पंतप्रधानांच्या ‘मिशन कर्मयोगी’मध्ये प्रवीण परदेशी यांची महत्वाची भूमिका

02 Jul 2021 17:56:44
pp_1  H x W: 0



‘कर्मयोगी मिशन’चे ‘शिलेदार’
 
 
 
नवी दिल्ली, २ जुलै, (विशेष प्रतिनिधी) : प्रशासकीय सेवेतील अधिकारी – कर्मचाऱ्यांची क्षमता वृद्धी आणि त्यांना अधिकाधिक लोकभिमुख करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून ‘मिशन कर्मयोगी’योजनेस कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याअंतर्गत राष्ट्रीय क्षमता निर्माण आयोगाच्या (नॅशनल कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशन) सदस्यपदाचा कार्यभार मराठी भाषा विभागाचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी स्विकारला आहे.
 
 
 
 
प्रवीण परदेशी काही काळापासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका प्रकल्पासाठी तेथे प्रतिनियुक्तीवर होते. दरम्यानच्या काळात त्यांची नियुक्ती केंद्र सरकारने राष्ट्रीय क्षमता निर्माण आयोगाच्या (नॅशनल कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशन) सदस्यपदी केली होती. त्याविषयी मुंबई तरुण भारतशी बोलताना परदेशी म्हणाले, परदेशात प्रतिनियुक्तीवर असल्याने केंद्राची नियुक्ती स्विकारण्यापूर्वी राज्यात पुन्हा परतून तेथे नियुक्तीपत्र घेणे आणि त्या पदाचा राजीनामा देऊन केंद्राची नियुक्ती स्विकारणे गरजेचे होते. त्यानुसार, राज्य सरकारने परदेशी यांची नियुक्ती ३० जून रोजी मराठी भाषा विभागाच्या अतिरिक्त सचिवपदी केली होती. त्यानंतर आता परदेशी केंद्र सरकारमध्ये कार्यरत झाले आहेत.
 
 
 
बदलत्या जागतिक प्रवाहांचा विचार करता नागरी सेवेतील अधिकाऱ्याची त्यानुसार घडण होणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांमध्ये व्यावसायिकता, कल्पनशीलता, नवोन्मेष, पारदर्शकता, रचनात्मकता आणि तंत्रज्ञानस्नेही हे गुण असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यासाठी गतवर्षी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘मिशन कर्मयोगी’योजनेस मंजुरी दिली होती. त्याअंतर्गत प्रशासनास खास भारतीय वळण लावण्याचे ध्येय साध्य केले जाणार आहे.
 
 
 

mk_1  H x W: 0  
 
 
 
या योजनेतील एक महत्वाचा घटक म्हणजे राष्ट्रीय क्षमता निर्माण आयोग. त्याअंतर्गत देशातील ३० लाख सनदी अधिकारी – केंद्र सरकारी कर्मचारी यांच्या सध्याच्या कार्यशैलीस नवे रुप दिले जाणार आहे. त्यासाठी पंतप्रधानांनी तीनसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. त्याच्या अध्यक्षपदी क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडियाचे प्रमुख आदिल जैनुलभाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या मनुष्यबळ विकास सदस्य म्हणून स्वामी विवेकानंद युथ मुव्हमेंटचे रामस्वामी बालसुब्रमण्यम यांची तर सचिवपदी हेमांग जानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
 
 
 
परदेशी यांच्या प्रशासकीय कौशल्याचा लाभ
 
 
समितीच्या प्रशासन सदस्यपदी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त प्रविण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रविण परदेशी भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९८५ च्या तुकडीचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. परदेशी यांचे प्रशासकीय कौशल्य वादातीत आहे. लातुर येथे १९९३ साली भुंकपात मदतकार्य आणि पुनर्वसन करण्याची जबाबदारी परदेशी यांनी अत्यंत कुशलतेने पार पाडली होती. प्रशासकीय यंत्रणेकडून नेमकेपणाने काम करून घेण्यातही त्यांचा विशेष हातखंडा आहे. त्यामुळे राष्ट्रीय क्षमता निर्माण आयोगास त्यांच्या अनुभवाचा निश्चितच फायदा होईल.
 
 
 
Powered By Sangraha 9.0