मायावतींचे ‘ब्राह्मण कार्ड’

    दिनांक  20-Jul-2021 23:04:25
|

Mayavati_1  H x
 
 
 
आज ब्राह्मणांना आपलेसे करण्यासाठी प्रयत्न करणारा बहुजन समाज पक्ष नंतर ब्राह्मणांना दूरही लोटू शकतो, त्याचा इतिहास तसाच आहे. त्यामुळे ब्राह्मण समाज बहुजन समाज पक्षाने कितीही संमेलने आयोजित केली तरी त्या जाळ्यात अडकणार नाही.
 
 
 
येत्या वर्षभरात होऊ घातलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, ‘एआयएमआयएम’ असे सर्वच पक्ष मतदारांना आपल्या मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातल्या त्यात निराळ्या प्रकाराची पुनरावृत्ती बहुजन समाज पक्ष करताना दिसत आहे, ती म्हणजे ब्राह्मण समाजाला पाठीशी उभे करण्याची. प्रारंभीच्या काळात ‘तिलक, तराजू और तलवार, इनको मारो जूते चार’ अशी घोषणा देऊन ब्राह्मण, वैश्य आणि क्षत्रियांशी उभा दावा मांडून बहुजन समाज पक्षाने आपले राजकारण केले. त्याआधारे त्या पक्षाने सत्ता मिळवण्याचाही प्रयत्न केला. पण, नंतर मात्र बहुजन समाज पक्षाने आपल्या घोषणेत बदल केला. २००७ साली ‘सोशल इंजिनिअरिंग’ करत ब्राह्मणांना आपलेसे केले, त्यावेळी त्यांची घोषणा ‘हाथी नहीं गणेश हैं, ब्रह्मा, विष्णू, महेश हैं’ अशी होती. त्या जोरावर मायावतींनी उत्तर प्रदेशची सत्ताही प्राप्त केली. पाच वर्षे त्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरही राहिल्या. पण, नंतर त्या आपल्या घोषणेपासून मागे हटल्या आणि अखिलेश यादव यांना उत्तर प्रदेशची सत्ता मिळाली, तर २०१७ साली भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशात विक्रमी बहुमत मिळवले आणि योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून राज्याच्या सत्तेबाहेर असलेल्या मायावतींची सत्ताप्राप्तीची इच्छा पुन्हा एकदा जागृत झाल्याचे दिसते. त्यासाठी त्यांनी आताचे योगी आदित्यनाथ सरकार ब्राह्मणांवर अन्याय करत असल्याचा आरोप केला आहे. “ब्राह्मण समाजाचे हित केवळ बहुजन समाज पक्षच साधू शकतो. ब्राह्मण समाज भाजपच्या जाळ्यात अडकला होता व आता तो पस्तावत आहे,” असे त्या म्हणाल्या. आगामी विधानसभा निवडणुकी वेळी ब्राह्मणांनी बहुजन समाज पक्षाच्या मागे यावे व यासाठी चालू महिन्याच्या अखेरपासून ब्राह्मण समाज संमेलन सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
 
 
दरम्यान, बहुजन समाज पक्षाने नेहमीच हिंदू समाजाला तोडण्याचे काम केले. ब्राह्मण, वैश्य आणि क्षत्रिय समाज घटकांचा विरोध करताना त्यांनी स्वतःला ‘दलितांचा मसिहा’ म्हणून पेश केले. दलितांना वरील तिन्ही समाजघटकांच्या समोर उभे करताना त्यांना शत्रूच ठरवले. म्हणजेच, दोन समाजात फूट पाडायची आणि त्यावर आपल्या राजकारणाची पोळी शेकायची, हाच कित्ता त्यांनी गिरवला. त्यातून समाजात परस्परांबद्दल फक्त द्वेषभावनाच वाढीस लागली. समाजात दुभंग निर्माण झाला. बहुजन समाज पक्ष किंवा मायावतींच्या राजकारणामुळे हिंदू समाजाचा एक घटक त्यापासून तुटला. राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी दोन समाजात तेढ निर्माण करतात, नंतर आपल्याच मतलबासाठी विसरतातही. पण, सर्वसामान्य कार्यकर्ते, समाजघटकांतील एकमेकांबद्दलची तिरस्काराची भावना मात्र तशीच राहते. २००७ साली मायावतींनी जुन्या घोषणा विसरून ब्राह्मण समाजाला आपल्याबरोबर घेतले. पण, त्याने त्यांच्या तोपर्यंतच्या कार्यकर्त्यांच्या मनातील विष बाहेर गेले असेल का, तर नाहीच. म्हणूनच नंतरच्या काळात ब्राह्मणांच्या बळावर सत्ता मिळवणार्‍या मायावतींनी त्यांना दूर लोटले. त्यांच्या कार्यकर्ते, नेत्यांनीही पुन्हा एकदा द्वेषभावना वाढीस लावली. पण, त्यानेही काम झाले नाही म्हणून त्यांना यंदाच्या वर्षी परत एकदा ब्राह्मण समाजाची आठवण झाली. म्हणजेच, गरज असेल तेव्हा एखाद्या समाजाविरोधात गरळ ओकायची आणि गरज असेल, तेव्हा त्याच समाजाला जवळ करायचे, असा हा मायावतींचा खेळ आहे. पण, यामुळे समाजासमाजात ऐक्य निर्माण होऊ शकत नाही व आताच्या ब्राह्मण संमेलनाचा उद्देशही तसा काही नसेलच. फक्त ब्राह्मणांनी आपल्याला मतदान करावे व सत्तासिंहासनावर विराजमान करावे, हीच मायावतींची यामागची लालसा असणार. पण, उत्तर प्रदेशातील ब्राह्मण समाजही मायावतींचा स्वार्थ ओळखूनच आपले व राष्ट्राचे हित कशात आहे, हे पाहून मतदान करेल, असे वाटते.
 
 
दरम्यान, ब्राह्मण समाजावर अन्याय होत असल्याच्या मायावतींच्या आरोपाला कुख्यात गँगस्टर विकास दुबेच्या मृत्यूची पार्श्वभूमी आहे. मात्र, गुंडगिरी करणारा कोणीही असो, गुन्हेगारी कृत्य करणारा कोणीही असो, त्याला शिक्षा होत असेल वा त्याचे कुकृत्य कोणत्याही प्रकारे थांबत असेल, तर त्याबद्दल वाईट वाटून घेण्याचे वा त्याविषयी सहानुभूती बाळगण्याचे कारण नाही. मायावतींना तेच कळत नसून, त्या ब्राह्मणांवरील खोट्या अन्यायाच्या कहाण्या सांगून प्रत्यक्षात गुंड, गुन्हेगारांबद्दल आपुलकी निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. तथापि, उत्तर प्रदेश असो किंवा कोणत्याही राज्यातील सुजाण व सुशिक्षित व्यक्ती, ब्राह्मण समाज त्याला भुलण्याची शक्यता नाही. राज्यात ब्राह्मण समाजाची दहा टक्के मते असून त्यांना तरल मतदार मानले जाते हे खरेच! कोणत्या पक्षाची सत्ता येईल, हे ठरवण्यात उत्तर प्रदेशात तरी ब्राह्मण समाजाची मते यामुळेच महत्त्वाची मानली जातात. त्यामुळेच इथल्या ब्राह्मण समाजाला आपल्या मागे उभे करण्याचा आटापिटा मायावती करत आहेत. पण, त्यात त्या यशस्वी होतील असे नाही. कारण, बहुजन समाज पक्षाची आजची राजकीय परिस्थिती इतकी ताकदवान नाही की, त्याच्या मागे ब्राह्मणांनी वा कोणत्याही समाजघटकाने उभे राहावे. बहुजन समाज पक्षाची अवस्था आज बुडणार्‍या जहाजासारखी झालेली आहे. मायावती वगळता राज्यात नाव घेण्यासारखा नेता नाही. पक्ष संघटना वा कार्यकर्त्यांचा पत्ता नाही. कारण, भाजपच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ धोरणाने समाजात जनजागृती घडवली आहे आणि आपण नेमके कोणाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, याचे भान आणले आहे. सोबतच आज ब्राह्मणांना आपलेसे करण्यासाठी प्रयत्न करणारा बहुजन समाज पक्ष नंतर ब्राह्मणांना दूरही लोटू शकतो, त्याचा इतिहास तसाच आहे. त्यामुळे ब्राह्मण समाज बहुजन समाज पक्षाने कितीही संमेलने आयोजित केली तरी त्या जाळ्यात अडकणार नाही. मायावतींचे तथाकथित ‘सोशल इंजिनिअरिंग’ यंदा कोणताही चमत्कार घडवणार नाही, असे वाटते.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.