महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी हवी लिंग समानता जागृती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2021
Total Views |

gender_1  H x W
 
 
विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘लिंग समानता जागृती’ या विषयाचा देशभरातल्या महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश केला असल्याचे वृत्त नुकतेच वाचण्यात आले. महिलांबाबत समाजात असलेले रूढीवादी विचार आणि त्यालाच जोडून महिलांकडे पाहण्याचा एकूणच पुरुषप्रधान समाजाचा दुय्यम दृष्टिकोन, यातील नकारात्मकता दूर करण्याच्या हेतूने या खास अनोख्या विषयाचा समावेश अभ्यासक्रमासाठी विशेषत्वाने करण्यात आल्याचे अयोगाच्या वतीने नमूद करण्यात आल्याने साहजिकच या विषयाकडे लक्ष वेधले गेले.
 
 
खरे तर गेले कित्येक दिवस काही सुवार्ता कानी पडलीच नव्हती. कुलूपबंद स्थितीने सगळ्यांच्याच मनावर एक प्रकारचं मळभ दाटून आलेले आहे. त्यातही या आरोग्य संकटकाळात महिलांचे खूप हाल झाले आणि त्यांना मानसिक व शारीरिक छळ सहन करावे लागले, अशा आशयाचे काही अहवालही प्रसिद्ध झाले आहेत. अशी काहीशी निराशाजनक स्थिती भोवती असताना या बातमीने खरोखर आनंद झाला व मनात समाधान दाटून आले.
 
 
 
रोज उठून आपण वर्तमानपत्रात आणि वाहिन्यांवरून ज्या काही बातम्या वाचत-बघत असतो, त्यात जास्तीत जास्त असते ती महिलांची अवहेलना आणि मानहानी. आश्चर्य वाटत राहतं की, एकीकडे समाज किती आधुनिक झालाय, शिकला, सवरला आणि बर्‍याच प्रमाणात संपन्नही झालाय. पण, दुसरीकडे स्त्री मात्र अजूनही या समाजात आपलं स्थान निर्माण करायला धडपडते आहे. संदर्भ बदलले तरी अस्तित्वाचा शोध घेण्याचा तिचा संघर्ष मात्र कायम आहे. उलट या प्रश्नाचे गुंते नव्याने वाढत आहेत. म्हणूनच, अशा सामाजिक ज्वलंत विषयाचा थेट अभ्यासक्रमात समावेश होणे, ही खूप आशादायक गोष्ट घडते आहे. उच्चशिक्षण देणार्‍या विद्यापीठ या महत्त्वाच्या शैक्षणिक यंत्रणेने आजच्या तरुण पिढीला पदवी शिक्षण देताना भेदाभेदांच्या पलीकडे जाणारी जागृती निर्माण करण्यासाठी एक क्रांतिकारी कृतिशील पाऊल उचलले आहे, असे म्हणायला हरकत नाही.
 
 
 
महाविद्यालयात शिकत असणारी तरुण पिढी जर ‘लिंग समानतेचा’ हा विचार एक अभ्यास विषय म्हणून शिकली, तर त्यात एक शिस्त आणि नेमकेपणा येईल. एरव्ही अशाप्रकारचे सामाजिक विषय फक्त महाविद्यालयीन स्तरावर वक्तृत्व स्पर्धा किंवा वादविवाद स्पर्धेसाठी काही जण निवडतात. अशा स्पर्धांमधून बक्षीस वगैरे मिळालं तरी ती स्पर्धा संपली की, तो विषयही संपतो आणि तो विचारही तात्पुरताच ठरतो. पण, अभ्यासक्रमात विषय समाविष्ट केल्याने त्या विषयाचा नीट सांगोपांग अभ्यास, पद्धतशीर व तर्कशुद्ध मांडणी आणि एकूणच सर्व दृष्टिकोनातून या विषयाकडे पाहाण्याची विद्यार्थ्यांना आपोआप सवय लागेल.
 
 
 
स्त्री-पुरुष भेदाभेद हा फार पूर्वी म्हणजे अगदी प्राचीन काळी आपल्याकडे नव्हता, अनेक शूरवीर आणि विद्वान स्त्रियांची उदाहरणे प्राचीन आणि इतिहास काळात प्रसिद्ध आहेत. या महिलांना याच इथल्या समाजाने आदराची वागणूक दिली होती आणि समान संधीचं अवकाशही त्यांच्यासाठी मोकळं होतं, अगदी अलीकडची म्हणता येईल अशी संत परंपरेतील संत कवयित्रींची उदाहरणेही या विषयाची पुष्टी करतात. मुळात स्त्री-पुरुष भेदभाव हा बौद्धिक आणि क्षमतांची तुलना करून कमी-जास्त, श्रेष्ठ-कनिष्ठ या निकषावर तोलला जाऊ नये, ही गोष्ट प्रथमतः आजच्या पिढीच्या मनावर प्राधान्याने बिंबवली जायला हवी. तेच काम या अभ्यासक्रमाने साध्य होईल, असे वाटते.
 
 
 
 
आपला सगळा सामाजिक इतिहास, वाङ् मयीन इतिहास मुळातून समजून घेणे आणि त्याची कारणमीमांसा उलगडून बघणे हे अभ्यासातून घडून येईल, अशी अपेक्षा आहे. हे जर घडले तर विद्यार्थ्यांना मुलींकडे पाहण्याचा नवा पैलू समजेल आणि स्वतः मुलींनाही आपल्या सामर्थ्याची जाणीव व्हायला मदत होईल. त्यामुळे अर्थातच विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडताना या विषयाकडे बघण्याचा एक निश्चित सकारात्मक व परिणामकारक विचार घेऊनच ही पिढी बाहेर पडेल. हीच तरुण सुशिक्षित पिढी समाजातल्या सर्व वर्गातील स्त्रियांकडे बघण्याची एक नवी दृष्टी घेऊन तिला समानतेने आदराचे स्थान समाजात मिळावे, अशी जनजागृती घडवून आणण्यासाठी पुढे येईल, अशी खात्री वाटते आहे.
 
 
 
गेली कित्येक युगं, वर्षानुवर्ष आपला समाज महिलांबाबत दुटप्पी भूमिकेत वागतो आहे. एकीकडे तिला देवी म्हणून आदरणीय उच्चस्थानी बसवलं जातं. माता म्हणून तिचे गोडवे गायिले जातात. पण, प्रत्यक्ष व्यवहारात जगताना कुटुंबात मात्र तिला दुय्यम स्थानीच ठेवलं जातं, असा सर्वसामान्य अनुभव आहे. काही सुधारणावादी विचारांच्या कुटुंबाचा अपवाद वगळता, कुठल्याही महत्त्वाच्या निर्णयात तिला सहभागी करून घेण्याची आवश्यकता घरातील पुरुषवर्गाला वाटत नाही, हे वास्तव मोठ्या प्रमाणात आढळून येतं. काही ठिकाणी स्त्रियाच स्त्रियांचं खच्चीकरण करतात, तर काही ठिकाणी स्त्रीच स्वतःला मागे ठेवू पाहते, हेच सर्वसाधारण चित्र ग्रामीणच नव्हे, तर शहरी आणि सुशिक्षित म्हणवल्या जाणार्‍या सर्व वर्गात, सर्वस्तरात बघायला मिळतं.
 
 
 
आज सुधारलेल्या एकविसाव्या शतकातलं हे वास्तव स्वीकारायला अवघड वाटलं तरी हेच सत्य आहे. त्यातही दुर्दैव म्हणजे, आजची स्त्री सर्व क्षेत्रात यशस्वी ठरते आहे. कष्टपूर्वक आपलं भवितव्य घडवते आहे. शिक्षण आणि उच्चशिक्षणामध्ये नवनवे उच्चांक प्रस्थापित करते आहे. पण, अजूनही स्त्रीला तिच्या योग्यतेचा सन्मान, आदर व समान संधी दिली जात नाही. अधिकारपदे मिळाली तरी सर्वार्थाने अधिकार; पण मिळतीलच असं नाही. तिथेही दुय्यम स्वरूपाच्या जबाबदार्‍या दिल्या जातात.
 
 
तीच गोष्ट नोकरी करून अर्थार्जन करणार्‍या सर्वच महिलांची आहे. घरात तिला आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य नसतेच. तिला गृहीत धरून कुटुंबप्रमुख पुरुषवर्ग हा हक्क बिनधास्तपणे स्वतःकडेच ठेवतात. कुटुंबाचे आर्थिक निर्णय परस्पर घेतले जातात. कित्येकदा ती फक्त सहीपुरतीच उरते!
 
 
 
यातली मजेशीर म्हणावी अशी बाजू म्हणजे, आर्थिक बाबतीत अजूनही कित्येक स्त्रिया स्वतःच हे दुय्यम स्थान स्वीकारताना दिसतात. आर्थिक व्यवहार वडिलांनी, पतीने किंवा भावाने बघणे म्हणजे सर्वात सुरक्षित, असे तिला वाटते, त्याला कारण महिलांच्या मनावर असणारे पारंपरिक संस्कार! त्यागाची भावना भारतीय स्त्रीमध्ये मुळातच असते, ती कुटुंबाच्या भल्यासाठीच सार्‍या लढाया लढत असते. म्हणूनच, आर्थिक स्वातंत्र्य मिळायलाच हवे, अशी तिची फारशी तक्रार नसते. पण, तिला खरं दुःख त्याचवेळी होतं, जेव्हा श्रेय देताना तिला डावललं जातं किंवा तिच्यातल्या क्षमता व गुणवत्ता नाकारून तिला समान संधी दिली जात नाही. याला कारण तेच आहे की, ‘लिंगसमानता‘ ही संकल्पनाच आपल्या समाजात रुजलेली नाही. कारण, पुरुष कुणीतरी विशेष आणि स्त्री म्हणजे दुबळी, अबला या कल्पनेत अजूनही आपण रमतो.
 
 
 
कधी कधी तर स्त्रियाच या संकल्पनेला खतपाणी घालताना दिसतात. या सर्व गोष्टी जेव्हा घराच्या आत असतात, तोपर्यंत स्त्रियांना त्याची फारशी झळ पोहोचत नाही. पण, स्त्री जेव्हा काही कारणाने घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडते, तेव्हा या उघड्या जगात मात्र तिला असमानतेच्या या दृष्टिकोनाचा चांगलाच दाह जाणवतो. इथे सर्वात जास्त महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो, तो स्त्रीच्या सन्मानाचा! तिला अजूनही समाजाने एक व्यक्ती म्हणून स्वीकारलेलं नाही, तर तिच्याकडे एक स्त्रीदेह म्हणूनच पाहिलं जातं, हा अनुभव महिलांना विद्ध करून जातो. एक आई, पत्नी, बहीण, मुलगी अशा भूमिकेत स्वतःला कसोशीने सिद्ध करणार्‍या स्त्रीला घराबाहेर जेव्हा नको त्या नजरा, शेरेबाजी व कित्येकदा स्पष्ट भोगवादी अपेक्षा यांचा सामना करावा लागतो, तेव्हा तिला मेल्याहून मेल्यासारखं होतं! कारण, ती स्वतः पुरुषांकडे बंधुभावाने किंवा वयाने ज्येष्ठ असणार्‍या व्यक्तींकडे आदराने बघण्याच्या प्रयत्नात असते. अशावेळी तिला समोरून मिळणारा प्रतिसाद धक्कादायक आणि वेदनादायक असतो. याच कारणास्तव अनेक स्त्रिया आपलं चांगलं करिअर सोडून घरी बसतात. किंबहुना, त्यांना तसं बसवलं जातं!
 
 
 
या पार्श्वभूमीवर लिंगसमानतेचा विचार शिक्षणातून मेंदूत आणि तिथून मनात रुजवण्यासाठी व पुढे त्याचे समाजात प्रक्षेपण होण्यासाठी विद्यापीठ आयोगाने अभ्यासक्रमात असा विषय समाविष्ट करणे, हे आजच्या कर्तृत्ववान स्त्रीसाठी मानाचे पानच आहे. स्त्री-पुरुष भेदभाव व उच्च-नीचतेची कल्पना ज्यावेळी या समाजातून हद्दपार होईल, त्यावेळी स्त्री खर्‍या अर्थाने स्वतंत्र व सुखी होईल आणि आपण नेहमी भाषणात फक्त म्हणतो तसं, सुखी स्त्री कुटुंबाला आणि पर्यायाने समाजाला सुखी ठेवील. पण, भाषणात तोंडी लावण्याचे हे शब्द खरे होण्याची शक्यता आता यानिमित्त निर्माण झाली आहे. सामाजिकदृष्ट्या समंजस व बहुमोल अशा या विद्यापीठ आयोगाच्या कृतीचं सर्वस्तरातून स्वागत व्हायला हवं आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही हा विषय फक्त गुणांपुरता न अभ्यासता अभ्यासाबरोबरच मनन-चिंतन-विचार-विनिमय या पातळीवर न्यायला हवा, तरच तो विषय फक्त पुस्तकातच न राहता मनापासून तो आत्मसात केला जाईल, प्रत्यक्ष आचरणात आणला जाईल. असं अपेक्षित ते घडलं, तर महिलांना ती स्त्री आहे म्हणजे काहीही कमी नाही, काहीही बिघडलेलं नाही, हा सुखद अनुभव एखाद्या सुखद स्वप्नासारखा प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल.
 
 
आपल्या समाजाला भावनिक आणि वैचारिक दृष्टीने सुदृढ करण्यासाठी, एक चांगली संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने तर पाऊल उचलले आहे. या कल्पनेचा विस्तार पाहण्याचं भाग्य या नाही तर पुढच्या पिढीला तरी मिळेल आणि भविष्यात या विषयातली जागृती नक्की होईल अशी आशा करू या..!
- अमृता खाकुर्डीकर
 
 
@@AUTHORINFO_V1@@