अनिल देशमुखांची टाळाटाळ सुरूच ! 'चौकशीला सहकार्य करत नाहीत हे दुर्दैव'

02 Jul 2021 18:44:44

anil deshmukh_1 &nbs

मुंबई,दि.२जुलै (प्रतिनिधी): मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची वसूली करण्याचा आरोप लावल्यानंतर देशमुख ईडीच्या रडारवर आहे. याप्रकरणी ईडीने समन्स बजावून देखील देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले नाही. मात्र ट्विट करून ईडीला नेमकी काय चौकशी करायची आहे. त्यासाठी कोणती कागदपत्रे हवीत अशी विचारणा केली आहे.

याबाबत अनिल देशमुखांनी ट्विट केले की. ईडीने मला कागदपत्रांसहीत उपस्थित रहावे असे दोन समन्स पाठविले आहे. मी ईडीला दोन सविस्तर पत्रे पाठवून मला 'ECIR' ची कॉपी द्यावी आणि त्यांना जी कागदपत्रे हवी आहेत त्यांची यादी द्यावी, अशी विनंती केली आहे. जेणेकरून मला या कागदपत्रांची जुळवाजुळव करून ती ईडीला पाठविता येईल. त्याचबरोबर इतर बाबींचा सविस्तर उल्लेख मी माझ्या ईडीला दिलेल्या दोन्ही पत्रांत केला आहे. मी ईडीला यापूर्वीही सहकार्य केले आहे व यापुढेही असेच सहकार्य करत राहील,असेही देशमुख म्हंटले आहे.

देशमुखांच्या या ट्विटवर विरोधी पक्ष भाजपने मात्र सडकून टीका केली. भाजप आमदार आशिष शेलार म्हणतात, राज्याच्या गृहमंत्री पदी काम केलेले देशमुख तपास यंत्रणांना चौकशीला मदत करीत नाहीत हे चित्र दुर्दैवी आहे. ज्या पध्दतीचे ट्विट ते टाकत आहेत त्यातून सहकार्य करत असल्याचे सांगत आहेत. पण प्रत्यक्षातते कोणतेही सहकार्य करत नाहीयेत. त्यामुळे तपास यंत्रणांंनी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. ज्यावेळी ते स्वतः गृहमंत्री होते त्यावेळी एका चँनलच्या संपादकांना अशी सवलत त्यांनी दिली होती का? लेखी प्रश्न पाठवून उत्तरे मागितली होती का? कोरोना पसरेल म्हणून चौकशीला येऊ नका, अशा सवलती तुम्ही त्यावेळी तुम्ही दिल्या होत्या का? असा सवाल ही शेलार यांनी उपस्थित केले आहेत.


अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी दोनवेळा छापेमारी केली आहे. तसेच सीबीआय समोर अनिल देशमुख यांची एकदा चौकशी देखील झाली आहे. तर ईडीच्या छापेमारी दरम्यान अनिल देशमुख त्यांच्या वरळीतील निवासस्थानी स्वत: हजर देखील होते. दरम्यान याच प्रकरणात अनिल देशमुख यांना दोन वेळा ईडीने समन्स देखील पाठवला आहे. मात्र दोन्ही वेळेस अनिल देशमुख चौकशीसाठी उपस्थित नव्हते. उलट ईडी चौकशीला मी सहकार्य करेल मात्र तत्पूर्वी मला 'ECIR' ची कॉपी द्यावी आणि त्यांना जी कागदपत्रे हवी आहेत त्यांची यादी द्यावी, अशी विनंती केली आहे.


सचिन वाझे प्रकरणात तात्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाली. बदली झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी एक पत्र मुख्यमंत्री आणि राज्याचे पोलिस महासंचालकांना लिहिले होते. या पत्रात परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आरोप लावले. ही वसुली मुंबईतील काही बारमधून केली जात असल्याचा उल्लेख देखील या पत्रात करण्यात आला. दरम्यान याच प्रकरणात पुढे केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीचे फास अनिल देशमुख यांच्या भोवती आवळला. दरम्यान देशमुख यांना गृहमंत्रीपद देखील गमवावे लागले होते. यासर्व प्रकरणातील अर्थिक गैरव्यवहाराचा तपास ईडी करत आहे. तपासादरम्यान ठोस पुरावे आढळल्याने अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहाय्यक कुंदन शिंदे यांना ईडीने अटक केली आहे. ही कारवाई ईडीने २५ जून रोजी केली. सध्या दोघे अटकेत आहेत या दोघांनाही ५ जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. या दोघांनीही चौकशी दरम्यान अनिल देशमुख यांचं नाव घेतल्याचे ईडीमधील सूत्रांकडून कळते यामुळे अनिल देशमुख यांच्यावर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार आहे. म्हणूनच अनिल देशमुख चौकशीला जाण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची टीका भाजपणे केली आहे.

Powered By Sangraha 9.0