मुसळधार पावसाचा कोकण जिल्ह्यांना फटका ; वाचा सविस्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2021
Total Views |

Ratnagiri_1  H
 
 
 
रत्नागिरी : गेल्या ६ दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसाने कोकण किनारपट्टीला चांगलेच झोडपले आहे. कोकणातून वाहणाऱ्या अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरे आणि गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहें. चिपळूण ते कामथे दरम्यान पुराचा धोका लक्षात घेऊन कोकण रेल्वेने गाड्या तात्पुरत्या थांबवण्याचा निर्णय कोकण रेल्वेकडून घेण्यात आल्या आहेत. २००५मध्ये आलेल्या महापुरापेक्षा अधिक भयंकर अशी परिस्थिती गुरुवारी उद्भवली असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. 
 
 
 
 
 
 
 
चिपळूण आणि कामाठे रेल्वे स्थानकांदरम्यान वाहणाऱ्या वाशिष्टी नदीच्या पुलाला पाणी लागले आहे. पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या मार्गावरील वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. कोकणाला मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे. निवळी येथील बाव नदीला देखील पूर आलेला आहे. मुंबई-गोवा महामार्ग देखील बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. कोकण रेल्वे देखील ठप्प झालेली आहे.
 
 
 
 
 
गेली दहा-बारा वर्षे रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे येथे भूस्खलन होत असून अद्याप पर्यंत सहा ते सात एकर शेतजमीन यात नष्ट झाली आहे. यंदाही याठिकाणी भूस्खलन झाले असून पालकमंत्र्यांनी या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा मिरजोळे ग्रामस्थांतून व्यक्त करण्यात येत आहे. मिरजोळे येथे मधलीवाडी खालचा पाट परिसरात ही घटना दहा-बारा वर्षापासून घडत आहे. नदीलगत असणाऱ्या डोंगराळ भागात यापूर्वी अर्धवटस्थितीत बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे नदीचा प्रवाह बदलल्याने ही शेतजमीन खचण्याचे प्रकार दरवर्षी घडत आहेत. आतापर्यंत सहा ते सात एकर शेतीला फटका बसून ती नष्ट झाली आहे. यावर्षीही मोठ्या पडलेल्या पावसात शेत जमीन खचली आहे. अर्धवट बंधारा पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे विभागाने २०१९ मध्ये एक कोटी ३७ लाखाच्या बंधाऱ्यांचे आराखडा तयार केला. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. यावर लवकरच उपाययोजना न झाल्यास येथील उर्वरित शेतजमीन नष्ट होईलच, परंतु जवळच्या वाडीतील घरांनाही याचा धोका पोहचू शकतो, असे ग्रामस्थांनी सांगितले. जिल्हयाच्या पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन ग्रामस्थांची शेतजमीन वाचवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
 
 
 
 
 
खेडमध्ये मुसळधार; कोरोना सेंटरच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी
 
 
अतिमुसळधार पावसामुळे खेड शहरातील कोरोना सेंटरचा तळमजला पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे. या कोरोना सेंटरमधील ऑक्सिजन लावलेले ३५ रुग्ण बुधवारी रात्रीच कळंबणी रुग्णालयात हलवण्यात आले असून, ऑक्सिजन न लावलेले ४५ रुग्ण दुसऱ्या मजल्यावर आहेत. सर्व रुग्ण सुरक्षित आहेत.
 
 
 
Ratnagiri 1_1  
 
 
रत्नागिरीत खड्यांमुळे वाहनचालक त्रस्त
 
 
शहरातील अनेक मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. पावसामुळे खड्डे रुंदावले असून, त्यात पाणी साठल्याने अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत.
 
 
 
 
 
 
संगमेश्वर तालुक्यात नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती
 
 
संगमेश्वर तालुक्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरल्याने फुणगूस आणि माखजन येथील शास्त्री आणि गडनदीने नेहमीच्या पाण्याची पातळी ओलांडल्याने खाडीपट्ट्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी पुराच्या पाण्याने संपूर्ण खाडीभागाला वेढा घातला आहे. खाडीलगत असलेल्या दहा ते बारा गावातील भातशेतीत पाणी घुसल्याने शेतकऱ्यांना शेतीचे कामे अर्धवट सोडून घरचा मार्ग पत्करावा लागला असून, शेतात काढून ठेवलेल्या भाताची रोपे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वाहून गेली आहेत. फुणगूस बाजारपेठेत सुमारे तीन ते चार फूट पाणी घुसले होते. दत्तमंदिर नदीलाही मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येऊन तेथील घराजवळ व भातशेतीमध्येही पाणी घुसले. यामुळे खाडी भागातील संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले आहे. माखजन बाजारपेठेतही सखल भागात पुराचे पाणी घुसले आहे. संगमेश्वर तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे. भातशेती क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. सततच्या पावसामुळे गडगडी धरण येथील कालव्याची भिंत वाहून गेली आहे.
 
 
 
 
 
आघारी समुद्रकिनारी आढळले दोघांचे मृतदेह
 
 
तालुक्यातील आघारी समुद्रकिनारी दोन मृतदेह आढळून आले आहेत. त्यापैकी एकाची ओळख पटली असून, तो जिल्ह्यातील चिपळूण वाशिष्ठी नदीत काही दिवसांपूर्वी दोन तरुणांनी उडी टाकलेल्यांपैकी एक तरुण असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. राम गुलाब मोहिते या तरुणाचा मृतदेह दापोली तालुक्यातील आघारी समुद्रकिनारी आढळून आला. त्याची ओळख पटली आहे तर दुसऱ्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@