चिनी अभियंत्यांना हाती ‘एके ४७’ रायफल घेऊन काम करण्याची वेळ; ‘सीपेक’ प्रकल्पाचे भवितव्य धोक्यात

22 Jul 2021 20:22:34
cc_1  H x W: 0


पाक लष्करावर चीनचा अविश्वास, देशांतर्गत विषयांमध्ये चीनचा हस्तक्षेप
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : मोठा गाजावाजा करून सुरु करण्यात आलेल्या, मात्र आता पांढरा हत्ती ठरलेल्या ‘चायना – पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ अर्थात ‘सीपेक’ प्रकल्पाचे भवितव्य धोक्यात आले आहे. प्रकल्पावर होणारे दहशतवादी हल्ले रोखण्यास पाकिस्तानी लष्कर अपयशी ठरल्याने आता चीनने आपल्या अभियंत्यांना थेट ‘एके ४७’ रायफल दिली आहे. त्यामुळे पाकचे सार्वभौमत्व पूर्णपणे चीनकडे गहाण पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
त्या पार्श्वभूमीवर सध्या चिनी सरकारच्या मालकीच्या सोशल मिडीयावर हातात ‘एके ४७’ रायफल घेऊन सीपेक प्रकल्पात काम करणाऱ्या अभियंत्यांचे छायाचित्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आपल्या अभियंत्यांचे रक्षण करण्यास पाक लष्कर अपयशी ठरल्याने चीनने अभियंत्यांच्याच हाती रायफल सोपविल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे चिनी अभियंत्यांना संरक्षण देण्यासाठी पाकने आपल्या लष्करातील दोन तुकड्यांची तैनाती केली आहे. त्यामध्ये सुमारे ३० हजार पाक सैनिक कार्यरत आहेत. मात्र, तरीदेखील चिनी अभियंत्यांवर होणारे हल्ले थांबविणे पाकला शक्य झालेले नाही.
 
 

china_1  H x W: 
 
 
 
सीपेक प्रकल्पावर काम करणाऱ्या अभियंत्यांविरोधात १४ जुलै, २०२१ रोजी खैबरपख्तुनख्वा प्रांतामध्ये बलुची उग्रवाद्यांनी हल्ला केला होता. त्यामध्ये ९ चिनी अभियंते ठार झाले होते. त्यामुळे संतापलेल्या चीनने पाक लष्कराला कठोर इशारा दिला होता. त्यानंतरही पाक लष्करावर विश्वास ठेवण्यास चिनची तयारी नाही. त्यामुळे आता चिनी अभियत्यांनात आपले मुख्य काम सोडून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी हाती ‘एके ४७’ घ्यावी लागली आहे.
 
 
 
सीपेक प्रकल्प म्हणजे पांढरा हत्ती- ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन
 
 
चिनने आपल्या फायद्यासाठी मोठा गाजावाजा करून सीपेक प्रकल्पाची सुरुवात केली होती. या प्रकल्पामुळे पाकला मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होईल, असे प्रलोभन दाखविण्यात आले होते. त्यामुळे पाकने चीनच्या प्रत्येक अटीला मान्यता देऊन प्रकल्पामध्ये सहभाग घेतला आहे. मात्र, आता हा प्रकल्प दोन्ही देशांसाठी पांढरा हत्ती ठरत आहे. त्यातही या प्रकल्पामुळे आता पाकिस्तानचे सार्वभौमत्व पूर्णपणे चिनकडे गहाण पडले आहे. त्यामुळे पाकच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याची संधी चीनला प्राप्त झाली आहे, अशी प्रतिक्रिया ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी दैनिक ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0