आनंदाचे आवारू - श्रीमद्भागवत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2021
Total Views |

Bhagvat Geeta_1 &nbs
 
आमचे वडील कै. मधुकरराव महाजन यांनी ‘पीएच.डी.’च्या अभ्यासासाठी श्रीमद्भागवत कथा, काव्य आणि तत्त्वज्ञान यावर विस्तृत टिपणे काढली होती. तात्या गेल्यानंतर २३ वर्षांनी मी ती टिपणे बाहेर काढली. त्यावेळी मी ‘पीएच.डी.’नंतर घेतलेल्या एका संशोधन प्रकल्पासाठी, इ. स.१७५३ मध्ये मराठवाड्यातील सिद्धकवी यांनी लिहिलेल्या, ‘कृष्णामृतनट’ या ३८,७३२ ओव्यांच्या हस्तलिखितांचे संशोधन व संपादन करीत होते. त्यामध्ये विष्णूचे अवतार, रामायण, महाभारत, भारतीय तत्त्वज्ञान यावर टीका आहे. त्याचबरोबर भागवतातील ओव्यांसाठी ओवीबद्ध स्पष्टीकरणे आहेत. त्यावेळी मूळ भागवत वाचण्याची उत्सुकता वाढली.
 
प्राचीन काळापासून भरतखंडातील ऋषी-मुनी आपल्या स्वानुभवातून सांगत आहेत की, सतचित आनंदाचे स्थान, प्रापंचिक सुख-दुःखाच्या पलीकडे आहे. या आनंदाच्या आवारात स्वैरसंचार करण्याचा सुलभ मार्ग म्हणजे श्रीमद्भागवत कथा होय. आमचे वडील कै. मधुकरराव महाजन यांनी ‘पीएच.डी.’च्या अभ्यासासाठी श्रीमद्भागवत कथा, काव्य आणि तत्त्वज्ञान यावर विस्तृत टिपणे काढली होती. तात्या गेल्यानंतर २३ वर्षांनी मी ती टिपणे बाहेर काढली. त्यावेळी मी ‘पीएच.डी.’नंतर घेतलेल्या एका संशोधन प्रकल्पासाठी, इ. स.१७५३ मध्ये मराठवाड्यातील सिद्धकवी यांनी लिहिलेल्या, ‘कृष्णामृतनट’ या ३८,७३२ ओव्यांच्या हस्तलिखितांचे संशोधन व संपादन करीत होते. त्यामध्ये विष्णूचे अवतार, रामायण, महाभारत, भारतीय तत्त्वज्ञान यावर टीका आहे. त्याचबरोबर भागवतातील ओव्यांसाठी ओवीबद्ध स्पष्टीकरणे आहेत. त्यावेळी मूळ भागवत वाचण्याची उत्सुकता वाढली. मी वडिलांनी-तात्यांनी ‘पीएच.डी.’साठी तयार केलेल्या टिपणांचे हस्तलिखित बाहेर काढले आणि तो खजिना पाहून मी चकित झाले.
 
 
 
भारतीय जनसंघाचा स्थापना दिवस, काश्मीर सत्याग्रह आणि अनेक घटनांच्या नोंदी, स्वतःच्या लेखनाची व बौद्धिक विषयाची, वाचलेल्या पुस्तकांची टिप्पणे यांच्या तात्यांच्या वह्या आहेत. मात्र, या अभ्यासाबद्दल त्यांचे हे एवढेच मनोगत उपलब्ध आहे. मधुकरराव लिहितात, “गुरुवर्य म. माटे यांच्या प्रभावामुळे, महाविद्यालयात शिकत असतानाच मी समाजसेवेच्या भावनेने झपाटला गेलो. त्याचवेळी गुरुवर्य सोनोपंत दांडेकर यांच्याजवळ बसून ज्ञानेश्वरी समजून घेण्याची संधी मिळाल्यामुळे धार्मिक ग्रंथ वाचनाची गोडी लागली. भारतभर प्रवास करीत असताना सर्व प्रांतातून होणार्‍या भागवत सप्ताहातून भारतीय एकात्मतेचे सुंदर दर्शन घडले. ‘आपल्या देवळातून भागवत सप्ताह चालतात, ही देवळे ज्ञानपीठे झाली पाहिजेत,’ या प्रोफेसर डॉ. एम. ए. करंदीकर यांच्या विचाराने मी अंतर्मुख झालो. श्रीमद्भागवत समजून घेताना, विविध भाषांतून उमटणारे भगवंताचे रूप न्याहाळताना ‘भागवताचा हिंदी व मराठी साहित्यावर होणारा परिणाम’ हा विषय निश्चित केला. ही भगवंताची विविध अंगे समजून घेऊन भाविक पुराणाला जात राहिले, तर धर्मग्रंथांकडे पाहण्याचा एक डोळस दृष्टिकोन विकसित होईल, या विचाराने मी प्रा. करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पीएच.डी.’च्या अभ्यासाला प्रारंभ केला.”
 
 
 
भारतीय जनसंघाच्या पूर्णवेळ कामाची जबाबदारी मधुकररावांवर होती. जनसंघाच्या निमित्ताने तत्कालीन विषयावर महाजनांचे लेख प्रकाशित होत होते. त्याचवेळी त्यांचे मार्गदर्शक डॉ. करंदीकरही कामानिमित्त कायमचे दिल्लीनिवासी झाले. त्यामुळे भागवतावरील एवढे मूलगामी आणि विस्तृत काम मात्र त्यांनी बासनात बांधले ते कायमचेच! भारतीय राज्यशास्त्राचे सहलेखक गोपाळराव टोकेकर तात्यांचे हे काम पाहून त्यावेळी अचंबित झाले होते, असे टोकेकरांनी सांगितले. मी मात्र ‘कृष्णमृतनट’च्या निमित्ताने पहिल्यांदाच ते लेखन संशोधकाच्या भूमिकेतून वाचू लागले.
 
 
 
भगवंतावरील टिपणांच्या हस्तलिखितांचे ‘ए ३’ आकाराचे हे तात्यांच्या सुवाच्च अक्षरातील कागद आहेत. भागवतातील कथा, काव्य आणि तत्त्वज्ञान या विषयातील प्रत्येक उदाहरणाचा संदर्भ देणारी तीन स्वतंत्र प्रकरणे आहेत. भागवतात आलेल्या सर्व कथा एका प्रकरणात स्कंधानुसार आहेत. ही केवळ टिपणे असल्यामुळे प्रत्येक कथेची दोन किंवा तीन वाक्यात नोंद आहे. प्रत्येक उदाहरणाचा स्वतंत्र क्रमांक आणि भागवतातील श्लोकाचा संदर्भ आहे. प्रत्येक स्कंधातील महत्त्वाचे विषय आणि तात्यांना जाणवलेली वैशिष्ट्ये स्कंधांची समीक्षाड आलोचना या विभागात फार व्यवस्थितपणे नोंदवले आहेत. माझ्या शोधप्रकल्पाच्या निमित्ताने मला तात्यांनी केलेल्या या अभ्यासामधून श्रीमद्भागवत चांगला समजून घेता आला. कथा व तत्त्वज्ञान चटकन लक्षात आले. तात्यांनी कष्टपूर्वक व नेटकेपणाने केलेले हे लेखन जिज्ञासूंपर्यंत पोहोचले तर त्यांना ते आवडेल, असे मला वाटले. “मराठीची सेवा करून पितृऋणातून मुक्त व्हा,” असे मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष द. पं. जोशी यांनी सांगितले. “मराठीत भागवताच्या सर्व स्कंधांचा असा तुलनात्मक अभ्यास झाला नाही,” असे मला अभ्यासक रा. शं. नगरकर यांनी सांगून, त्यांचे ‘भागवताचा ज्ञानेश्वरीवरील परिणाम’ हे पुस्तक दिले. स्वामी गोविंद देवगिरी यांना हस्तलिखित दाखवले, तेव्हा त्यांनी प्रशंसोद्गार काढले. ५० वर्षांपूर्वी तात्यांनी ठरवलेल्या विषयावर आणि तात्यांच्या पद्धतीने कोणतेही काम मराठीत झाले नव्हते. अशा प्रकारचे हे पहिलेच आणि एकमेव संशोधन आहे, हे जाणून घेतल्यानंतर मी संपादनाचे काम सुरू केले.
 
 
हस्तलिखिताचे स्वरूप
 
 
 
दामोदर सावळाराम आणि कंपनीने प्रकाशित केलेली सार्थ श्रीमद्भागवताची प्रत तात्यांनी प्रमाण मानली आहे. तसेच मूळ टिपणे ५० वर्षांपूर्वीच्या शुद्धलेखन पद्धतीप्रमाणे लिहिली होती. मी नवीन शुद्धलेखनपद्धती वापरली आहे. हिंदी व मराठीमधील भागवतग्रंथांची सूची तात्यांनी केली असून, काही इंग्रजी ग्रंथांची टिपणे आहेत. संदर्भ ग्रंथसूची तसेच विषयसूचीही आहे. अवतारपासून(अ) यज्ञपर्यंत(य-ज्ञ), भागवतात आलेले सर्व विषय आणि त्या विषयासंबंधित भागवतातील उदाहरणांचे संदर्भ, श्लोक क्रमांक यांची यादीही त्यांनी केली आहे. सर्व स्वर आणि क, च, ट, त, प, य या प्रत्येक वर्गातील प्रत्येक अक्षरांच्या शब्दांची सूची स्वतंत्र पाठकोर्‍या कागदांवर लिहून, वापरलेल्या वेगवेगळ्या पाकिटांमध्ये ते कागद व्यवस्थित ठेवलेले होते. या पाकिटांवरील ‘भारतीय जनसंघ जयहिंद बिल्डिंग, भुलेश्वर’, किंवा ‘कथ्थक लॉज, दादर’ हे जनसंघाच्या कार्यालयांचे पत्ते जुन्या कार्यकर्त्यांच्या अनेक आठवणी जागवतील. संपादित ग्रंथात हस्ताक्षराचा नमुना आहे. पण, सूची दिलेल्या नाहीत. भारतीय जनसंघाची महाराष्ट्रात पायाभरणी करताना, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाळजी यांच्यासह सलग दोन-दोन, तीन-तीन महिने दौरे करताना, गोवा विमोचन आणि संयुक्त महाराष्ट्र समितीची जबाबदारी निभावताना, विधानसभा निवडणूक लढवताना हे एवढे मोठे संशोधनकार्य आणि त्याच्या बारकाईने मांडणीचे काम तात्यांनी केव्हा व कसे केले असेल? अद्वितीय आहे सारे! नवा पक्ष आणि नवा संसार दोन्हीचा पाय बळकट करतानाच हा अभ्यासाचा मांड त्यांनी मांडला होता.
 
 
‘श्रीमद्भागवताचा हिंदी आणि मराठी काव्यावर (वाङ्मयावर) झालेल्या परिणामांचा तौलनिक अभ्यास’ या संबंधी तात्यांनी योजलेली मांडणी त्यांच्या हस्ताक्षरात मिळाली....
 
 
१) श्रीमद्भागवताचा परिणाम झालेल्या समान प्रकारच्या रचनांची तुलना,
 
 
 
१ --श्रीमद्भागवताचा मराठी ग्रंथकारांनी केलेला गौरव,
२ --संपूर्ण भागवताच्या भाषांतराचे प्रयत्न,
३ --भागवताच्या काही स्कंधांचा अनुवाद,
४ --भागवतातील कल्पनांच्या आधारे लिहिले गेलेले काव्य,
५ --भागवतातील कथांचा केलेला उपयोग,
६ --भागवतातील सुभाषितवजा श्लोकांचा व शब्दसंहितेचा उपयोग,
७ --भागवतातील श्लोकांचा शब्दशः भाषांतर करून केलेला उपयोग,
८ --भागवतातील रचनापद्धतीचे अनुकरण,
९ --स्वमतसमर्थनार्थ भागवताचा घेतलेला आधार,
१० -भागवतात वर्णन केलेल्या साकार मूर्तिपूजेचा आगामी वाङ्मयावर झालेला परिणाम,
११ -भागवताच्या वृत्त-छंद वैचित्र्याचे अनुकरण,
१२ -द्वैतवाद का अद्वैतवाद,
 
 
 
रचना विस्ताराचा अभ्यास
 
 
 
भावनांचा परिपोष तत्कालीन परिस्थितीच्या परिणामामुळे उत्पन्न झालेली भिन्नता व विविधता. हिंदी आणि मराठी साहित्यावर भागवताचा किती विविध प्रकारे परिणाम होऊ शकतो, याचे चित्र तात्यांच्या डोळ्यासमोर स्पष्ट होते. साहित्यिक, सांस्कृतिक, भाषाशास्त्रीय, असे विविध आयाम या अभ्यासाला लाभले होते. त्या तयारीचा एक भाग म्हणजे कथा, काव्य आणि तत्त्वज्ञान यांची नोंद आणि हे एवढे कामसुद्धा मराठीसाठी मोलाचे ठरले आहे. मी त्या हस्तलिखित नोंदींचे ‘आनंदाचे आवारू-श्रीमद्भागवत : कथा-काव्य-तत्त्वज्ञान’ पुस्तक प्रकाशित केले, त्याचे अभ्यासकांनी खूपच स्वागत केले. हैदराबादचे प्रसिद्ध भागवत अभ्यासक आणि प्रवचनकार हरिभाऊ निठूरकर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात, “मधुकर महाजन यांनी ‘पीएच.डी.’च्या अभ्यासाची पूर्वतयारी म्हणून विषयवार टिपणे तयार केली. निरीक्षणे नोंदवून ठेवली. स्कंध, अध्याय, श्लोक, यांच्या संदर्भासह वर्गवारी केली. अशी विभागणी व मांडणी माझ्या मतानुसार आजपर्यंत कोणीही केलेली नाही. अभ्यासकांस या टिपणांचा उपयोग होईलच, त्याचबरोबर जिज्ञासूंनासुद्धा संपूर्ण भागवताच्या स्वरूपाची कल्पना येईल.”
 
 
 
भागवत ग्रंथाचा आवाका फार मोठा आहे. तात्या कट्टर हिंदुत्वनिष्ठ, पण देवपूजेसारख्या भगवंतभक्तीत रमलेले आम्ही त्यांना कधीच पाहिले नव्हते. या भक्तिप्रधान ग्रंथाची टिपणे म्हणजे साक्षेपी अभ्यासाचे उत्तम उदाहरण आहे. माझ्या ‘पीएच.डी.’च्या पदवीदान समारंभाला आवर्जून उपस्थित राहिल्यानंतर तात्या मला म्हणाले की, “ही पदवी म्हणजे संशोधनाचा प्रारंभ, आता यापुढे संशोधन आणि लेखन वाढवीत नेले पाहिजे.” विशेष म्हणजे, त्यांच्या या अभ्यासाचा उपयोग होईल असा विषय मी घ्यावा, असे त्यांनी मला कधीही सुचवलेसुद्धा नाही. भागवतावरील हे सर्व महत्त्वाचे साहित्य संपादित करणे, हे मोठे आव्हान माझ्यापुढे होते. त्यासाठी माझी मावशी मंजरी ताम्हणकर हिने मला मदत केली. माझी बहीण सुषमा माझ्या पाठीशी होती. तत्त्वज्ञानाच्या टिपणांमधून भागवतातील तत्त्वज्ञानाची ओळख करून देण्याचे काम डॉ. गीता काटे यांनी केले आहे. उपमा अलंकारामधून भागवतातील तत्त्वज्ञान सांगितले आहे, त्यामुळे भागवतातील काव्य सौंदर्याची हजारो उदाहरणे तात्यांनी दिली आहेत. डॉ. सुनंदा टिळक यांनी काव्यसौंदर्याच्या उदाहरणांचे सुंदर विवेचन केले आहे.
 
 
 
या संपादित ग्रंथात ‘गगन चुंबित विस्तार गहन’ या प्रकरणात स्कंधानुसार महत्त्वाच्या कथासंबंधी माहिती मिळते. प्रत्येक स्कंधातील कथेलाही क्रमांक दिले आहेत. त्यावरून आपल्याला प्रत्येक स्कंधात किती कथा आहेत ते समजते. हीच पद्धत काव्य व तत्त्वज्ञान प्रकरणातही आहे. उदा- स्कंध चवथा (९) ४/१३/२५-४० राजश्री अंगराजा - अश्वमेध यज्ञाच्या वेळी हविर्भाव घेण्यास देव येईनात - कारण पुत्र नव्हता - ब्राह्मणांनी शिपीविष्ट विष्णूला पुरोडोश अर्पण केला, तेव्हा त्यापासून पुरुष उत्पन्न होऊन त्याने पायस दिले - ते प्राशन केल्याने अंगराजाला पुत्र झाला - तो आजोबा ‘मृत्यू’ यांच्या वळणावर गेला - त्याचे नाव वेन - तो स्वभावाने क्रूर - एका रात्री राजा अंग घरातून निघून जातो.
 
 
 
मूळ कथा वाचायची असेल तर संदर्भ मिळतो. भागवतातील महत्त्वाच्या २३७ कथांचे संदर्भ येथे आहेत. त्यातील आजच्या काळाला योग्य आणि चिरंतन मूल्ये सांगणार्‍या १६६ कथा निवडून मी त्या सविस्तर लिहिल्या, त्याच्या आवश्यकतेसंबंधी माझे मत मांडले. तात्यांच्या टिपणांच्या आधारे वर्ष २०१५, मध्ये ‘श्रीमद्भागवत कथा’ हे पुस्तक प्रकाशित केले.
 
 
 
‘कवित्वमती विस्तारली’ या प्रकरणात भागवतातील काव्यसौंदर्याची स्कंधानुसार एकूण १,२८७ उदाहरणे आली आहेत. त्यामध्ये पशू-पक्षी, कीटक, पुष्प, फळे, वृक्ष, पंचमहाभूते, मानवी शरीर लोकव्यवहार, विज्ञान, राजकारण असे अनेक विषय आहेत. सर्वांभूती परमेश्वर हे पहिल्याच स्कंधात सांगितले आहे. (५) १/२/३२ ज्याप्रमाणे अग्नी पाहू गेले तर एकच. पण, तो आपल्या प्रगटीत स्थळी म्हणजे लाकडात शिरला म्हणजे भिन्न आकाराचा दिसतो. त्याप्रमाणे विश्वरूपी परमेश्वरही प्राणिमात्रांच्या अंतर्यामी शिरून प्रगट झाला असता निरनिराळ्या प्राण्यांच्या आकारमानाप्रमाणे व स्वरूपाप्रमाणे निरनिराळ्या स्वरूपाचा भासतो. दहाव्या, अकराव्या अध्यायात तर व्यास महर्षींच्या प्रतिभेचे सामर्थ्य श्लोकाश्लोकांतून जाणवते.
 
 
‘लागती सद्धर्माच्या वाटा’ अशा शीर्षकाखाली भागवतातील तत्त्वज्ञानाचे ७६९ संदर्भ घेतले आहेत. स्कंध पहिला (७) १/२/७ भक्तीने वैराग्य उत्पन्न होईल तेव्हाच खर्‍या ज्ञानाची प्राप्ती होते. (९) १/२/८ परमात्म कथांविषयी आवड उत्पन्न न करणारे धार्मिक कर्म म्हणजे केवळ यातायातच.
 
 
‘समीक्षा’ प्रकरणात प्रत्येक स्कंधातील अध्याय व श्लोकसंख्या देऊन त्यातील विषय, तत्त्वज्ञान याचे वेगळेपण क्रमांक देऊन सांगितले आहे व शेवटी त्यासंबंधीत स्वतःची मते तात्यांनी मुद्दे स्वरूपात नोंदवली आहेत.
 
 
श्रीमद्भागवताचा मराठी व हिंदी काव्यावर झालेल्या परिणामाचा तौलनिक अभ्यास या मूळ विषयाची पूर्वतयारी म्हणून तात्यांनी काढलेली टिपणे मी प्रकाशित केली. या विषयाची व्याप्ती लक्षात यावी म्हणून हिंदी-मराठी साहित्यातील कृष्णकथावर्णनाची माहिती देणारे ‘बीज ऐकले, तरू बहरले’ असे प्रकरण मी येथे लिहिले आहे.
 
 
तात्यांनी लिहिलेल्या भागवतातील विषयांच्या सूचीचे स्वरूप - उपदेश -भीष्माचा धर्मास उपदेश १/९, विदुराचा धृतराष्ट्रास १/१३, नारदाचा धर्मराजास १/१३, उपासना, चरित्रे, पुनर्जन्म, प्रयाण, प्रवेश अशा अनेक विषयांचे संदर्भ दिले आहेत. मूळ विषयाची तयारी त्यांनी किती प्रकारे केली होती, याची कल्पना आपल्याला यावरून येते.
 
 
‘आनंदाचे आवारू - श्रीमद्भागवत’ या नावाने हा सर्व अभ्यास २०१२ मध्ये ३८४ पानांमध्ये प्रकाशित केला. माझ्या आजीने (शांताबाई साठे) तिच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभी आठवडाभर रोज नेमाने हा ग्रंथ वाचून भागवत सप्ताह केला. भागवतावर निष्ठा व जावयांचे कौतुक म्हणून तिच्या शंभराव्या वाढदिवशी तिने हे मधुकररावांच्या ‘पीएच.डी.’चे बक्षीस आहे असे सांगून, मला पाकीट दिले. तात्यांनी या अभ्यासासाठी केलेल्या कष्टाचे सार्थक याहून काय वेगळे असणार!
 
 
‘आनंदाचे आवारू’ ग्रंथाला शुभेच्छा देताना चैतन्य भानुदास महाराज देगलूरकर लिहितात, “वै. मधुकर महाजनांनी भागवतातील कथा, काव्य, तत्त्वज्ञानावर संशोधन केले आहे. राष्ट्रहितार्थ जीवन व्यतीत करताना, त्यांनी इतक्या मोठ्या व्यापातून एवढ्या मोठ्या कठीण ग्रंथाचा एवढा साक्षेपी चिकित्सक अभ्यास कसा केला असावा, याचे आश्चर्य वाटते. महाजनांच्या या कार्यामुळे नंतरच्या अभ्यासकांची चांगली सोय झाली आहे. हे संशोधन श्रोते, आस्वादक आणि कथाकारांना निश्चितच नवी दिशा देईल.”
 
 
- डॉ. विद्या देवधर
 
 
@@AUTHORINFO_V1@@