लसीकरण आणि नियमांचे पालन केले, तरच तिसर्‍या लाटेपासून बचाव शक्य

22 Jul 2021 10:43:08

raman gangakhedkar_1 
 
डॉ. रमण गंगाखेडकर यांचे मत
नवी दिल्ली : “केंद्र सरकारने जारी केलेल्या चौथ्या ‘सीरो सर्व्हे’मध्ये देशातील दोन तृतीयांश लोकांमध्ये ‘अ‍ॅण्टिबॉडीज’ विकसित झाल्याचे समोर आले आहे. ही बाब सकारात्मक असली तरीदेखील अद्याप एक तृतीयांश लोकांना संसर्गाचा धोका कायम असल्याचे विसरून चालणार नाही. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर लस घेणे आणि कोरोनाविषयक नियमांचे पालन केले तरच तिसर्‍या लाटेपासून बचाव शक्य आहे,” असे मत ‘आयसीएमआर’च्या साथरोग विभागाचे निवृत्त प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले. केंद्र  सरकारने ‘आयसीएमआर’तर्फे घेण्यात आलेल्या चौथा ‘सीरो सर्व्हे’ नुकताच जारी केला. त्यामध्ये देशातील दोन तृतीयांश नागरिकांच्या शरीरात कोरोनाविरोधी ‘अ‍ॅण्टिबॉडीज’ तयार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, अद्याप धोका टळला नसल्याचेही ‘आयसीएमआर’चे डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले. त्याचाच पुनरुच्चार डॉ. रमण गंगाखेडकर यांनी केला.
“ ‘सीरो सर्व्हे’मध्ये दोन तृतीयांश लोकसंख्येमध्ये ‘अ‍ॅण्टिबॉडीज’ तयार झाल्याचे सांगितले आहे. मात्र, याचाच आणखी एक अर्थ म्हणजे अद्यापही एक तृतीयांश म्हणजेच तीनपैकी एका व्यक्तीस संसर्ग होण्याचा धोका कायम आहे. भारताची लोकसंख्या विचारात घेता एक तृतीयांश लोकसंख्या ही फार मोठी ठरते. त्यामुळे लवकरात लवकर लस घेणे आणि कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्वे, नियमांचे पालन केले तरच तिसर्‍या लाटेपासून बचाव करणे शक्य होणार आहे,” असे डॉ. गंगाखेडकर म्हणाले.
देशात दोन तृतीयांश लोकसंख्येकडे ‘अ‍ॅण्टिबॉडीज’ असल्याने देशात ‘हर्ड इम्युनिटी’ आली आहे. त्यामुळे आता लस घेण्याची गरज नाही, असाही विचार काही लोक करू शकतात. मात्र, तसा विचार करणे अजिबात योग्य नसल्याचे डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “दोन तृतीयांश लोकसंख्येमध्ये ‘अ‍ॅण्टिबॉडीज’ विकसित होण्यास सुमारे दीड वर्षांचा कालावधी लागला आहे, हे विसरून चालणार नाही. त्याचप्रमाणे या दोन तृतियांश लोकांपैकी किमान २० टक्के लोकांनी लशीची किमान एक तरी मात्रा घेतलेली आहे. त्यामुळे मला एकदा कोरोना होऊन गेला असल्याने लस घेण्याची गरज नाही, असाही विचार कोणी करू नये. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पहिल्या लाटेत संसर्गाचा जोर कमी असलेल्या भागांमध्ये दुसर्‍या लाटेत तीव्र रुग्णवाढ बघावयास मिळत आहे. (केरळ आणि ईशान्येकडील राज्ये) त्यामुळे विषाणू संसर्गाचा नेमका ‘पॅटर्न’ अद्याप लक्षात आलेला नाही. त्यामुळे ‘सीरो सर्व्हे’ सकारात्मक असली तरीदेखील धोका अद्याप टळलेला नाही,” असेही डॉ. गंगाखेडकर यांनी यावेळी नमूद केले.
‘पोस्ट कोविड सिंड्रोम’ची व्याप्ती वाढत आहे

कोरोनाविरोधात आता लसीचे संरक्षण असले, तरीदेखील ‘पोस्ट कोविड सिंड्रोम’ची गुंतागुंत आता समोर येत आहे. त्याचप्रमाणे ‘पोस्ट कोविड सिंड्रोम’ची लक्षणे अद्याप पूर्णपणे लक्षात आलेली नाहीत. मात्र, त्याची व्याप्ती आता वाढताना दिसत आहे. त्यामुळे संसर्ग होऊच न देणे याकडेच नागरिकांनी लक्ष देण्याची गरज आहे.



Powered By Sangraha 9.0