‘डिजिटल भारत’ म्हणजे किमान सरकार आणि कमाल प्रशासन: नरेंद्र मोदी

02 Jul 2021 12:07:05

digital india_1 &nbs

नवी दिल्ली : “भारताने नावीन्यपूर्ण संशोधनाप्रति तीव्र आकांक्षा आणि हे संशोधन वेगाने आत्मसात करून वापरण्याची क्षमता अशा दोन्ही पातळ्यांवर रुची दर्शविली आहे. ‘डिजिटल भारत’ हे ‘आत्मनिर्भर भारता’साठीचे एक साधन आहे. ‘डिजिटल भारत’ हे २१ व्या शतकात उदयाला येत असलेल्या सशक्त भारतीयत्वाचे प्रकटीकरण आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, दि. १ जुलै रोजी व्यक्त केले.
 
“ ‘डिजिटल भारत’ मोहिमेस सहा वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारताने कोरोना काळात तयार केलेल्या डिजिटल उपाययोजना हा आज संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारा आणि चर्चेला चालना देणारा विषय झाला आहे,” असे पंतप्रधानांनी सांगितले. जगातील सर्वात मोठ्या डिजिटल संपर्कशोध अ‍ॅपपैकी एक असलेल्या ‘आरोग्यसेतू’ अ‍ॅपने कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी करण्यात मोठी मदत केली आहे. ते पुढे म्हणाले की, “लसीकरणाच्या सर्व बाबींसाठी भारताने तयार केलेल्या ‘कोविन’ अ‍ॅप मध्ये अनेक देशांनी रुची दर्शविली आहे. लसीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी परीक्षण करणारे असे साधन तयार करणे हा आपल्या देशाच्या तंत्रज्ञानविषयक नैपुण्याचा पुरावाच आहे,” असे ते म्हणाले.

 
पंतप्रधानांनी सांगितले की, “ ‘डिजिटल भारत’ म्हणजे सर्वांसाठी संधीची उपलब्धता, सर्वांसाठी सुविधा आणि सर्वांचा सहभाग. ‘डिजिटल भारत’ म्हणजे सरकारी यंत्रणेपर्यंत प्रत्येकाला पोहोचता येईल, असा मार्ग. ‘डिजिटल भारत’ म्हणजे पारदर्शक, भेदभावविरहित यंत्रणा आणि भ्रष्टाचारावर हल्लाबोल. ‘डिजिटल भारत’ म्हणजे वेळेची, श्रमांची आणि पैशांचीही बचत. डिजिटल भारत म्हणजे वेगवान नफा, संपूर्ण नफा. डिजिटल भारत म्हणजे किमान सरकार आणि कमाल प्रशासन अशी नवी ओळख निर्माण झाले आहे,” असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.


Powered By Sangraha 9.0