मतांसाठीची वैचारिक सुंता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2021
Total Views |

Cm Thackeray_1  
 
 
 
 
ठाकरे सरकारकडे ‘उर्दू भवन’ बांधण्याचे धंदे करण्यासाठी रग्गड पैसा आणि वेळ आहे. अर्थात, वैचारिक सुंता केलेली शिवसेना वा उद्धव ठाकरे वा उदय सामंत लांगूलचालनच करणार. कारण, मुद्दा मुस्लीम मतांचा आहे.
 
 
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या दोन प्रकारची चित्रे पाहायला मिळत आहेत. त्यातले एक म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेल्या ‘जलयुक्त शिवार योजने’ची ‘एसीबी’मार्फत सूडबुद्धीने केली जाणारी चौकशी. दुसरे म्हणजे जिल्ह्याजिल्ह्यात ‘उर्दू भवन’ उभे करण्याची महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांतील नेत्यांमध्ये लागलेली जोरदार स्पर्धा. दीड वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या उद्धव ठाकरे सरकारने मागील सरकारच्या काळातील सर्वच जनहितकारी निर्णयांना लागोपाठ स्थगिती देण्याचे एकमेव काम प्रामाणिकपणे केल्याचे सर्वांनीच पाहिले. ‘जलयुक्त शिवार’ योजनेचेही तसेच झाले व आता त्याच्या समिती, आयोग वा ‘एसीबी’ चौकशीचा घाट घातला जात आहे. त्याला भाजप व फडणवीस द्वेषाचाच प्रामुख्याने आधार असून तो दोन पक्षांमधील राजकीय कुरघोडीचा विषय आहे. पण, या रस्साखेचीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष मुस्लीम लांगूलचालनाचा मुद्दा विसरलेले नाहीत आणि त्यात शिवसेनाही सहभागी झालेली आहे. आताचे ‘उर्दू भवन’ उभारण्याचे नाटक उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी नसून मुस्लीम तुष्टीकरण व त्यातून मिळणार्‍या मतांसाठीच सुरु आहे. भारतीय जनता पक्षापासून विलग झाल्यानंतर हिंदुत्वाच्या नावाने मिळणारी मते सत्तेसाठी असंगाशी संग केल्यानंतर शिवसेनेला मिळणार नाही, हे उघड आहे. ती गमावलेली हिंदू मते शिवसेना मुस्लीम मतांच्या माध्यमातून भरुन काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळेच गिरगावपासून रत्नागिरीपर्यंतच्या मुस्लिमांची मते मिळवण्याची स्पर्धा शिवसेनेच्या नेतृत्वातील ठाकरे सरकारमध्ये सुरु झाल्याचे दिसते.
 
 
 
त्यासाठीच शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी गेल्या वर्षी ‘अजान स्पर्धे’चे आयोजन केले होते. “अजानमध्ये इतकी गोडी असते की ती वारंवार ऐकावीशी वाटते,” असेही ते एका मुलाखतीत म्हणाले होते. तीन दशकांपूर्वी भाजपशी युती करताना हाती घेतलेला भगवा झेंडा खाली ठेवून हिरवा झेंडा हाती घेण्याची शिवसेनेची ही सुरुवात होती. त्याला कारण काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी मुख्यमंत्रिपदासाठी केलेला घरोबा व आपण त्यांच्याहीपेक्षा अधिक पुरोगामी, धर्मनिरपेक्ष असल्याचे दाखवण्याचा आटापिटा होता. त्यानंतर शिवसेनेने सातत्याने दाढी कुरवाळू राजकारणच केले. शिवसेनेचे दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाला ‘ख्वाजा गरीब नवाज मोईनुद्दीन चिश्ती’ यांचे नाव देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. मात्र, त्यांच्या मागणीच्या आधीच भाजप खासदार मनोज कोटक यांनी या उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी मुंबई महापालिकेकडे केली होती. म्हणजेच, शिवसेनेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचेही वावडे झाल्याचे व त्याऐवजी ‘ख्वाजा गरीब नवाज मोईनुद्दीन चिश्ती’ यांचे नाव प्रिय झाल्याचे दिसून आले. आता त्याच मुस्लीम तुष्टीकरणाच्या राजकारणापायी ठाकरे सरकारने नांदेड, सोलापूर, मालेगाव, मुंबई, नागपूर, रत्नागिरी वगैरे ठिकाणी ‘उर्दू भवन’ उभारणीला सुरुवात केली आहे.
 
 
 
शिवसेनेचे रत्नागिरीतील आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यात ‘उर्दू भवन’ उभारण्यासाठी पुढाकार घेतला असून नुकतेच तसे निर्देशही दिले आहेत. तथापि, शिवसेना नेते उदय सामंत यांच्या मुस्लिमानुनयाचे आणखी एक उदाहरण ते ‘म्हाडा’चे अध्यक्ष असतानाही पाहायला मिळाले होते. २०१९ साली त्यांनी रत्नागिरीतील शासकीय जमिनींवरील मशिदी अधिकृत करण्याचे पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. म्हणजेच शासकीय जमिनी मुस्लिमांच्या घशात घालण्याची तयारी त्यांनी केली होती. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर मशिदींवर भोंग्यांची परवानगी देणे, ‘वक्फ बोर्डा’चे रत्नागिरीत कार्यालय थाटणे आणि ‘हज हाऊस’च्या उभारणीची मागणीही त्यांनी केली होती. म्हणजेच उदय सामंत यांचे मुस्लीमप्रेम वर्षानुवर्षांपासूनचे असून आता त्यांनी ‘उर्दू भवना’चे बांधकाम करण्याचे ठरवले आहे. ठाकरे सरकारकडून ठिकठिकाणच्या ‘उर्दू भवना’तील कार्यक्रम आयोजनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी स्वतंत्र समितीची स्थापनाही करण्यात येत आहे.
 
 
 
रत्नागिरीसाठीही तशी समिती स्थापन करण्याचे निर्देश नुकतेच उदय सामंत यांनी दिले आहेत. मात्र, ही समिती नेमके काय काम करणार, याबाबत स्पष्टता नाही, त्या समितीच्या कामाचा कोणताही आराखडा समोर ठेवलेला नाही. उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी काय उपक्रम राबवले जाणार, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आदी सुविधा दिल्या जाणार की नाही, साहित्य प्रकाशन करणार की नाही, अशा कशाचीही स्पष्टता नाही. म्हणून केवळ मुस्लीम मतांवर डोळा ठेवूनच अशी ‘उर्दू भवन’ निर्मिती करण्याचा घाणेरडा डाव ठाकरे सरकारकडून सुरु असल्याचे दिसून येते.
 
 
 
रत्नागिरीतील ‘उर्दू भवना’च्या उभारणीसाठी मंत्री उदय सामंत हिरीरीने काम करत असल्याचे त्यांच्या वर्तवणुकीतून स्पष्ट होते. पण, याच रत्नागिरी जिल्ह्याला व कोकणाला गेल्या वर्षी ‘निसर्ग’ चक्रीवादळाने आणि यंदा ‘तोक्ते’ चक्रीवादळाने तसेच आताही मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यात स्थानिक नागरिक, मच्छीमार, नारळी-पोफळी-केळी उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून तर रत्नागिरीत पूरस्थिती उद्भवली आहे. पण, चक्रीवादळाने झालेल्या हानीनंतर ‘बेस्ट सीएम’नी फक्त विमानतळावरुन धावती भेट घेतली होती. पत्रकारांशी गोलमाल गप्पा मारुन नंतर ते निघूनही गेले होते. नुकसानग्रस्तांची भेट घेऊन त्यांना धीर देण्याची बुद्धी ठाकरेंना झाली नव्हती. केवळ पंचनामे करू, आर्थिक मदत देऊ, अशी आश्वासने मात्र ते देत होते. तसे पंचनामे झालेही, पण प्रत्यक्षात चक्रीवादळ ग्रस्त रत्नागिरीकर किंवा कोकणवासीयांना कोणतीही मदत अजूनही मिळालेली नाही. आजही ठाकरे सरकारची मदत मिळेल, या आशेवर इथला सर्वसामान्य माणूस अतिशय दयनीय परिस्थिती जगत आहे. पण, त्याची चिंता ठाकरे सरकारला वा उदय सामंत यांनाही नाही. आताच्या पूरस्थितीतही शासकीय मदतीचा बोर्‍या वाजलेलाच आहे. म्हणजेच, नुकसानग्रस्तांना मदत द्यायला ठाकरे सरकारकडे पैसे नाहीत, वेळ नाही, त्यांच्याबद्दल कसली सहानुभूतीही नाही. पण, ठाकरे सरकारकडे ‘उर्दू भवन’ बांधण्याचे धंदे करण्यासाठी रग्गड पैसा आणि वेळ आहे. अर्थात, वैचारिक सुंता केलेली शिवसेना वा उद्धव ठाकरे वा उदय सामंत लांगूलचालनच करणार. कारण, मुद्दा मुस्लीम मतांचा आहे. तथापि, अशा मुस्लीम लांगूलचालनाने काँग्रेसची अवस्था किती वाईट झाली, याचे उदाहरण आपल्या सर्वांसमोर आहे, हे शिवसेनेने नक्कीच लक्षात ठेवावे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@