एक टाळी तुमचीही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2021
Total Views |


tokyo 21_1  H x
 
टोकिया : मानवी इच्छाशक्तीचे आणि पराकोटीच्या प्रयत्नांचे दर्शन आज अवघ्या जगाला होणार आहे. ‘कोविड’चे आव्हान यशस्वीरित्या परतावून आज भारतीय वेळेनुसार सायंकाळी ८ वाजता जपानमधील ‘टोकियो ऑलिम्पिक’चा उद्घाटन सोहळा रंगेल. मैदानात आज प्रज्वलित करण्यात येणारी ‘ऑलिम्पिक ज्योत’ कोरोनामुळे अंधारलेल्या या जगाला नवी दिशा देईल. लढण्याची नवी उमेद देईल इतके नक्की.

अथेन्स, बीजिंग, लंडन, रियो आणि आता टोकियो अशा माझ्या पाचव्या ‘मिशन ऑलिम्पिक’साठी जपानमध्ये मी दाखल झालोय. मुंबईचे एअरपोर्ट सोडल्यानंतर तब्बल ३२ तासांनी जपानमधील हॉटेलवर पोहोचलोय. खरेतर मुंबई ते दिल्ली हा प्रवास जेमतेम साडेसात तासांचा. पण, कोरोनामुळे फ्लाईटची कमतरता आणि जपान एअरपोर्टवरील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांमुळे इतका विलंब लागला. जपान सरकारच्या नियमावलीनुसार आम्ही भारतीय ‘लेव्हल एक’ या सर्वाधिक धोकादाय देशांमधून येत असल्यामुळे आमच्यावर कठोर पाळत. जपानमध्ये येण्यापूर्वी मुंबईत रोज सात दिवस कोरोना चाचणी करणे बंधनकारक होते. ती ‘निगेटिव्ह’ आली, तर जपानच्या विमानतळावर प्रवेश. त्यानंतर विमानतळावर पुन्हा चाचणी. ती ‘निगेटिव्ह’ आली तर मग त्यांच्याच टॅक्सीतून थेट ‘ऑलिम्पिक’ने निर्धारीत केलेल्या हॉटेलवर रवानगी. तेथे तीन दिवस ‘क्वारंटाईन.’ तिन्ही दिवस पुन्हा कोरोना चाचणी. या चाचण्या ‘निगेटिव्ह’ आल्या, तर मग निर्धारीत केलेल्या खेळाच्या स्टेडियमला जाता येणार. पुन्हा १४ दिवसांनी आणखीन एक चाचणी. ती ‘निगेटिव्ह’ आली तर जपानमध्ये फिरता येणार. आजवर चार ‘ऑलिम्पिक’ मी कव्हर केली आहेत, पण एवढे अडथळे हे पहिल्यांदाच. इतके सगळे पार पडले आणि तुमच्यात उत्साह असला, तर मग आल्यासारखे ‘रिपोर्टिंग’ही करा, असे जपान सरकाराचे म्हणणे आहे.

जपानी भाषेत योकोसा म्हणजे आपले स्वागत...पण तुम्हाला गंमत वाटेल, मी टोकियोच्या एअरपोर्टवर उतरलो की नेपाळच्या काठमांडूत कळायला मार्ग नाही. डावीकडे, उजवीकडे, पुढे मागे कुठेही नजर टाका एकतरी नेपाळी स्वयंसेवक. योकोसा म्हणत तुमच्या सेवेस हजर. मी तर टोकियोच्या विमानतळावर पाय ठेवल्यापासून हॉटेलवर पोहोचेपर्यंत चक्क हिंदीत बोलत आलोय. कुठेही काही अडले नाही. शिवा नावाच्या एका नेपाळी स्वयंसेवकाकडून याचे रहस्य उलगडले. नेपाळची बरीचशी मुले ‘हॉटेल मॅनेजमेंट’ शिकण्यासाठी येथे येतात आणि मग ‘वर्क व्हिसा’वर येथेच राहतात. शिवा गेली दोन महिने ‘ऑलिम्पिक’ पगारी स्वयंसेवक म्हणून काम करतोय. ‘जपान ऑलिम्पिक’ समिती त्यासाठी यांना घसघशीत मोबदला देते. कोरोनामुळे एरवी जगभरातून येणार्‍या स्वयंसेवकांवर बंधने आल्यामुळे जपानमध्ये राहणारी ही नेपाळी मुले त्यांच्या हाताशी लागली आहेत.

जपानी माणूस तसा लढवय्या आणि मेहनतीही. कामालाच येथे देव मानले जाते. शिवा सांगत होता. खूप काम करणे आणि खूप सारे पैसे कमवणे, यालाच येथे प्राधान्य. पण, या जपान्यांच्या जिद्दीच्याच जोरावर जगातील खेळाचा महाकुंभमेळा पार पाडला जातोय. खरंतर गेल्या वर्षी होणार्‍या या ‘ऑलिम्पिक’ला आज अखेर मुहूर्त मिळालाय. पण या गेल्या दोन वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहवून गेले आहे. कोरोनामुळे अवघे जग बदलले आहे. अनेक नामवंत खेळाडूंनी या ‘ऑलिम्पिक’कडे पाठ फिरवली आहे. त्यात जगभरातील क्रीडा शौकिनांना जपानमध्ये ‘ऑलिम्पिक’ दरम्यान प्रवेशबंदी असल्यामुळे अजून तो माहोल पाहायला मिळत नाही. गेल्या चार ‘ऑलिम्पिक’पैकी एक गोष्ट मी आवर्जून येथे टोकियोच्या हनेडा विमानतळावर मिस केली आणि तो म्हणजे लहानमुलांचा किलबिलाट... उद्याचं भविष्य असणार्‍या या लहान मुलांना जगभरातील पालक आवर्जून ‘ऑलिम्पिक’मधील भव्यता दाखवायला आणत. विमानतळावर मग एकचं कल्ला असायचा. पण प्रेक्षकांनाच प्रवेश नसल्यामुळे विमानतळे ‘ओकीबोकी’ वाटतायत... ‘ओकीबोकी’ हा मराठी शब्द आहे, हे एवढ्यासाठीच सांगतोय की येथे आल्यापासून शब्दांत ‘ओ’ घुसवण्याची जणू सवयच लागलीय.

भारतासाठी जमेची बाजू म्हणजे यंदा भारत आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक १७‘ऑलिम्पिक’ पदके जिंकण्याचा अंदाज ‘ग्रेसनोट’ या विश्लेषण करणार्‍या कंपनीने व्यक्त केला आहे. त्यापैकी तब्बल आठ मेडल ही शूटिंगमधील आहेत. चार बॉक्सिंग, तीन कुस्ती व तिरंदाजी आणि ‘वेटलिफ्टिंग’मध्ये प्रत्येकी एक मेडल जिंकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यात बॅडमिंटन आणि हॉकीचा उल्लेख नाहीय. अनेक मातब्बर खेळाडू ऑलिम्पिकमधून माघार घेत असल्याने ‘मॉस्को ऑलिम्पिक’सारखे भारताला त्याचा सर्वाधिक लाभ होऊ शकेल, असा दावा ग्रेस नोटने व्यक्त केलाय. यातील अतिशयोक्तीचा भाग सोडला, तर भारतीय टीम यंदा जबरदस्त ‘फॉर्मा’त आहे हे मात्र नक्की. विशेषत: भारताचे शूटर, त्यातही मराठमोळ्या राही सरनोबतकडून ‘गोल्ड मेडल’ची अपेक्षा आहे. शूटरसोबतच कुस्ती, बॉक्सिंग, बॅडमिंटन, हॉकी आणि तिरंदाजीत भारतीय कमाल करू शकतील. थोडक्यात, भारताचे क्रीडा क्षेत्रात ‘अच्छे दिन’ येण्यास आजपासून सुरुवात होणार आहे. चला, तर जिंकण्याची जिद्द बाळगून कोरोनाला धोबीपछाड देत मैदानावर उतरणार्‍या भारताच्या यंदाच्या ऑलिम्पियन खेळाडूंच्या कौतुकातील एक टाळी तुमचीही आज वाजू दे...


- संदीप चव्हाण

 

 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@