"...तर अखेरच्या क्षणीही रद्द होऊ शकते टोकियो ऑलिम्पिक"

    दिनांक  21-Jul-2021 20:07:10
|

olympic_1  H x
 
नवी दिल्ली : टोकियो इथे होणाऱ्या बहुप्रतीक्षित ऑलिम्पिकला अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. मात्र, जपान तसेच ऑलिम्पिक विलेजमध्ये वाढता कोरोनाचा विळखा पाहता ऑलिम्पिकही रद्द होते का काय? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात पडला आहे. यावर आता आयोजन प्रमुखांच्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच चिंता वाढल्या आहेत. जपानमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. तसेच, याचा शिरकाव ऑलिम्पिक विलेजमध्येही झाला आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणाला ऑलिम्पिक रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजन समितीचे प्रमुख तोशिरो मुटो यांनी सांगितले आहे.
 
 
 
२३ जुलैला टोकियो ऑलिम्पिकचे उद्घाटन होणार आहे. मात्र, कोरोनाबाधितांची वाढती संख्या आयोजकांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. खेळाडूंचे वास्तव्य असलेल्या क्रीडाग्राममध्येही कोरोनाने शिरकाव केला असून खेळाडूंनाच कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आयोजकांनी केलेला खेळाडू सुरक्षित राहतील, हा दावा सपशेल फोल ठरला आहे. त्यातच ऑलिम्पिकला विरोध कायम आहे. ऑलिम्पिक रद्द करण्यासाठी निदर्शनेही केली जात आहे.
 
 
 
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक अजूनही रद्द होऊ शकते का? या प्रश्नावर तोशिरो मुटो यांनी सांगितले की, "आम्ही कोरोनाबाधितांच्या आकड्यांवर लक्ष ठेवून आहोत. कोरोनाबाधितांच्या आकड्याबाबत आपण भाकीत करू शकत नाही. वेळ पडली तर आम्ही पाचपक्षीय चर्चा करू शकतो. कोरोनाची प्रकरणे वाढतील किंवा कमीही होतील. आम्हाला परिस्थिती बिघडली तर काय करायला हवे, याचा विचार करावा लागणार आहे." पुढे ते म्हणाले की, "टोकियोमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे ऑलिम्पिक वर्षभरासाठी स्थगित करण्यात आले होते. कोरोनाचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने प्रेक्षकांविना स्पर्धा घेण्याचा निर्णय आयोजकांनी यापूर्वीच घेतला आहे."
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.