कुरार कारवाई : तरुणाला आई-बहीणीपुढे नग्न करुन मारहाण?

18 Jul 2021 15:45:52

Kurar _1  H x W





स्वतःची कातडी वाचवण्यासाठी पोलीसांकडून दिशाभूल : भातखळकर


मुंबई : कुरार मेट्रो स्थानकाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या बांधकामावर शनिवारी एमएमआरडीएकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत अनेक झोपड्या आणि राहत्या घरांवर हातोडा चालविण्यात आला. कारवाईला विरोध करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी त्याच्या आई आणि बहीणीपुढे नग्न करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा व्हीडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
 
 
पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत त्या तरुणाविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. तरुणाने स्वतःच कपडे काढल्याचा अजब दावा पोलीसांनी केला आहे. तर 'स्वतःची कातडी बचविण्याकरिता पोलीस असे खोटे-नाटे आरोप करतायेत.' अशी प्रतिक्रीया आ. अतुल भातखळकर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली आहे.
 
 
मालाडच्या कुरारगाव येथे एमएमआरडीएकडून कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी शनिवारी १७ जुलै रोजी काही झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. १६ जुलैला रात्री १२ वाजता या झोपडपट्टीवासियांना नोटीसा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच पोलिसांच्या लवाजम्यासह पाडकाम सुरू करण्यात आले. अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली. नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध केला.
 
 
याबद्दलची माहिती मिळताच आ. अतुल भातखळकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाईला विरोध केला. तर पोलीसांनी भातखळकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, भातखळकर आणि स्थानिकांनी एक व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये शेअर केला. ज्यात पोलीस व्हॅनमध्ये नग्न अवस्थेतील एक स्थानिक तरुण पोलिसांनी आपल्याला नग्न करून मारहाण केली आहे असे सांगत आहे. तसेच आपल्याला या व्हॅनमधून बाहेर काढावे असा आरडाओरड करत आहे. पोलीस दंडुकेशाहीचा निषेध करत अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र हा व्हिडीओ खोटा असल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे.
 
 
 
पोलिसांनी या तरुणाचे कपडे काढले नाही किंवा मारहाणही केली नाही. ते मुलं घरातून बाहेर निघत नव्हते. त्या तरुणाने घरात स्वतःच महिला पोलिसांसमोर कपडे काढले. त्याला कपडे घालून घ्यावे यासाठी पोलिसांनी त्याला वारंवार सांगितले मात्र त्याने ऐकलं नाही. म्हणून आम्ही त्याला ताब्यात घेतले. महिला पोलीस कॉन्स्टेबलसमोर असे वर्तन केल्यामुळे तसेच कारवाईत अडथळा निर्माण केल्यामुळे त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
 
-धरणेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दिंडोशी पोलीस स्थानक
 
 
 
 
व्हिडीओ खोटा आहे असे जर पोलिसांचं म्हणणं आहे तर त्यांनी कारवाई करावी. पण पोलीस घरात शिरले. पावसामध्ये उच्च न्यायालयाचे देश असताना, की पावसाळ्यात कोणतीही तोडकं कारवाई करण्यात येऊ नये. अशावेळी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई झाली, हा यातला मूळ मुद्दा आहे. त्याच्यावर त्यांनी बोलण्याची आवश्यकता आहे. सकाळी ७ वाजता तोडकं कारवाई कशी चालू करू शकतात? त्यामुळे पोलिसांनी स्वतःची कातडी बचावण्यासाठी पोलीस असे खोटे-नाटे आरोप करतायेत.
 
-अतुल भातखळकर, आमदार भाजप
 
 
 
मुंबईकरांच्या हक्कासाठी आमदार अतुल भातखळकर मैदानात उतरले, ठाकरे सरकारच्या आदेशाने गरिबांचे घर सकाळी सहा वाजता पाडायला घेतले होते. तिथल्या एका स्थानिक रहिवाशाला घरातून नग्नावस्थेत मारहाण केली. त्यावेळी त्याच्या घरी असलेल्या आई, बहीणींसमोर हा प्रकार घडला. त्याचे वडिल आणि १२ वर्षाच्या मुलालाही मारहाण केली होती.
 
- विनोद परब, स्थानिक
 
 
 
हा व्हिडीओ खोटा आहे. त्या मुलाने स्वतः कपडे काढले. महिला पोलीस कॉन्स्टेबल आहेत हे बघून त्या मुलाने कपडे काढले. पोलिसांनी त्या तरुणाचे कपडे काढले नाही. त्याला कपडे घालायला ही दिले मात्र त्याने ऐकले नाही. मग त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यामुलाला कोणतीही मारहाण झालेली नाही. 
 
- प्रकाश बेले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कुरार पोलीस स्थानक
 
 
Powered By Sangraha 9.0