल, पण ही मंडळी दुसर्‍यांच्या मनातील दुःख, राग, चिडचिड वा एकाकीपणा त्या व्यक्तींना न सांगता ओळखतात. ही मंडळी तर संगीत मैफिलीत बसली असतील, तर भारावून गेलेली दिसतात. सिनेमा थिएटरमध्येसुद्धा एखाद्या भावूक प्रसंगाने हेलावून जातात, कधीकधी चक्क हुंदके देताना दिसतात.
 
 
 
 
अतिसंवेदनशीलता हाताळणे इतरांना थोडं अवघडच होतं. कारण, इतर मंडळींना या अतिहळव्या मंडळींशी नक्की कसं वागायचं, हे कळत नाही आणि मोकळेपणे वागता येत नाही. लोक चक्कं घाबरूनच वागतात. कशाने काय बिनसेल, सांगता येत नाही. या दबावाखाली मित्रमंडळी अनेक गोष्टी जरा जपूनच आणि लपूनच करतात. त्यामुळे अनेकदा होतं काय की, या मंडळींची मैत्री, रोमॅन्टिक नाती नाजूक होतात. ही मंडळी पार्टी, पिकनिक अशा ठिकाणी खूप उद्दीपित वातावरणात असल्याने बर्‍यापैकी अस्वस्थ राहतात. लोकांना ती ‘माणूसघाणी’ वाटतात. ही मंडळी नात्यांचा आदर करतात, पण त्यांना ते उघडपणे व्यक्त करता येत नाही.
 
 
 
 
पार्टीत किंवा गेटटूगेदरमध्ये ही अतिहळवी मंंडळी एकटीच बसलेली दिसतात. याचं कारण तेथील उन्माद त्यांना सहन होत नाही. एवढंच नसून तिथे उपस्थित मंडळी आपल्याला समजून न घेता वेड्यात काढतील, हेही आहे. या अतिहळव्या व्यक्ती इतर व्यक्तींच्या सामान्य कृती, गरजा दुसर्‍याबद्दलच्या भावना आणि संवादशैलीमध्येही खूप ‘किंतू’ काढत राहतात. एखाद्याला नाही म्हणणे त्यांना जितके गरजेचे वाटते तितकेच आव्हानात्मक वाटते. म्हणजे त्यांना आपल्या मित्रमंडळींची निराशा पाहायलाही आवडत नाही आणि स्वतःचे खच्चीकरणही आवडत नाही, ही गोष्ट इतर लोकांना समजून घेण्यासाठी क्लिष्ट आहे. आपण बर्‍याच वेळा या व्यक्तींना लाजाळू समजतो किंवा कायम विरोध करीत राहणार्‍या म्हणून समजतो. पण, या दोन्ही गोष्टी आपण नंतर सामाजिकीकरणातून शिकतो. त्या आपल्या अनुभवातून घडत जातात. हळवेपणाही आपल्याला निसर्गदत्त देणगी आहे. ती जन्मजात स्वभावप्रवृत्ती आहे. पुढील लेखात आपण या व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यांबद्दल अधिक माहिती पाहू. (क्रमश:)
 
 
- डॉ. शुभांगी पारकर
 
 
 
Powered By Sangraha 9.0