१०० वर्षे अभिमानाची, १०० वर्षे ज्ञानदानाची!

02 Jul 2021 23:30:27

Indian high school_1 
 
 
मनमाडमधील ‘राष्ट्रीय शिक्षण संस्था’ संचलित ‘मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय’ अर्थात ‘इंडियन हायस्कूल’ आज ३ जुलै रोजी ९९ वर्षे पूर्ण करून शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्त...
 
 
एखाद्या शाळेची ‘शताब्दी’ होण्याचा फार दुर्मीळ प्रसंग असतो आणि याचे साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले, याचा माजी विद्यार्थी म्हणून मला अतिशय अभिमान आहे. लोकमान्य टिळकांनी दिलेल्या ‘स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, विदेशी मालावर बहिष्कार’ या चतुःसूत्रीचा खर्‍या अर्थाने स्वीकार करून दि. ३ जुलै, १९२२ रोजी मनमाडसारख्या लहानशा गावात कै. रावसाहेब सप्रे यांनी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे रोपटे लावले. रावसाहेब हे ‘व्हीजेटीआय’ या संस्थेचे माजी विद्यार्थी होते. इंग्रजी आमदानीत सुरू झालेल्या मनमाड रेल्वे कारखान्यात अधिकारी पदावर ते कार्यरत होते. नोकरी एके नोकरी न करता, आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेने त्यांनी आपल्या इतर सहकार्‍यांच्या मदतीने मनमाडला शाळा सुरू केली. तत्कालीन इंग्रज सरकारनेदेखील शाळेला पुरेपूर सहकार्य केले. आपली वापरात नसलेली इमारत शाळेसाठी देऊ केली, शाळेत शिकणार्‍या रेल्वे कर्मचार्‍यांच्या पाल्यांच्या संख्येच्या आधारावर काही प्रमाणात अनुदानदेखील रेल्वेकडून प्राप्त होत असे. १९३१ साली तत्कालीन रेल्वे ‘जीएम’ यांनी तपासणी केल्यानंतर दिलेल्या अहवालात, ‘मी बघितलेली देशातील सर्वोत्कृष्ट नेटिव शाळा,’ असा उल्लेख केला होता.
 
 
 
ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर हे काही वर्षे शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. याच काळात कै. केतकर सर हे विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. उत्तम प्रशासक, अभ्यासू, कर्तव्य कठोर, विद्यार्थी हितदक्ष असलेले केतकर सर कायदा शाखेचे पदवीधर, उत्तम साहित्यिक, इतिहास संशोधक होते. त्यांनी शाळेस एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले, शाळेचा आदराने उल्लेख ‘मनमाडचे ऑक्सफोर्ड’ असा केला जात असे. केतकर सरांनी शाळेसाठी लोकमान्य सभागृहाची निर्मिती केली. हे सभागृह मनमाडच्या सांस्कृतिक, राजकीय व साहित्यिक चळवळीचे केंद्रबिंदू आहे. हॉलच्या भिंतींना कान लावले, तर मनमाडचा इतिहास सहज लक्षात येईल. जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांसह, विविध साहित्यिक, समाजसेवक, कलावंत, अशा अनेक मान्यवरांचे पाय या हॉलला लागले आहेत. लोकमान्य सभागृहामुळे शाळेतील विद्यार्थी बहुश्रुत झाले असे नाही, तर मनमाडच्या जडणघडणीत या सभागृहाचे सर्वात मोठे योगदान आहे. स्वातंत्र्य चळवळीत तसेच स्वातंत्र्योत्तर विविध सामाजिक आंदोलनात शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, संचालक यांचा सक्रिय सहभाग होता. आणीबाणीत शिक्षक कै. मांडवगणे व संचालक मा. द. सप्रे वकील, रामकिसन झंवर यानी तुरुंगवास भोगला होता. केतकर सरांबरोबरच शाळेच्या विकासात कै. अयाचित, कै. घुले, कै. वसंतराव अहिरे, शाळेच्या पहिल्या महिला मुख्याध्यापिका कै. शैलजा भगत, कै. लाळे (यांचा सहभाग होता.) कै. कुसुम कीर्तने या मनमाड नगर परिषदेत नगरसेविका म्हणून विजयी झाल्या व पुढे मनमाड शहराच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळविला. कै. पाटकर, कै. ठाकूर, कै. कुलकर्णी, अलका महाजन यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रश्नावर झालेल्या आंदोलनासह विविध पुरोगामी चळवळीत भरीव असे योगदान दिले आहे. सुतार, बर्‍हाटे, पैठणकर या सर्व माजी मुख्याध्यापकांचे शाळेच्या जडणघडणीत फार मोठे योगदान आहे, हे विसरून चालणार नाही. शाळेतील शिक्षकांनीदेखील कला-साहित्य क्षेत्रात भरीव अशी कामगिरी केली असून, त्यात प्राधान्याने उल्लेख करावा लागेल तो वा. ह. ठोके, सदाशिव सुतार व प्रभाकर डंके यांचा.
 
 
 
शाळेच्या १०० वर्षांच्या वाटचालीत अनेक कर्तृत्ववान विद्यार्थ्यांना शाळेने घडविले. सर्वांचीच नावे येथे देता येणे शक्य नसली तरी त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा, असे सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर, दहावीत गुणवत्ता यादीत आलेला डॉ. प्रदीप साळी, दहावी व बारावी या दोन्ही परीक्षांत गुणवत्ता यादीत आलेली सुवर्णा बर्‍हाटे इ. अनेकांनी विविध क्षेत्रांत कार्य करून विद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात राज्य पातळीपर्यंत धडक मारली आहे. विज्ञान प्रदर्शनात शाळेचा उज्ज्वल इतिहास असून, राष्ट्रीय पातळीपर्यंत शाळेने मजल मारली आहे. काही वर्षांपूर्वीच काळाची पावले ओळखत शाळेने इंग्रजी माध्यमाचा विभाग सुरू केला. राज्यात निवडक अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत, त्यातील एक आपली आहे. शाळेचा उच्च माध्यमिक शास्त्र विभाग असून, गेल्या अनेक वर्षांपासून या विभागाची १०० टक्के निकालाची परंपरा आहे. सुशीलाबाई चंद्रभान बागरेचा नावाने सुरू केलेला प्राथमिक विभाग देखील देदीप्यमान कामगिरी बजावत असून, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत एकाच वर्षी प्राथमिक विभागाच्या दहा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त करून इतिहास रचला होता. शाळेचे ग्रंथालय समृद्ध असून विविध भाषांतील उत्तमोत्तम ग्रंथ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. विद्यालयाला सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे. तीन संगणक प्रयोगशाळा विद्यालयात कार्यरत आहेत. सर्व प्रकारच्या भौतिक सोयी-सुविधांनी विद्यालय समृद्ध आहे.
 
 
 
शाळेच्या सुखी संसाराला गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी गालबोट लागले. शाळेची इमारत व क्रीडांगण रिकामी करण्याची रेल्वे प्रशासनाने मागणी केली. सद्यःस्थितीत ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत अधिक लिहिता येत नाही. न्यायालयावर विद्यालयाचा पूर्ण भरवसा आहे. समुद्रमंथनातून ज्याप्रमाणे अमृत प्राप्त झाले, त्याप्रमाणेच न्यायमंथनातूनही अमृत आमच्या हाती लागेल यात शंकाच नाही. शाळेने आज शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. शंभरीनिमित्त विविध उपक्रम राबविण्याचा शाळेचा निर्धार आहे. हे सर्व उपक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी व आजी विद्यार्थी, संस्थाचालक कटिबद्ध आहेत. शाळेचा इतिहास लिहिताना संस्थाचालकांचे योगदानदेखील विसरून चालणार नाही. संस्थापक कै. तात्यासाहेब सप्रे, कै. आर. एल. जोशी, कै. माधवराव सप्रे वकील, कै. बाळासाहेब माणके, कै. श्रीनिवास अग्रवाल, कै. रामकिसन झंवर, कै. विनायकराव संसारे, कै. सी. एच. बागरेचा, कै. सुधीर तात्या सप्रे, कै. डॉ. अशोक महाजन, डॉ. वि छ. मालते, शोभना सप्रे यासह विद्यमान संचालक मंडळाचे योगदान तितकेच महत्त्वाचे आहे. आम्हा सर्व माजी विद्यार्थ्यांच्या पंखात बळ देणारी आमची शाळा सद्यःस्थितीतील संकटावर मात करून ‘फिनिक्स’ पक्ष्याप्रमाणे पुन्हा एकदा भरारी घेईल, अशी आम्हा सर्व माजी विद्यार्थ्यांना खात्री आहे. त्यासाठी लागेल ते योगदान देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
 
 
- हर्षद गद्रे
 
 
Powered By Sangraha 9.0