नारी तू नारायणी!

19 Jul 2021 20:57:44

Minakshi Khosla_1 &n
 
 
मीनाक्षी खेासला आंतरिक इच्छाशक्तीच्या दुर्दम्य यशाचे दुसरे नाव. आज समाजात विविध आयामातून त्या सेवाकार्य करीत आहेत. ‘आहे रे नि नाही रे’साठी तन-मन-धन अर्पून सेवाकार्य करणारे त्यांचे जगणे. त्यांच्या आयुष्याचा घेतलेला हा मागोवा.
“ईश्वर एक आहे आणि ही दुनियाही एकच आहे. आपण सर्व समान आहोत. कुणाला जाणूनबुजून त्रास देणे हे पाप आहे, हा मंत्र आयुष्याचा सार आहे,” असे मीनाक्षी खोसला यांचे म्हणणे. ‘इनरव्हिल क्लब ऑफ मुलुंड’च्या त्या अध्यक्षा. ‘लोटस लिप इंटरटेन्मेंट’च्या त्या ‘प्रोपरायटर’ आहेत. कर्करोगग्रस्त रुग्णांचे समुपदेशन करणे, त्यांच्या उपचारासाठी आर्थिक पाठबळ उभे करणे, यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आखीव-रेखीव सुखासीन आयुष्य; पण या ‘आहे रे’ परिस्थितीमध्येही ‘नाही रे’ गटातील बांधवांसाठी काही तरी करावे, असे कायमच मीनाक्षी खोसला यांना वाटते. नुसते वाटतेच असे नाही, तर या विचारावर त्या प्रत्यक्ष अंमलबजावणीही करतात.
 
 
 
मेरठच्या के. डी. आर्य आणि चंद्रकला या दाम्पत्याची अत्यंत सुशील आणि सुविद्य कन्या मानाक्षी. घरात आर्य समाजाचा प्रभाव. के. डी. आपल्या मुलींना नेहमी सांगत की, “तुम्ही त्या देवाला धन्यवाद द्या! कारण, आज तुमच्याकडे जे आहे, ते कित्येकांकडे नाही. जर काहीही नसते तरी देवाने तुम्हाला श्वास दिला आणि जगणे दिले आहे, त्यासाठी देवाला धन्यवाद द्या.” आर्य समाजाच्या एकत्रीकरणासाठी के. डी. आणि चंद्रकला मुक्तहस्ताने दान करत, अर्थसाहाय्य उभे करत. के.डी. ‘एलआयसी’चे उच्चपदस्थ अधिकारी होते. पण, घरात शिकवले जाई की, ‘आपली संपत्ती आहे आपले कुटुंब, आपली संवेदनशील माणुसकी.’ या विचारांचे संस्कार मीनाक्षी यांच्यावर होत होते. अतिशय हुषार आणि अभ्यासू मुलगी म्हणून शाळेत आणि परिसरात त्यांना ओळखले जाई. लहानपणी त्यांच्या मुख्याध्यापकांना आणि त्यांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना २६ जानेवारीला भेटण्याचा योग आला. त्यावेळी मीनाक्षी यांनी पहिल्यांदा सैन्याची परेड समोरासमोर पाहिली. त्यानंतर पुढे त्यांचे कुटुंब वाघा बॉर्डर, अमृतसर येथे गेले होते. तेथील वातावरण, आपल्या सैनिकांचा जोश, देशभक्ती पाहून मीनाक्षी यांना वाटले की, आपण सैन्यात जावे. पण, त्यांना सैन्यात जाता आले नाही. पुढे त्यांनी बी.ए.पर्यंत शिक्षण केले. त्यानंतर चित्रकलेचे शिक्षण घेतले. मीनाक्षी यांना चित्रकला, गायन, अभिनय यामध्ये विशेष रस आणि गती होती आणि आहे. याचे मूळ कदाचित चंद्रकला याच असाव्यात. कारण, चंद्रकला यांचा गळा गोड होता. अत्यंत सुश्राव्य स्वरात त्या भजन म्हणत. पुढे मीनाक्षी यांचा विवाह राज खोसला यांच्याशी झाला. त्या मुंबईला आल्या. चारचौघांसारखे ठरावीक साचात आयुष्य सुरळीत सुरू होते. राज हे रोटरी क्लबचे अत्यंत ज्येष्ठ आणि सन्माननीय पदाधिकारी. त्यामुळे घरात सेवाकार्याचा ओघ होताच. या काळात मीनाक्षी यांनी मुलांच्या पालनाकडे पूर्ण लक्ष दिले. मुलं मोठी होताच मग त्यांनीही ‘इनरव्हिल’ संस्थेत काम करण्यास सुरुवात केली. त्याच काळात मीनाक्षी आजारी पडल्या आणि स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले. शस्त्रक्रिया, त्याआधीचे आणि नंतरचे उपचार या सगळ्यातून जाताना मीनाक्षी यांना कुटुंबाने, ‘रोटरी क्लब’ आणि ‘इनरव्हिल’ संस्थेतील त्यांच्या स्नेह्यांनी जातीने लक्ष दिले. मीनाक्षी यांना कर्करोगाशी लढण्यास बळ दिले. त्यांनी कर्करोगावर विजय मिळवला. दुसरा जन्मच तो. या सगळ्या प्रवासात मीनाक्षी यांच्या मनात काही प्रश्न उमटत होते. ते असे की, आपण सुखवस्तू घरातून आहोत, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारे कुटुंब आणि वेळ देणारे स्नेही आप्त आहेत. पण, एखाद्या गरीब घरच्या एकाकी स्त्रीला हा आजार गाठत असेल तर? तर त्या काय करत असतील? पैसे नाहीत, उपचार नाहीत, कुणाची मदत नाही, कुणी सोबत नाही, अशा परिस्थितीत या भगिनींची अवस्था काय होत असेल?
 
 
 
या विचारांनी मीनाक्षी अस्वस्थ झाल्या. त्यांनी ठरवले की, हा आपला दुसरा जन्म आहे आणि हा जन्म या भगिनींसाठी समाजासाठीच आहे. मग त्यांनी ‘लोटस लिप इंटरटेन्मेंट’ नावाची संस्था काढली. प्रसिद्ध गायकांसोबत संगीत वाद्यवृंद आयोजित करणे, त्यातील मिळणार्‍या उत्पन्नातून नाममात्र रक्कम वाद्यवृंद खर्चासाठी आणि बाकीची समाजकार्यासाठी उपयोगात आणणे, असे त्यांचे कार्य सुरू झाले. विविध सामाजिक विषयांवर त्यांनी नाटकांचीही निर्मिती केली. संगीत आणि अभिनयक्षेत्रातील ओळख त्यांनी समाजकार्यासाठी उपयोगात आणली. काय योगायोग आहे, दि. ४ फेब्रुवारी हा ‘जागतिक कर्करोग दिन’ आणि ४ फेब्रुवारी हा मीनाक्षी यांचा जन्मदिनही. मीनाक्षी म्हणतात की, “जोपर्यंत श्वासात श्वास आहे समाजात आज गरजू आणि असाहाय्य परिस्थितीत सापडलेल्या दुर्दैवी जीवांना मदतीची गरज आहे. ती मदत आर्थिक सामाजिक, मानसिक आहेच. पण, त्यांना आधार देण्यासाठी कुणीतरी वेळही देणे गरजेचे आहे. वृद्धाश्रमातील ज्येष्ठांशी दोन घटका सुख-दुःखाच्या गोष्टी बोलणारेही अनमोल असतात. तो अनमोल वेळ मला द्यायचा आहे. संपर्क संवादातून सेवा करणे महत्त्वाचे.” असे म्हणतात की, ‘नर करणी करे, तो नारायण हो जाये.’ पण, मीनाक्षीसारख्या स्त्रीशक्तीला पाहून वाटते, ‘नारी तू नारायणी!’
 
 
 
Powered By Sangraha 9.0