चंदेरी तेजाची न्यारी मीराबाई...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2021
Total Views |

meerabai chanu_1 &nb
 
 
 
टोकियो (संदीप चव्हाण) : ‘अपयशापाशी जो थांबतो तो हरतो... जो त्यातून पेटून उठतो तो इतिहास घडवतो.’ मीराबाईने आज ‘ऑलिम्पिक’चे ‘सिल्व्हर’ मेडल जिंकून नवा इतिहास घडवलाय. एकदा का तुमच्यावर अपयशाचा शिक्का बसला की, अवघे जग तुम्हाला नजरअंदाज करते... अगदी मीराबाईची लढत सुरू असेपर्यंत तिच्याबाबत असेच सुरू होते. आज तिच्या या यशाचे कौतुक करायलासुद्धा भारतीय पत्रकारांपैकी मी आणि माझ्या आग्रहामुळे माझ्यासोबत आलेला माझा सहकारी, असे आम्ही दोघेच होतो. संपूर्ण भारतीय मीडिया शूटिंगमधील मेडल मिळणार असे ठरवून तेथे होते. पण, दुर्लक्षित मीराबाईने इतिहास घडविला आणि क्षणात ती भारताची ‘आयडॉल’ बनली. तिच्या या चंदेरी यशाची सुरुवात झाली ती चार वर्षांपूर्वीच्या त्या अपमानास्पद घटनेने. मी त्या घटनेचा साक्षीदार होतो. मीराबाईच्या जागी अन्य कुणी असते तर मोडून पडले असते. पण, मीराबाईने ताठ मानेने त्या अपमानाचा मुकाबला केला.
 
 
 
चार वर्षांपूर्वी मी ‘रिओ ऑलिम्पिक’मध्ये चानूची मॅच पाहायला गेलो होतो. ‘रिओ ऑलिम्पिक’मध्ये ‘क्लीन’ आणि ‘जर्क’मध्ये तिला एकही यशस्वी लिफ्ट करता आली नव्हती. ‘ऑलिम्पिक’ला जाणार्‍या खेळाडूकडून इतकी मोठी चूक कशी होऊ शकते, यासाठी तिच्यावर अपमानास्पद टीकाही झाली होती. तिच्यासहितच ‘वेटलिफ्टिंग’चीही टिंगल उडवण्यात आली होती. ‘वेटलिफ्टिंग’ला ‘भारोत्तोलन’ असेही म्हणतात. “हे ‘वेटलिफ्टर’ म्हणजे भारतीय ‘ऑलिम्पिक’ पथकाला भार झालेत,” अशीही टीका त्यांच्यावर करण्यात आली होती. मीराबाई या अपमानाने पेटून उठली. ‘ऑलिम्पिक’आधी झालेल्या ‘वर्ल्डकप’ स्पर्धेत मीराबाईने याच ‘क्लीन’ आणि ‘जर्क’मध्ये ११९ किलोचे वजन उचलून नवा ‘वर्ल्डरेकॉर्ड’ केला. आज तिने ‘क्लीन’ आणि ‘जर्क’मध्ये ११५ किलो आणि ‘स्नॅच’मध्ये ८७ किलो असे एकूण २०२ किलोचे वजन उचलले. अवघ्या आठ किलोच्या फरकाने चीनच्या होऊ झिहूईने (२१०) ‘टोकियो ऑलिम्पिक’चे सुववर्ण पदक जिंकले.
 
 
 
यंदाही ‘वेटलिफ्टिंग’मध्ये पुरुष आणि महिलांमध्ये टोकियोसाठी पात्र ठरलेली मीराबाई ही एकमेव खेळाडू आहे. थोडक्यात, १०० टक्के यश या खेळाने भारताला दिले. ‘वेटलिफ्टिंग’मध्ये २१ वर्षांपूर्वी कर्णम मल्लेश्वरीने भारताला ‘ब्राँझ’ पदक जिंकून दिले होते. वैयक्तिक खेळातील महिलांचे ते पहिले पदक ठरले होते. मीराबाईने ‘सिल्व्हर’ पदक जिंकत त्याला आणखीन उंची गाठून दिली. ‘बॅडमिंटन’पटू सिंधूनंतर ‘ऑलिम्पिक’चे ‘सिल्व्हर’ पदक जिंकणारी ती अवघी दुसरी खेळाडू ठरलीय.
 
 
 
मणिपूरच्या खेड्यात वाढलेली मीराबाई लहानपणी आपल्या मोठ्या भावासोबत चुलीसाठी सरपण गोळा करण्यासाठी जंगलात जायची. तेव्हाही ती भावापेक्षा जास्त वजन उचलून घेऊन यायची. पुरुषांपेक्षा आपण कमी नाही दाखवून द्यायची. मीराबाईला तेव्हापासूनच जिद्द होती. याच जिद्दीने तिने ‘ऑलिम्पिक’च्या ‘सिल्व्हर’ पदकाला गवसणी घातली. मीराबाईच्या या यशामुळे भारतीय महिलांच्या जागतिक दर्जावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. पण, त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतातील विविध क्षेत्रातील स्वतःला सिद्ध करू पाहणार्‍या असंख्य मीराबाईंना प्रेरणा मिळालीय, एवढे नक्की!
 
 
 
मॅच संपल्यानंतर आम्ही तिला विचारले की, “यापूर्वी मेरी कोमने ‘लंडन ऑलिम्पिक’मध्ये ‘बॉक्सिंग’मध्ये भारताला पदक जिंकून दिले होते. त्यामुळे मेरी कोम ही मणिपूरची ओळख बनली होती. आता तिने ऐतिहासिक ‘सिल्व्हर’ पदक जिंकल्यामुळे तिच्या नावाने मणिपूर ओळखले जाईल... कसं वाटते ?” यावर तिचे उत्तर खूप काही सांगून जाणारे होते. मीराबाई म्हणाली, “मेरी कोम दीदीनं आम्हाला ‘ऑलिम्पिक’चे पदक जिंकता येते, हे दाखवून दिलं. माझ्यासारख्या मुलीला तिनं विश्वास दिला म्हणूनच मी हे पदक जिंकू शकले. यापुढेही मणिपूरची ओळख ही मेरी कोमचे मणिपूर म्हणून आम्ही अभिमानानं मिरवू.” एका खेळाडूची दुसर्‍या खेळाडूप्रति असेलेली ही खेळभावनाच ‘ऑलिम्पिक’ला एक उंची गाठून देते.
 
 
 
‘ग्रेस नोट’ या अमेरिकेच्या प्रसिद्ध सांख्यकी कंपनीनं तीन दिवसांपूर्वीच भारत यंदाच्या ‘ऑलिम्पिक’मध्ये १९ पदक जिंकेल, असा अंदाज वर्तवला होता. त्यात ‘वेटलिफ्टिंग’मधील एकमेव खेळाडू असणारी मीराबाई ‘ब्राँझ’ पदक जिंकेल, असे भाकित वर्तवले होते. भारतीयांना भलेही मीराबाईवर विश्वास नव्हता. पण, अमेरिकन कंपनीने तिच्यावर डाव लावला होता. मीराबाईने अमेरिकन कंपनीच्या एक पाऊल पुढे जात ‘ब्राँझ’एवेजी ‘सिल्व्हर’ पदक जिंकलेय. ‘ऑलिम्पिक’च्या पहिल्या दिवशी भारताला पदक मिळण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ ठरलीय. थोडक्यात ही तर एक झलक आहे पिक्चर अजून बाकी आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@