‘निकाल’ लागला, पण दहावीचा की शिक्षणाचा?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2021
Total Views |

SSC result_1  H
 
सध्याची परिस्थिती ‘न भूतो, न भविष्यती’ अशी आहे हे मान्य केले, तरी प्रत्येक समस्येला उत्तर असतेच. त्यासाठी सर्वच ज्ञानी एकत्र येण्याची गरज आहे. वेगवेगळे पर्याय शोधणे, प्रत्येक पर्यायाची चिकित्सक छाननी करून त्यातील चांगल्या-वाईट परिणामावर चर्चा करणे, अवती-भवतीच्या वेगवेगळ्या स्थळ-काळाचा विचार करून त्यातल्या त्यात उत्तम पर्यायाचा शोध घेणे, धरसोड वृत्ती सोडून निर्णयावर ठाम राहणे अन् सरतेशेवटी बर्‍या-वाईट परिणामासाठी सर्वांनी तयार राहणे, रिस्क घेणे, अशा मार्गांनी समस्या सोडविणे हाच एकमेव उपाय दिसतो.
 
 
 
महाराष्ट्र बोर्डाने एकदाचा निकाल लावला. पण, तो दहावीचा की, एकूणच शिक्षण व्यवस्थेचा, हा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती आहे. हा निकाल टीव्हीवर घोषित करणार्‍या अधिकार्‍याने किंवा संबंधितांनी, जर स्वतःची दहावीची गुणपत्रिका पहिली अन् त्या वर्षीचे दहावीचे बोर्डाचे निकाल आठवले, तरी आपण जे काही करतो आहोत, ते किती हास्यास्पद आहे, हे त्यांचे त्यांनाच कळेल! काही जखमा या तात्पुरत्या असतात. कालांतराने त्या भरून निघतात. पण, शिक्षणखात्याचे जे काही धरसोड धोरण चालले आहे, ते दूरवर परिणाम करणारे आहे. एकदा काही सवलती दिल्यात की, तेच उदाहरण घेऊन पुढे त्याच सवलती पुन्हा पुन्हा द्यायला भाग पाडणे, हे आपल्याकडे सर्रास चालते.
 
 
 
या दहावीच्या निकालात शेकडो विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. त्यांचे अन् त्यांच्या पालकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच! कुणीतरी या व नव्वदी पार केलेल्या सर्वांचे यापुढील प्रगतीचे, प्रतिभेचे संशोधन करावे. हवे तर विद्यापीठातील एखाद्या अध्यासन केंद्राने यावर प्रकल्प हाती घ्यावा. म्हणजे किती मुले भविष्यात गुणांचे, प्रतिभेचे सातत्य ठेवतात, हेही समाजाला कळेल.
 
 
 
गुणांची किती अन् कशी खैरात करावी, यालादेखील मर्यादा हव्यात. त्यात काहीतरी तार्किक तारतम्य हवे. खेळ, कला यातील प्रावीण्यासाठी गुणांची उधळण करण्यात आली आहे. कोरोनाकाळात हे प्रावीण्य कुणी, कसे, कुठे मिळवले हे देव जाणे! ज्या परीक्षा झाल्या, त्या विद्यार्थ्यांनी घरी बसून दिल्या. यासंदर्भात मी नात्यातील काही विद्यार्थ्यांशी मनमोकळी चर्चा केली. या परीक्षेत कुठेही बोर्डाच्या रेग्युलर परीक्षेसारखे गांभीर्य नव्हते. कॉपीला भरपूर वाव होता. बोर्डाच्या नियमित परीक्षेतदेखील विद्यार्थी कसे कॉपी करतात, त्यांना पर्यवेक्षकांची, शिक्षकाची कशी साथ असते, हे आपण टीव्हीवरील बातम्यांत प्रत्यक्ष बघतो. जर प्रत्यक्ष परीक्षेत सर्रास कॉप्या चालतात, तर या नाटकी ‘ऑनलाईन’ परीक्षेत किती गांभीर्य, किती खरेपणा असेल याची आपण कल्पनाच करू शकतो. सध्या टीव्हीवर सुरू असलेल्या ‘स्वाभिमान’ मालिकेत संस्था चालकाची मुलगी, तिचे मित्र कॉपी करताना दाखवले आहेत. शिवाय, ते आळ मात्र दुसर्‍या प्रामाणिक मुलीवर (नायिकेवर), आणतात! हा खोटेपणा फक्त छोट्या पडद्यापुरता मर्यादित नाही, तर ती ‘घर घर की कहानी‘ आहे.
 
 
 
सध्या कोरोना परिस्थितीचे गांभीर्य जगभर सर्वश्रुत आहे. ती एकट्या भारत देशाची किंवा महाराष्ट्राची समस्या नाही. भारतातील किंवा महाराष्ट्रातील कुणा शिक्षणतज्ज्ञाने, अधिकार्‍याने मंत्र्याने याबाबतीत इतर देशात काय चालले आहे, तिथले शिक्षण, परीक्षा, मूल्यमापन कसे केले जाते, याचा अभ्यास केला आहे का? शंका आहे. एरवी प्रत्येक वेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना, ‘समिती नेमली आहे, अहवाल मिळाला आहे, त्याचा आम्ही अभ्यास करीत आहोत,‘ अशी छापील, ठोकळेबाज उत्तरं अधिकारी, मंत्री देतात. पण, ही मंडळी नेमका काय अन् कशाचा अभ्यास करतात, हे शेवटपर्यंत कळत नाही! कारण, त्यांना स्वतःला परीक्षेला बसायचे नसते. ते पाच वर्षांतून एकदाच परीक्षेत बसतात अन् त्या परीक्षेचा अभ्यास, त्याचे मतांचे गणित, यात ते चांगलेच तरबेज, मेरिटचे विद्यार्थी असतात! म्हणून तर निवडून मेरिट लिस्टमध्ये येतात! गंभीर विवेचनाला थोडी विनोदाची फोडणी हवी म्हणून हे लिहिले. यात कुणालाही दुखवायचा हेतू नाही.
 
 
 
आता दहावीनंतर पुढे अ‍ॅडमिशनसाठी ‘सीईटी’ घेण्यात येणार आहे. जर ‘सीईटी’ घेण्याचा निर्णय झालाच होता, तर त्याच पद्धतीत थोडे फेरफार करून बोर्डाची परीक्षादेखील सहज घेता आली असती. प्रस्तुत लेखकाने त्यावर याच माध्यमातून आधीच उपाय सुचविलादेखील आहे. पण, लक्षात कोण घेतो? ह. ना. आपट्यांचे हे वचन इतक्या दशकानंतरदेखील आजही लागू पडते! काही मोठे लेखक किती द्रष्टे असतात बघा!
 
 
 
एरवी पुढील शिक्षणासाठी म्हणा, करिअरसाठी म्हणा, दहावी, बारावी, बोर्डाचे मार्क्स पाहिले जातात. बोर्डाच्या मार्कांचे महत्त्व पूर्वीतरी अधोरेखित होते. आता अशी गुणांची उधळण झाल्यामुळे या बोर्डाच्या निकालाकडे जाणकार ढुंकूनही बघणार नाहीत! ते 90-100 टक्के दर्शनीय आकडे म्हणून कागदावरच राहतील. हे सगळे शिक्षकांना कळते, विद्यार्थ्यांना, पालकांनाही कळते, सरकारला कळते, अधिकार्‍यांना कळते, पण वळत नाही! एरवी फीवाढीविरोधात आंदोलन करणार्‍या पालकांनीही गुण उधळण नको म्हणून मोर्चे काढले असते. आश्चर्य म्हणजे कुणीदेखील या लुटीविरुद्ध ब्र काढलेला नाही. म्हणजे इतर वर्गाबरोबर पालकांचीदेखील या गुण उधळण प्रक्रियेला संमती समजायची का? तसे असेल तर ते सामाजिक अवनतीचे लक्षण आहे!
 
 
 
सध्याची परिस्थिती ‘न भूतो, न भविष्यती’ अशी आहे हे मान्य केले, तरी प्रत्येक समस्येला उत्तर असतेच. त्यासाठी सर्वच ज्ञानी एकत्र येण्याची गरज आहे. वेगवेगळे पर्याय शोधणे, प्रत्येक पर्यायाची चिकित्सक छाननी करून त्यातील चांगल्या-वाईट परिणामावर चर्चा करणे, अवती-भवतीच्या वेगवेगळ्या स्थळ-काळाचा विचार करून त्यातल्या त्यात उत्तम पर्यायाचा शोध घेणे, धरसोड वृत्ती सोडून निर्णयावर ठाम राहणे अन् सरतेशेवटी बर्‍या-वाईट परिणामासाठी सर्वांनी तयार राहणे, रिस्क घेणे, अशा मार्गांनी समस्या सोडविणे हाच एकमेव उपाय दिसतो. त्यासाठी लागणार्‍या तज्ज्ञांची, मनुष्यबळाची आपल्याकडे कमी नाही, असे निर्णय घ्यायला धैर्य, इच्छाशक्ती लागते. चमचेगिरी करणार्‍याकडून काही होणार नाही. आपली शक्ती भलतीकडेच खर्ची होते आहे. ‘सीडी’, ‘ईडी’, ‘सीआयडी’च्या मोहिमा गरजेच्या असतीलही. पण, त्याहीपेक्षा शिक्षण, आरोग्याचे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत, हे राज्य/केंद्र सरकारने विसरता कामा नये. नुकतेच एका युट्यूब चॅनेलवर, दुकानदार 4च्या नंतर शटर चालू ठेवण्यासाठी पोलिसांशी कशी देवघेव करतात याबद्दलचा गौप्यस्फोट पहिला! एरवी शाळा, कॉलेज बंद असताना काही ठिकाणी ट्युशन क्लासेस (त्याच गर्दीच्या संख्येने, कोरोना नियम न पाळता), कसे चालतात? त्यासाठी कशी देवघेव सुरू आहे? हेही उजेडात यायला हवे. अवैध ट्युशन क्लासेस हा सर्रास चाललेला व्यापारच आहे. शाळा, कॉलेजात पाठविण्याऐवजी, तेथील हजेरीविषयी बेफिकीर असणारे पालक या क्लासेससाठी लाखो रुपयांचे पॅकेज मोजतात! हेही गणित, ही मनोवृत्ती म्या पामराला न समजणारी आहे. याबाबतीत आम्ही सुशिक्षित असूनही अनाडी आहोत!
 
 
 
जहाज भरकटले आहे, अवती-भवती तुफान, वादळ घोंघावते आहे. प्रत्येकाच्या मनात भीती आहे, काळजी आहे, हे सारे खरे. पण, यातूनच आपल्याला धैर्याने मार्ग काढायचा आहे. किनारा गाठायचा आहे. वादळाशी मुकाबला करीत डगमगणारे जहाज पैलतीरी न्यायचे आहे. त्यासाठी कुणी एकाने हुशारी दाखवून, हिमतीने बळ गोळा करून उपयोगाचे नाही. सर्वांनी एकत्र येऊन ‘सहवीर्यमकरवावहे’, ‘let us do great things together' असा नारा देणे, हा मंत्र जपणे, गरजेचे आहे. गुणांची उधळण करून, कसेतरी एकदाचे निकाल लावून प्रश्न सुटणार नाहीत. आपलाच ‘निकाल’ लागेल!!
 
 
- डॉ. विजय पांढरीपांडे
 
 
@@AUTHORINFO_V1@@