ठाकरे सरकारमुळे संस्कृतीचे पतन

17 Jul 2021 20:22:37

warkari_1  H x
 
 
ठाणे : राज्यात मंत्र्यांचे सरकारी दौरे,सभा,मिरवणुका चालतात मात्र, सनदशीर मार्गाने दिंडी यात्रा काढणाऱ्याना अटकाव केला जातो. राज्य सरकारच्या या वर्तनामुळे संस्कृतीचे पतन सुरु असुन अत्यंत वाईट दिवस आले आहेत.असा आरोप कीर्तनकार ह.भ.प. एकनाथबुवा सदगीर यांनी केला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या पंढरपुर वारी संदर्भातील राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी ठाण्यात करण्यात आलेल्या आंदोलना दरम्यान एकनाथबुवा सदगीर यांच्यासह आठ जणांना नौपाडा पोलीसांनी अटक केल्याने ठाण्यात संत, वारकरी संप्रदायासह भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सरकारच्या दबावामुळेच पोलिसांनी ही कारवाई केल्याचे आंदोलक वारकऱ्यांनी म्हटले आहे.
 
 
 
पंढरपूर वारीसंदर्भात महाराष्ट्र सरकारने घातलेल्या निर्बंधाबाबत तसेच,संत बंडातात्या कराडकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ राज्यभरात प्रत्येक तालुक्यात निषेध वारी काढुन विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी विश्व हिंदु परिषद व बजरंग दलाच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील परमपूज्य वारकरी संत मंडळी,धार्मिक सघटनांच्या प्रतिनिधीनी तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आबेडकर त्याच्या पुतळ्यापर्यंत पायी दिंडी यात्रा काढुन निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र,जमावबंदीचा बाऊ करून नौपाडा पोलिसांनी सुरुवातीलाच ह.भ.प.एकनाथबुवा सदगीर व विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा मंत्री विश्वास सावंत, सहमंत्री विवेक कुलकर्णी,आशीष मांजरेकर, बजरंग दल संयोजक सुरेश तिवारी,सह संयोजक विजय पांडे,सेवाप्रमुख पवनकुमार आणि समरसता प्रमुख सचिन मालवीय आदींना अटक करून वारी रोखल्याने ठाण्यात तणाव निर्माण झाला.सरकारच्या दबावामुळे पोलिसांची कारवाई सुरु असल्याचा आरोप सदगीर बुवा यांनी केला.तसेच,राज्यात संस्कृती पतनाला जात असुन अत्यंत वाईट दिवस आल्याचे आंदोलक वारकऱ्यांनी सांगितले.यावेळी विहिंपचे कार्यालय मंत्री स्वप्नील मायदेव,बजरंग दलाचे विक्रम भोईर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0