आशिष चौहान यांचा 'मुंबई रत्न' पुरस्काराने सन्मान !

    20-Jul-2021
Total Views |


Ashish Chouhan_1 &nb
 
 
 
मुंबई : ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’चे (बीएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे 'मुंबई रत्न' या सन्मानाने गौरविण्यात आले. १९ जुलै रोजी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ३१ निवडक व्यक्तींना हा सन्मान देण्यात आला आहे. फिल्म्स टुडे, नाना नानी फाउंडेशन व एनार समूहातर्फे सदर पुरस्कार देण्यात आले.
 
 
 
आशिष चौहान यांना भारतात आर्थिक व्युत्पन्नाचा (फायनान्शिअल डेरिव्हेटीव्हज्) जनक मानले जाते.‘बीएसई’ची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात आशिष चौहान यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. ते २००९ सालापासून बीएसईशी जोडले गेले, त्यांच्याच नेतृत्वाखाली जगातील सर्वांत वेगवान ‘स्टॉक एक्सचेंज’ अशी ‘बीएसई’चा ओळख निर्माण झाली. त्यांच्या प्रयत्नांनीच ‘बीएसई’ने आपला ‘आयपीओ’देखील बाजारात आणला होता. ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’चेही ते संस्थापक सदस्य आहेत. चौहान यांनी ‘आयआयटी’ मुंबई येथून मेकॅनिकल इंजिनिअरींगमध्ये बी.टेक केले असून आयआयएम कोलकाता येथून पदव्युत्तर पदविकाही मिळविली आहे.चौहान यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात बँकर म्हणून केली. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या विविध समित्यांवरही त्यांनी काम केले आहे. साउथ एशिया फेडरेशन ऑफ एक्सचेंज या २० हून अधिक देशांच्या स्टॉक एक्सचेंज गटाचेही त्यांनी नेतृत्व केले आहे. टोरंटो येथील रेयरसन विद्यापीठात आणि नॉटिंघम युनिव्हर्सिटीमध्येही ते अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
 
 
 
राज्यपालांच्या हस्ते गोदरेज समूहाचे अध्यक्ष आदी गोदरेज, महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, बांधकाम उद्योजक निरंजन हिरानंदानी, वकील उज्ज्वल निकम, इंडियन एक्स्प्रेस समूहाचे अनंत गोयनका, वैद्यकीय तज्ञ डॉ गौतम भन्साळी, मंजू लोढा, पार्श्वगायक उदित नारायण, भजन सम्राट अनुप जलोटा, युनियन बँकेचे अध्यक्ष राजकिरण राय, डॉ शोमा घोष, आशिष चौहान आदींना यावेळी सन्मानित करण्यात आले. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा व वेदांत समूहाचे अनिल अगरवाल कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. कार्यक्रमाला फिल्म्स टुडेचे अध्यक्ष श्याम सिंघानिया व राजेश श्रीवास्तव उपस्थित होते.
 
 
उद्योजक, कलाकार, वकील, वैद्यकीय तज्ज्ञ असे सर्वच जण समाजासाठी आपापल्या परीने योगदान देत असतात. मात्र सर्वांना आरोग्य सेवा व शिक्षण उपलब्ध करून, तसेच गरिबी हटवून देश आत्मनिर्भर करण्यासाठी प्रत्येकाने समाजासाठी अधिक योगदान दिले पाहिजे.
 
 
- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी