वैशाखाच्या उन्हाने व ज्येष्ठातील उकाड्याने त्रस्त होत असताना आपण मराठी जन ज्या सोहळ्याची वाट पाहत असतो, तो सोहळा म्हणजे विठ्ठल-रखुमाईच्या नामाचे संकीर्तन करीत व ‘ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम’ यांचा गजर करीत वारकर्यांच्या जयघोषाने, वातावरणाने, आल्हादायक गारव्याने मन प्रफुल्लित करणारा वारीचा सोहळा. मात्र, हा सामूहिक नामघोषाचा आल्हाददायकपणा गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या बंधनांमुळे आपण कोणीही अनुभवू शकलो नाही, शेवटी विठूरायाची इच्छा!
भारतभूमी ही जशी कृषिप्रधान आहे, तशी तिची संस्कृती ही तत्त्वज्ञानयुक्त अशा भक्तिरसान्निध्याने ओथंबलेली आहे. अगदी नारद, भक्त प्रल्हाद, हनुमंत, आद्य शंकराचार्य, मध्वाचार्य, ज्ञानोबा तुकाराम, समर्थ रामदास स्वामी, जनाबाई, मुक्ताबाई, दासगणू महाराज यांच्यापर्यंत ती चालू आहे. पण, महाराष्ट्रीयन संतांच्या भक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे, ज्ञान व भक्तीचा अनोखा असा संगम. त्यांची भक्तीची व्याख्या म्हणजे ज्ञान, प्रेम व वैराग्य यांचा त्रिवेणी संगम होय. अशा या भक्तीचे स्वरूप ज्ञानोबा-तुकोबांनी मराठी मनाच्या अंत:करणात विठ्ठलभक्तीच्या माध्यमातून समाजमनावर खोलवर बिंबवले आहे. अशी विठ्ठलाच्या भक्तीची परंपरा ही अनादी काळापासून सुरू आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या भागातील अनेकांचे आराध्यदैवत म्हणजे भगवान पंढरीश. मुख्यतः भागवत धर्मीयांचे आराध्य दैवत म्हणजे परमात्मा पांडुरंग आहे. विशेषतः महाराष्ट्रीय संतांनी विठोबास हरिहर ऐक्याचे प्रतीक मानले आहे, तसेच ज्ञानोबा-तुकोबांच्या या संत मंडळींच्या या विठोबास गोपाल श्रीकृष्णाचे रूप मानले आहे. या गोपालाचे रूप गाईंच्या खुरांमुळे उडालेल्या धुळीचे कण अंगावर पसरल्यामुळे त्याची काया धुसर झाली असे म्हणून, तो पांडुरंग आहे. अशा पांडुरंगास आद्य शंकराचार्यांपासून, ज्ञानेश्वर महाराज, तुकोबा, रामदास स्वामी, दक्षिणेतील पुरंदरदास, चौंडरस, कनकदासांपासून ते आधुनिक महिपती दासगणू महाराजांपर्यंतच्या सर्व संतांनी आपल्या साहित्यातून आराध्य देवतेचे स्थान दिले आहे. या संप्रदायाचा उगम तसेच विठ्ठलभक्तीचा उगम याबाबत आधुनिक इतिहासाच्या मोजपट्टीवर सांगणे अवघड. कारण, त्यास श्रद्धेची जोड असणे आवश्यक आहे. पण, संत बहिणाबाई एका अभंगात स्पष्टपणे सांगतात-
ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया
नामा तयाचा किंकर। तेणे रचिले तें आवार
जनार्दन एकनाथ। खांब दिधला भागवत
तुका झालासे कळस। भजन करा सावकाश
वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेवांनी घातला, तर नामदेवांनी या संप्रदायाची व्याप्ती वाढवली आहे अन् नाथांनी यात अद्वैत तत्त्वज्ञानाचा भरभक्कम खांब दिला व तुकोबांनी वारकरी संप्रदायास कळसापर्यंत नेले, हे निर्विवाद आहे. मात्र, संप्रदायाच्या विठ्ठलभक्तीचा आरंभ हा मातृ-पितृभगवद्भक्त पुंडलिकाच्या मार्फत झाला आहे, हे म्हणणे साहाय्यभूत ठरले; या म्हणण्यास ‘स्कंद’ व ‘पद्मपुराणां’तर्गत कथेचा आधार मिळतो. तसेच या पंढरीचे पहिले वारकरी असलेले आद्य शंकराचार्य यांनी त्यांच्या वेदांतप्रचुर व भक्तिसुधारसाने माखलेल्या अशा ‘पांडुरंगाष्टका’चीही पुष्टी मिळते. या अष्टकात पुंडलिकाला वर देण्यास आलेल्या विठ्ठलाचा उल्लेख केला आहे. तसेच ही वारकरी परंपरेची व विठ्ठलभक्ती व वारी अनादी कालापासून आहे, हे आपल्या लक्षात येईल. अशा विठ्ठलभक्तीचे वर्णन विविध संतांनी आपल्या अभंग रचनेत व कवनात केले आहे ते पाहू-
माझे जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुडी॥१॥
पांडुरंगी मन रंगले। गोविंदाचे गुणी वेधले॥२॥
जागृती स्वप्न शुशुक्ती नाठवे। पाहता रूप आनंद साठवे॥३॥
बाप रखुमादेवीवारू सगुण निर्गुण। रूप विटेवरी दाविली॥
- संत ज्ञानेश्वर महाराज
चारी वेद जयासी गाती अखंड।
नेणवे प्रचंड कीर्ती ज्याची।
तोची भीमातरी उभा दिगंबर।
ठेवी कर भक्तांसाठी।
- संत नामदेव
वेढा वेढा रे पंढरी। मोर्चेवला भीमातीरी॥१॥
चला चला संतजन। करू देवासी भांडण॥२॥
लुटा लुटा पंढरपूर। धारा रखुमाईचा वर॥३॥
तुका म्हणे चला चला। घाव निशाणी घातका॥४॥
- संत तुकाराम महाराज
केशवाचे ध्यान धरूनि अंतरी। मृत्तिकेमाझारी नाचतसे
विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळ। नेत्री वाहे जळ सद्गदित
कुलालाचे वंशी जन्मले शरीर। तो गोरा कुंभार हरिभक्त
- संत गोराकुंभार
कांदा मुळा भाजी। अवघी विठाबाई माझी।
लसूण मिरची कोथिंबिरी। अवघा झाला माझा हरी॥
मोट नाडा विहीर दोरी। अवघी व्यापिली पंढरी।
सांवता म्हणे केला मळा। विठ्ठल पायी गोविला गळा॥
- संत सावतामाळी
देवा तुझा मी सोनार। तुझे नामाचा व्यवहार।
देह बागेसरी जाणे। अंतरात्मा नाम सोने॥
-संत नरहरी सोनार
आम्ही वारीक वारीक। करू हजामत बारीक।
विवेक दर्पण आयना दाऊ। वैराग्य चिमटा हालवू॥
उदक शांती डोई घोळू। अहंकाराची शेंडी पिळू।
भावार्थाच्या बगला झाडू। काम क्रोध नखे काढू।
चौवर्णा देऊनी हात। सेना राहिला निवांत॥
-संत सेना न्हावी
उभा कैवल्याचा गाभा। चंद्रभागेकाठी।
सावळे स्वरूप मूर्ती परम गोमटी॥
- संतकवी दासगणू महाराज
अशा विविध रचनेतून तसेच कीर्तन व भजनाच्या माध्यमातून विठ्ठलभक्तीचा प्रसार केला.
उत्तम चारित्र्य, धर्मनिष्ठा, भूतदया, सदाचार आणि नीती यांचाच वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मात अंतर्भाव आहे. वारकरी संप्रदाय हा मूलतः भक्तिपंथ आहे म्हणून त्याला आधारभूत असलेल्या तत्त्वज्ञानात पांडित्याचे अवडंबर नाही. भक्तिरसात न्हालेल्या संतांचा अनुभव, हेच त्या तत्त्वज्ञानाचे अंतिम प्रमाण होय. वारकरी पंथास जी अमाप लोकप्रधानता मिळाली, ती या तीन कारणांमुळे. विठ्ठलभक्ती, सदाचार, नीती यांवर आधारलेला सरळमार्गी आचारधर्म परखडपणे अमलात आणला व आजगायत तो निष्ठेने सुरू आहे. आपण सर्व जण भाग्यवान आहोत की, आपला जन्म हा संतांच्या भूमीत झाला. अशी ही विठ्ठलभक्तीची परंपरा. महाराष्ट्रातील प्रत्येक जण हा वारकरी आहे. मात्र, त्याने वरील पथ्ये पाळली पाहिजेत. तुकोबाराय म्हणतात-
जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी। त्याने पथ्ये पाळावी।
सर्वांना आषाढीच्या शुभेच्छा.
ही सत्यभामा-रुक्मिणी समवेत पांडुरंगास विनंती की, हे संकट लवकर निवारून आम्हा वारकर्यांना वारीची वाट मोकळी कर. लेखाचा शेवट व भावना संतकवि दासगणू महाराज यांच्या शब्दातून करतो-
मुखी राहो नाम ध्यानीं मनीं तुझी मूर्ती।
घडो कीर्तनसेवा देवा सदैव या हातीं॥
प्रतिवर्षाची वारी रामा पंढरीची होवो।
तुझिया समचरणांचा प्रेमा वाढत की जावो॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
संदर्भग्रंथ:
खरे, ग. ह. - श्रीविठ्ठल आणि पंढरपूर,
ढेरे, रा. चिं. -श्रीविठ्ठल : एक महासमन्व
दांडेकर, शं. वा. -वारकरी संप्रदायाचा इतिहास
डॉ. अभ्यंकर शंकर -वारकरी संतांचा भक्तियोग
डॉ. मुकुंद दातार -वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी
- योगेश नंदकुमार काटे