शिवसेनेच्या भगव्याखाली रत्नागिरीत उर्दूची ‘सामंतशाही’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

uddhav_1  H x W


मुंबई :
 हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असणार्‍या सत्ताधारी शिवसेनेचा कोकणवासीयांबाबतचा ढोंगीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.‘तोक्ते’ चक्रीवादळानंतर नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत असणार्‍या कोकणवासीयांना ताटकळत ठेवत सत्ताधारी शिवसेनेने कोकणात ’उर्दू भवना’च्या बांधणीसाठी प्रयत्न सुरु केल्याचे चित्र आहे. कोकणातील अनेक ‘तोक्ते’ चक्रीवादळग्रस्त नागरिक शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत असताना राज्यातील सत्ताधारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने मात्र कोकणात ‘उर्दू भवना’च्या बांधणीचा घाट घातला आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री व शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी याबाबत तसे आदेशही दिल्याचे माहिती असून याबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

कोकणाला मे महिन्यात ‘तोक्ते’ चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. यातील अनेक नुकसानग्रस्त भागात पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र, अजूनही राज्य सरकारकडून या नुकसानग्रस्तांना कोणतीही आर्थिक मदत मिळाली नसल्याची व्यथा काही स्थानिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली.

शासन निर्णय निघून आणि निधी मंजूर होऊन एक महिना उलटून गेला तरीही अजूनही नुकसानग्रस्त कोकणवासीय राज्य सरकारकडून मिळणार्‍या निधीच्या प्रतीक्षेत आहेत. यापैकी मंडणगड, संगमेश्वर, देवरूख, वेळास या भागातील नागरिकांनी सरकारी पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्याप सरकारी आर्थिक मदत मिळाली नसल्याची खंत व्यक्त केली.

एकीकडे वादळामुळे उद्ध्वस्त झालेला मराठी कोकणवासीय मदतीच्या प्रतीक्षेत असताना दुसरीकडे मात्र कोकणातील शिवसेनेचे मंत्री मात्र एका विशिष्ट समुदायाला खूश करण्यासाठी सत्तेचा वापर करत आहेत का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे असताना राज्यभरात उर्दू भवन उभारणीची मोहीमच हाती घेण्यात आली आहे. राज्यभरात आत्तापर्यंत एकूण सहा ‘उर्दू भवनां’ना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी मोठा निधीही मंजूर करण्यात येत आहे. यापैकीच रत्नागिरीत एक ‘उर्दू भवन’ उभारण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ‘उर्दू भवन’ बांधण्याच्या प्रकल्पाला राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. यासाठी पुरेसा निधीही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात उर्दू भाषिक जनसमुदाय मोठ्या प्रमाणात आहे. या जनसमुदायाची भावना लक्षात घेऊन या प्रकल्पासाठी जागाही उपलब्ध असून सर्व निकष पूर्ण होत आहे. या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध असून उर्दू घरे उभारण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करुन अल्पसंख्याक विभागाकडे सादर करावा, असे निर्देशही उदय सामंत यांनी दिले आहेत. रत्नागिरीत मात्र ‘उर्दू भवना’च्या उभारणीसाठी भरभक्कम निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच लवकरच या ‘उर्दू भवना’चे काम सुरू होईल, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

आमच्या घरावरचे कौल फुटले, नारळी उन्मळून पडल्या, केळीच्या बागांना वादळाचा तडाखा बसला. सरकारी अधिकारी येऊन पंचनामे करून गेले. मात्र, अजून आम्हाला मदत मिळाली नाही किंवा आजूबाजूलाही कोणाच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे ऐकण्यात नाही. आम्ही सर्वच आजही सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहोत. याबाबत सरकारी अधिकारी आमचे काम आम्ही केले आहे. मात्र, निधीवाटपाचे काम आर्थिक विभागाचे आहे. तिथून निधी आला की, तुमच्यापर्यंत पोहोचेल असे सांगतात, अशी कैफियत स्थानिक मांडत आहेत.
संकेतस्थळावर मदतीचा तपशीलच नाही

२३ जून रोजीच्या शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यावर यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक असताना रत्नागिरी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अद्याप कोणतेही तपशील अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेले नाही, हे विशेष. ‘उर्दू भवन’ बांधणीला वेग; ‘तोक्ते’ नुकसानग्रस्त मात्र मदतीच्या प्रतीक्षेत 
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच २०१९ साली रत्नागिरीतील शासकीय जमिनींवरील मशिदी अधिकृत करण्याबाबतचे तत्कालीन ‘म्हाडा’ अध्यक्ष उदय सामंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेले एक पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होतेे. या पत्रात सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील मुस्लीम मोहल्ल्यातील घरांच्या जमिनीवरील प्रॉपर्टी कार्डप्रमाणे ७/१२ च्या नोंदी करण्याबाबत तसेच शासकीय जमिनीवरील मशिदी अधिकृत करणे, मशिदींवर भोग्यांची कायद्याच्या अधीन राहून परवानगी देणे,
‘वक्फ बोर्डा’चे कार्यालय उभारणे, कोकणातील मुस्लीम समाजासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ‘हज हाऊस’ची उभारणी करणे, अशा मागण्या सामंत यांनी पत्रातून केल्या होत्या. त्यानंतर आता त्यापैकी ‘उर्दू भवना’च्या उभारणीची मागणी पूर्ण करण्यात आली आहे.


 
 
@@AUTHORINFO_V1@@