पूराचा खोपोलीलाही फटका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2021
Total Views |

pur_1  H x W: 0


 अनेक घरांमध्ये पाणी, अर्धी खोपोली रात्रभर जागी, २३ जुलै च्या महापुराच्या आठवणी जाग्या

खोपोली : २३ जुलै १९८९ च्या महापुराची आठवण करून देणारी रात्र खोपोलीकरांनी बुधवारी २१ जुलै रोजी रात्री अनुभवली. रात्री १ च्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरले. अर्धी खोपोली रात्रभर जागीच होती.भानवज रस्त्यावरील साईबाबा मंदिर परिसर, काटरंग रस्त्यावरील वैभव इमारती,महालक्ष्मी मंदिर परिसर, वीणा नगर, शिळफाटा येथील डी सी नगर, सह्याद्री विद्यालय रस्त्यावरील घरे, गुलशन अपार्टमेंट, कृष्णा नगर, बाजारपेठेचा काही भाग,गगनगिरी आश्रमा जवळील आदिवासी वाडी, सिद्धार्थ नगर, प्रज्ञा नगर,शिळगाव रस्ता, इंदिरा गांधी चौक या सर्व परिसरात पाणीच पाणी झाले होते. येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. सहकार नगर, सिद्धार्थ नगर येथील काही लोकांना बाहेर काढून त्यांची लोहाणा हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली.बाजारपेठेमध्ये एका घराची भिंत पडली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही.


pur 2_1  H x W:
 
मुसळधार पाऊस, डोंगरावरून येणारे पाणी यामुळे पाताळगंगा नदी उलटून शिळफाट्यावर रस्त्यावर पाणी आले होते. खोपोली नगर परिषदेची आपत्कालीन टीम, खोपोली पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या संस्थेची टीम पूरग्रस्त भागात फिरून मदत कार्य करीत होती. खोपोली कर्जत रेल्वे ट्रॅक वर डोलवली ते केळवली दरम्यान रेल्वे रुळाच्या खालील मातीचा भराव वाहून गेल्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. खालापूर तालुक्यातील बीड जांबरूंग परिसरातही पावसामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. बीडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलावर भलेमोठे झाड पडल्यामुळे बीड गावाशी संपर्क तुटला होता. खालापूर चे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी रात्री या भागाची तसेच अन्य पूरग्रस्त परिसराची पाहणी केली व मदत कार्याचा आढावा घेतला.
 

वीज पुरवठा खंडित


रात्री एक वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर दोन वाजल्यानंतर शहरातील वीजपुरवठा खंडित झाला असून १२ तासानंतरही तो पूर्ववत झाला नव्हता.


pur 3_1  H x W:
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ग्रुपचे सलग ४ दिवस मदत कार्य


खोपोलीकरांच्या संकट काळामध्ये नेहमीच धावून जाणाऱ्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे सदस्य सलग चौथ्या दिवशीही अहोरात्र मदत कार्यात गुंतलेले आहेत. सोमवार १९ जुलैपासून क्रांतीनगर येथील नाल्यामध्ये वाहून गेलेल्या दोन मुलांच्या शोधासाठी सलग तीन दिवस मेहनत घेऊन त्यांचे मृतदेह शोधल्यानंतर, थोडी उसंत मिळते आहे तोच २१ जुलैच्या मध्यरात्रीपासून शहरातील पूर परिस्थिती मध्ये संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर व त्यांचे सर्व सहकारी मदतकार्यात गुंतले आहेत.

 
लोणावळा धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ


टाटा कंपनीकडून महत्तम क्षमतेने (८००-८५० क्यूसेक्स) पाणी वीजनिर्मितीकरिता खोपोली वीजगृहात वळविण्यात येत असून; धरण जलाशयातील सद्यस्थितीतील सरासरी आवक १६००-१७०० क्यूसेक्स दराने येत आहे. त्यामुळे धरण जलाशय पातळीमध्ये वाढ होत असून सदरहू कल असाच राहिल्यास लोणावळा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची दाट शक्यता आहे आणि द्वारविरहित सांडव्यावरून अनियंत्रित विसर्ग सुरु होण्याची शक्यता आहे.तरी, धरणाच्या निम्न बाजूस शेती पम्प, अवजारे, जनावरे, इतर तत्सम साहित्य वेळीच काढण्याबाबत तसेच, इंद्रायणी नदीपात्रामध्ये उतरणे धोक्याचे असल्याबाबत सूचना देण्यात याव्यात असे आवाहन टाटा पॉवरचे धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी केले आहे.



pur 4_1  H x W:

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@