मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट ‘श्रीकाशी विश्वनाथ कॉरिडोर’ला मिळणार भव्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2021
Total Views |

Kashi _1  H x W
 


‘वक्फ बोर्डा’कडून १,७०० चौरस फूट जमीन हस्तांतरित, मंदिर प्रशासनातर्फे ‘वक्फ बोर्डा’ला १ हजार चौरस फूट जमीन प्रदान


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या ‘श्रीकाशी विश्वनाथ कॉरिडोर’ला भव्यता प्रदान करण्यासाठी वाराणसी येथे ‘सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डा’ने ज्ञानव्यापी मशिदीजवळची १,७०० चौरस फूट जमीन दिली आहे. त्याबदल्यात ‘वक्फ बोर्डा’ला मंदिर प्रशासनाने एक हजार चौरस फूट जमीन अन्यत्र प्रदान केली आहे. काशी विश्वनाथ-ज्ञानव्यापी मशिदीचे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असताना ‘वक्फ बोर्डा’ची भूमिका विशेष ठरली आहे.


वाराणसी मतदारसंघाचे खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भव्य अशा ‘श्रीकाशी विश्वनाथ कॉरिडोर’निर्माणाचा संकल्प सोडला आहे. याअंतर्गत श्रीकाशी विश्वनाथ मंदिर परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे. आपला ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असल्याने पंतप्रधानांचेही त्याकडे विशेष लक्ष आहे. सदर प्रकल्पाच्या विकासासाठी मंदिराच्या आसपासची जमीन हस्तांतरित करून घेणे अथवा विकत घेण्याची प्रक्रिया मंदिर प्रशासनाकडून सुरू आहे.


त्या पार्श्वभूमीवर ज्ञानव्यापी मशिदीजवळ असलेल्या ‘अंजुमन इंतजामिया मशिदी’ने १,७०० चौरस फूट जागा मंदिर प्रशासनास देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मंदिर प्रशासन आणि ‘सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड’ यांच्यादरम्यान ‘एक्सचेंज ऑफ प्रॉपर्टी’ नियमांतर्गत जमिनीचे हस्तांतर शुक्रवारी करण्यात आले. मंदिर प्रशासनानेदेखील बांसफाटक येथील एक हजार चौरस फूट जमिनी ‘वक्फ बोर्डा’ला हस्तांतरित केली.


या सर्व व्यवहारामध्ये ९.२९ लाख रुपयांची ‘स्टम्ॅप ड्युटी’ही चुकविण्यात आली आहे. ज्ञानव्यापी मशिदीपासून केवळ सव्वाशे फूट अंतरावर असलेल्या ‘वक्फ बोर्डा’च्या जमिनीवर ‘काशी कॉरिडोर’ प्रकल्पांतर्गत सुरक्षा टेहळणी इमारत उभारली जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘कॉरिडोर’ निर्माणात आडकाठी ठरणार्‍या जमिनीविषयी दोन्ही पक्षांनी दीर्घ चर्चेअंती हा निर्णय घेतला आहे.


अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणेच वाराणसी येथील श्रीकाशी विश्वनाथ-ज्ञानव्यापी मशीद प्रकरणही सध्या न्यायप्रविष्ट आहे. स्वयंभू भगवान काशी विश्वनाथ आणि मंदिर प्रशासन विरुद्ध ‘सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड’ व ‘अंजुमन इंतजामिया कमिटी’ हे दोन पक्षकार या खटला लढवत आहेत. स्थानिक न्यायालयाने ज्ञानव्यापी परिसराचे पुरातत्त्व उत्खनन करण्याचे आदेश दिले आहेत.


त्या पार्श्वभूमीवर ‘श्रीकाशी विश्वनाथ कॉरिडोर’ प्रकरणाच्या विकासामध्ये ‘सुन्नी वक्फ बोर्डा’ने घेतलेली भूमिका ही महत्त्वाची ठरते. मूळ श्रीकाशी विश्वनाथ मंदिराची असलेली ज्ञानव्यापी मशिदीची जागा मुस्लीम पक्षाने सामोपचाराने हिंदू समाजास द्यावी, असे प्रयत्न अनेकदा करण्यात आले आहेत. त्यामुळे ‘कॉरिडोर’ निर्मितीमध्ये ‘वक्फ बोर्डा’ने घेतलेली भूमिका अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरते.




@@AUTHORINFO_V1@@