लोकल सेवा बंद झाल्याने प्रतिदिन २५० रुपये प्रवास खर्च

    दिनांक  22-Jul-2021 11:58:34
|

BUS _1  H x W:मुंबई : राज्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत असल्याची आकडेवारी राज्य सरकार देत आहे. एकीकडे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे राज्य सरकारतर्फे सांगण्यात येत आहे, तर दुसरीकडे रुग्णसंख्येतील घट हा धागा पकडत विरोधी पक्ष असलेल्या भाजपने मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी केली आहे.
 
 
लोकल सेवा सुरु करण्याच्या मागणीवर बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, “राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून सर्वच जिल्ह्यातील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. दुकाने, खासगी कार्यालयं तसंच इतर सुविधा खुल्या झाल्या असल्या तरी उपनगरीय लोकल सेवा मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी अद्याप बंद आहे.
 
 
परंतु कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना उपनगरीय लोकल सेवा सुरु करण्याबाबत राज्य सरकारने आठवड्याभरात निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे. जर सरकारने यावर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर प्रदेश भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल,“ असा इशारा प्रविण दरेकर यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना दिला. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
 
 
दरेकर म्हणाले की, कल्याण ते सीएसएमटीपर्यंतच्या २५ रुपयांच्या दैनंदिन उपनगरीय रेल्वे प्रवासाला आज एका व्यक्तीला २५० रुपयांहून अधिक खर्च होत आहे. डोंबिवली, ठाणे येथील लोकांना कामासाठी मुंबईत यायचं झालं तर रेल्वे सुविधा उपलब्ध नाही. सुमारे ७०० ते ८०० रुपये टॅक्सी व खासगी वाहनांसाठी जात असून त्यांना नाईलाजस्तव महागडा रस्ते प्रवास करावा लागत आहे.
 
बसने प्रवास करायचा झाला तरी मर्यादित बस फेर्‍यांमुळे तीन ते चार तासांचा वेळ प्रवासात जात असल्यामुळे नागरिकांचे प्रवास हाल होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आतातरी तातडीने निर्णय घेऊन ज्यांचे लसीचे २ डोस पूर्ण झाले आहेत त्यांना रेल्वे सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी दरेकर यांनी केली.
 
 
मुख्यमंत्री भाडे भरा. . . .
 
“मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील जे रहिवासी विस्थापित होतात व हे प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यामुळे त्या रहिवाश्यांना भाडे मिळत नाही. त्यामुळे स्थलांतरित भाडेकरुंचे भाडे भरण्याची व्यवस्था राज्य सरकार व एसआरएने करावी. एसआरए प्राधिकारणाचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे भाड्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी. अन्यथा भाजापातर्फे पुन्हा एकदा मुख्यमंत्री भाडे भरा...हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,“असा इशारा दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
 
 
“एसआरएचे प्रकल्प वेळेत पूर्ण होत नसल्यामुळे भाडेकरूंना भाड्यासाठी अडचणी येतात. ठिकठिकाणी बिल्डर अडचणीत असल्यामुळे बिल्डर स्थलांतरित लोकांचे भाडे देऊ शकत नाही. काही ठिकाणी प्रकल्पामध्ये तांत्रिक व कायदेशीर अडचणी येतात. त्यामुळे वेळेवर भाडे मिळत नाही. हे सर्व भाडेकरू मध्यमवर्गीय आहेत.
 
 
भाड्यासाठी आपल्या पत्नीचे पवित्र असलेले मंगळसूत्र सुद्धा गहाण ठेवून भाडे भरलेल्यांची अनेक उदाहरणे आज पाहायला मिळतात, हे आजचे विदारक वास्तव आहे,“ असेही दरेकर यांनी यावेळी नमुद केले. यावेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, भाजप खासदार गोपाळ शेट्टींसह अन्य उपस्थित होते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.