वैदिक परंपरा आणि साधना (भाग-३)

    21-Jul-2021
Total Views |

vedic_1  H x W:
 
 
 
वैदिक परंपरा व संस्कृती प्रत्यक्ष अतींद्रिय अनुभवांवर आधारित असल्यामुळे विश्वाची रचना व मूळ अवस्थेचे ऋषिमुनींनी आपल्या अतींद्रिय शास्त्रीय अनुभवांवरून वेदांमध्ये वर्णन केले आहे.
 
 
 
वेदांमध्ये केलेले विश्वाचे वर्णन किंवा विभाजन आणि आधुनिक विज्ञानाने केलेले विश्वाच्या घटनेचे वर्णन यात काही फरक नाही. फरक एवढाच की, आधुनिक विज्ञान सूक्ष्मतेच्या एका वळणावर अडून बसलेले आहे, तर वैदिक ऋषिमुनी आपल्या अतींद्रिय ज्ञानाद्वारे त्याहीपलीकडे जाऊन पोहोचले आहेत. हे विश्व मुळातच पाच तत्वांचे बनलेले आहे, असे वैदिक परंपरेत मानलेले आहे. ही मूळ पंचतत्त्वे म्हणजे आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी.
 
 
 
आकाशतत्त्व सर्वात सूक्ष्म आहे आणि पृथ्वीतत्त्व सर्वात जड तत्त्व आहे. आकाशतत्त्व सर्वदूर व सर्वव्यापी आहे, तर पृथ्वीतत्त्व स्थानिक व मर्यादित आहे. पृथ्वीचे मूळ आहे आप, आपाचे मूळ तेज, तेजाचे मूळ वायू आणि वायूचे मूळ आहे आकाश. प्रत्येक तत्त्वात काही प्रमाणात दुसर्‍या तत्त्वांचाही समावेश आहे. प्रत्येक तत्त्व त्याच्या वर्ण व गुणांद्वारे व्यक्त होते. या गुणांना ‘तन्मात्रा’ म्हणतात व त्याच्यावरून तत्त्वाचे मोजमाप आणि त्याचे ज्ञान होते. ‘तत् + मात्रा’ म्हणजे ‘तन्मात्रा.’ तत्वशक्ती ही अव्यक्त असून केवळ अतींद्रिय ज्ञानानेच तिची जाणीव होते.
 
 
विश्वाची मूळ अवस्था
 
 
सर्व तत्त्वांच्या पलीकडे एक तत्त्वहीन तत्त्व व अवस्थाहीन अवस्था आहे. जिला ‘परातत्त्व’ किंवा ‘परमात्मा’ असे म्हणतात. ऋग्वेदाच्या नासदीय सूक्तांमध्ये याचे वर्णन आहे.
 
 
नासदासीन्नो सदासीत्तदानी। नासीद्रजो नो व्योमा परोयत्।
किमा वरीवः कुहकस्य शर्मन्अम्भः। किमासीद गहनं गंभीरम्॥
न मृत्यूरासीदमृतं न तर्हि। न रात्र्या अहन आसीत प्रकेतः॥
आनीदवातं स्वधया तदेकं। तस्माध्दान्यन्न परः कि चनास ॥ ऋग्वेद, ॥१०/१२९/१/२॥
 
 
 
याचा भावार्थ असा आहे की, विश्वाच्या उत्पत्तीच्या पूर्वी सत् किंवा असत्चे अस्तित्व नव्हते. त्यावेळी व्यक्त स्तर (अद्रजः) किंवा तत्त्वही नव्हते. त्यावेळी सर्वव्यापी व्योम किंवा आकाश नव्हते. (न व्योमा परो यत्) किंवा त्याच्या पलीकडे कोणतीच अवस्था नव्हती. कोणी कशाला आच्छादन केले? (किमावरीव: कुहकस्य शर्मन अम्भ:) कोणाला कशाचा आधार होता? सार्‍या विश्वात किंवा अंतर्बाह्य असे कोणतेही गहन गंभीर तत्त्व नव्हते. (न मृत्यू: आसीत् नं अमृत न तहि) त्यावेळी अंध:कार नव्हता, प्रकाश नव्हता (न रात्र्या अहन आसीत प्रकेतः) मग कालाची गणना कशी होत होती? पण त्यावेळी कालच नव्हता. त्यावेळी केवळ एकच एक होते व ते आपल्या स्पंदनानेच स्पंदन पावत होते. (आनीदवातं स्वधया तदेकं) त्यावेळी तत् शिवाय काहीच नव्हते, (तस्मात् धा अन्य पर:) तर मग त्यावेळी होते तरी काय (पर: किंचनास)?
 
 
शब्दांच्या पलीकडच्या अशा मूळ अवस्थेचे शब्दांनी वर्णन करणे, अशक्य आहे आणि अशा मूळ स्थितीचे वर्णन ऋषींनी ऋग्वेदात केलेले आहे. इतके सुंदर वर्णन अन्यत्र कोठेही सापडत नाही.
 
 
जगदारम्भ
 
 
अशा तत्त्वहीन अवस्थेतून जगाचा व्यापार कसा सुरू झाला, याचे वर्णन पुन्हा वेदातच आहे.
 
 
ऋतं च सत्यं चाभिद्धात्तपसोऽध्य जायत। ततोरात्र्यऽजायत। ततः समुद्रोऽअर्णवः समुद्रादर्णवाधि: संवत्सरो अजायत। अहोरात्राणिविद्धत् विश्वस्यमिषतोवशी। सूर्याचंद्रमसौधाता यथा पूर्वमकल्पयत्। दिवं च पृथिवि चान्तरिक्षमथो स्वः॥
 
 
याचा आशय असा की, प्रथम जी तत्त्वहीन स्पंदनात्मक परंतु विधायक अवस्था होती, त्यातून प्रत्यक्ष सत्य म्हणजे काही तत्त्व किंवा अवस्था निर्माण झाली. सत्यावस्थेतून अखिल स्पंदनात्मक जगतात पुन्हा ‘तपस्’ म्हणजे एक प्रकारची प्रकिया सुरू झाली. (विश्वाच्या उत्पत्तीपूर्वी ब्रह्मदेवाने तप केले ही कथा सत्यावर आधारित आहे.) त्यानंतर अंध:कार उत्पन्न झाला. अंध:कार म्हणजेच सर्व वस्तुमात्राची अभावात्मक अवस्था. त्यानंतर सर्वाठायी वास असलेले एक समान तत्त्व उत्पन्न झाले. (ततः समुद्र अर्णव) या समान तत्तानंतर (समुद्र:) संवत्सर म्हणजे गतिमान काल उत्पन्न झाला. नंतर काल आणि अकाल (अहोरात्राणि) यांची उत्पत्ती झाली व त्याच्याद्वारे विश्वाचा अभास उत्पन्न झाला. तद्नंतर सूर्य म्हणजेच सर्व वर्णाच्या ठायी वास असलेले जड प्रकाशतत्त्व आणि चंद्र म्हणजे मानसरुप असलेले जड, शुभ्र व मंद प्रकाशतत्त्व उत्पन्न झाले. अशा प्रकारे विधात्याने पूर्वकल्पानुसार गतिमान काल व अप्रकाशमय अकाल अशी अवस्था उत्पन्न केली (सूर्याचंद्रमसौधाता यथापूर्वमकल्पयत्) काल अकालानंतर अवकाश आणि पृथ्वी म्हणजे स्थान आणि भिन्नत्व ही जडतत्त्वे उत्पन्न झाली. त्यानंतर अंतरिक्ष म्हणजे आकाश आणि अन्य तत्त्वे उत्पन्न झाली. (दिवंच पृथिविंचान्तारिक्षमथो स्वः) आकाशादी पंच तत्त्वांचा आरंभ इथूनच आहे.
 
 
पंचतत्त्वे
 
 
 
आपण हे पाहिलेच आहे की, वैदिक परंपरेमध्ये प्रत्येक शब्दाचा उपयोग एक विशिष्ट शास्त्रपरंपरा आणि प्रत्यक्ष अनुभवलेले तत्त्व यांना अनुलक्षून केला जातो. वैदिक परंपरेत केवळ काल्पनिक किंवा निरर्थक शब्द प्रयोग आढळून येणार नाही. प्रत्येक शब्दप्रयोगामध्ये एक महान शास्त्र भरलेले आहे. ‘आकाश’ शब्दामध्ये असेच एक महान अनुभूती शास्त्र आहे. ‘आकाश’ शब्द, एक ’आ’ व दुसरा ’काश’ या दोन मूळ शब्दापासून बनलेला आहे. ’आ’ म्हणजे सर्वांना अंतर्बाह्य व ’काश म्हणजे आवरण घालणे किंवा व्यापणे. म्हणून आकाश तत्त्वयोगे विश्वाची अशी एक अवस्था आढळून येते की, जी अखिल विश्वाला अंतर्बाह्य व्यापून राहिलेली आहे. आकाश तत्त्वाशिवाय विश्वातील एकही स्थान किंवा जागा रिकामी नाही. आकाशतत्त्व सर्वव्यापी, सर्वस्थित व सर्वगामी आहे. विश्वाच्या व्यक्त अवस्थतेचे हे सर्वप्रथम रुप किंवा तत्त्व आहे. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून याला ‘इथर’ म्हणता येईल. परंतु, वैज्ञानिक ‘इथर’खेरीज दुसरे काही मानत नाहीत. अखिल विश्वाची उत्पत्ती ‘इथर’पासून झालेली नाही. वैज्ञानिक विश्वाच्या उत्पत्तीच्या मुळाशी आणखी एखादे भिन्न तत्त्व असावे, असे मानतात. परंतु, ते तत्त्व कोणते, हे मात्र अजून त्यांना निश्चित करता आलेले नाही.
 
 
वैदिक परंपरेमध्ये आकाश तत्त्वाला सर्व तत्त्वांचे मूळतत्त्व मानण्यात आले आहे. आकाशतत्त्वापासून इतर सर्व तत्त्वे उत्पन्न होतात. ‘इथर’बद्दल अशी स्थिती नाही. म्हणून ‘इथर’ तत्त्व म्हणजे आकाशतत्त्व नाही. प्रत्येक तत्त्वाला आपला स्वतःचा असा एक गुण आणि वर्ण असतो. आकाशतत्त्वाचा वर्ण हा नीलश्यामल आहे. परातत्त्वाचा वर्ण कृष्ण म्हणजेच प्रकाशरहित काळा आहे. आकाशतत्त्वामध्ये परातत्त्वाची काळी छाया श्याम वर्णने भिनलेली आहे. साधक जेव्हा आकाश अवस्थेमध्ये स्थिर होतो, तेव्हा त्याला नीलश्यामल वर्णाची सजीव अनुभूती प्राप्त होते.
 
 
(क्रमशः)
 
 
- योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.