‘आप क्रोनोलॉजी समझिये...!’

19 Jul 2021 21:19:14
shah_1  H x W:



कथित हेरगिरी प्रकरणावर गृहमंत्री अमित शहांची प्रतिक्रिया
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : अनेकदा लोक या वाक्याला माझ्यासोबत हलक्या-फुलक्या अंदाजात जोडत असतात. मात्र, हेरगिरीचा कथित अहवाल आणि संसदेमध्ये गदारोळ यावरून आज मी अतिशय गंभीरतेने सांगतो की ‘आप क्रोनोलॉजी समझिये’, अशी प्रतिक्रिया देशाचे गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी सोमवारी दिली.
 
 
  
काही माध्यमसंस्थांनी रविवारी रात्री पेगॅसस या कंपनीने देशातील राजकीय, सामाजिक, प्रसारमाध्यमे आदी क्षेत्रातील व्यक्तींचे फोन टॅपिंग करून हेरगिरी केली असल्याचा कथित अहवाल प्रकाशित केला. त्यावरून विरोधकांनी गदारोळ सुरू केला आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्याविषयी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.
 
 
 
 
 
 
 
भारताच्या विकासात बाधा आणणाऱ्यांनी त्यांना मदत करणाऱ्यांसाठी एक अहवाल प्रकाशित केला आहे. काही विघटनवादी आंतरराष्ट्रीय संस्थांना भारताची वेगवान प्रगती सहन होत नाही. त्याचप्रमाणे देशाच्या विकासात अडथळा आणणारे काही राजकीय षडयंत्रकारी भारत आत्मनिर्भर होऊ नये, यासाठी प्रयत्न करीत असतात. त्यामुळे लोक अनेकदा या वाक्याला माझ्यासोबत अगदी हलक्याफुलक्या अंदाजात जोडत असतात. मात्र, हेरगिरीचा हा कथित अहवाल सार्वजनिक होणे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच संसदेत विरोधकांनी गदारोळ घातला. त्यामुळे आज मी अतिशय गंभीरपणे सांगतो की 'आप क्रोनोलॉजी समझिये'; आणि भारतीय जनता ही 'क्रोनोलॉजी' अगदी चांगल्या पद्धतीने जाणते, असे शहा यांनी म्हटले आहे.
 
 
 
लोकशाही चिरडण्याचा काँग्रेसला मोठा अनुभव
 
 
पंतप्रधान आपल्या मंत्रिमंडळातील दलित, महिला, शेतकरी, ओबीसी अशा समुदायातील नव्या मंत्र्यांचा परिचय करून देत असताना काँग्रेसने गोंधळ घातला. त्यामुळे काही देशविरोधी शक्तींना समाजातील दलित आणि महिलांना दिलेला सन्मान पचलेला नाही. काँग्रेसकडे लोकशाही चिरडण्याचा मोठा अनुभव आहे, त्यामुळे जनाधार आणि राजकीय उपयुक्तता गमाविलेल्या काँग्रेसने तसे करण्यात आश्चर्य काहीही नाही. त्यामुळेच सध्या अंतर्गत वादात अडकलेल्या काँग्रेसला संसदेमध्ये देशाच्या विकासाच्या प्रत्येक कार्यात अडथळा आणणे सुरू आहे, असाही टोला शहांनी लगाविला.
Powered By Sangraha 9.0