अत्यंत साधेपणाने एखादी मांडणी करून, अचूकपणे आशयपूर्णतेकडे जाणे ही सामान्य बाब नव्हे. त्यासाठी कलाकारांच्या वैचारिकतेची उंची आणि चिंतनाची खोली किती ठाम आणि मजबूत असावी लागते, याचं बोलकं उदाहरण म्हणजे वैशाली पाटील यांच्या कलाकृती होय.
कलाक्षेत्रात कलाकाराला क्षितीज आणि आकाश हे दोन्ही नैसर्गिक प्रकार किंवा या दोन्ही नैसर्गिक संज्ञा, त्यांच्या व्यापक आशयाचा विचार करता ध्यानात येते की, त्या फार कमी पडतात. कलाकाराच्या प्रामाणिक कलासृजनापुढे क्षितिजाला गाठता येते, तर आकाशाला गवसणी घालता येते. हे कधी घडतं, तर प्रामाणिकपणे कलानिर्मिती करणार्या कलाकाराच्या प्रामाणिक कष्टातून... आज पुन्हा एकदा आठवण करायचं कारणही तसंच आहे. मला वाटतं, २०१५च्या दरम्यानची घटना असावी. मला अचानक तत्कालीन उपसंचालकांनी एक पत्र हातात दिलं. एका ‘सत्यशोधन समिती’चा मला अध्यक्ष केल्याचं पत्र. खरंतर ‘आदेश पत्रं’ होतं ते. त्या सूचनेनुसार मी आणि माझे दोन सदस्य, कलाकारांची पंढरी असलेल्या कोल्हापूरला नियोजित ठिकाणी पोहोचलो आणि मग पुढे बरंच काही...
त्यावेळी तीन कलाध्यापकांच्या तक्रारीनुसार सत्य जाणून घेण्यासाठी तत्कालीन संबंधितांनी मला खास बाब म्हणून नेमले होते. त्यातील एक महिला कलाध्यापक, ज्यांच्या वागण्या-बोलण्यातून त्यांची कलाविषयक तळमळ, त्यांचा कलानुभव आणि मुख्य म्हणजे त्यांचे पारदर्शी विचार हे, मीही एक याच जडणघडणीत तयार झालेला प्रथम कलाध्यापक आणि नंतर कलाप्रशासनिक संबंधित असल्यामुळे, माझ्या नजरेने हे टिपले.
प्रामाणिक कलाध्यापन केवळ प्रामाणिकपणे अभ्यास-मनन-चिंतन आणि सृजन करणारा कलाध्यापकच करू शकतो. या विधानावर कुणाही प्रामाणिक कलाध्यापकाची हरकत असेल, असे वाटत नाही. त्याच वर्षाची आठवण, त्या आठवणीतील कलाध्यापिका आणि महिला चित्रकार म्हणजे वैशाली पाटील...
कर्नाटकातील बेळगावजवळच्या शिनोली येथील ‘जे. एन. भंडारी स्कूल ऑफ आर्ट’ येथून कलाशिक्षक प्रशिक्षण अर्थात ‘एटीडी’चा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करुन त्यांनी महाराष्ट्राच्या सांगलीतील सुपरिचित कलाविश्व महाविद्यालयात ‘जी. डी. आर्ट (पेंटिंग)’ची पदविका यशस्वीपणे प्राप्त करुन, एक प्रकारे ‘कलाविश्वात’च प्रवेश केला. नंतर ‘डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन’ ही पदविका प्राप्त करण्यासाठी सुप्रसिद्ध असलेल्या विश्वविख्यात ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ येथे प्रवेश घेतला. त्यांनी ही पदविका यशस्वीपणे मिळविली. त्या काळात ‘जेजे’ परिसर म्हणजे बाराही महिने ‘कास’ पठार असायचा. अनेक कला विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या कल्पनाशक्ती अंकुरायच्या. ‘कलासृजनाचं कास पठार’ अशी त्यावेळी ‘जेजे’ परिसराची ओळख होती. हे उदाहरण एकदा ज्येष्ठ रंगकर्मी आणि ‘जेजे’च्या उपयोजित कलेचे माजी प्राध्यापक असलेले दामू केंकरे यांनी गप्पा करताना दिले होते. त्या वातावरणात कलेचे शिक्षण घेतलेल्या वैशाली पाटील यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क केला आणि त्यांचा कलाप्रवास जाणून घेतला.
सध्या त्या कोल्हापूर येथील ‘आर. एस. गोसावी कला निकेतन महाविद्यालया’त कलाध्यापिका म्हणून सेवेत आहेत. ‘कला शिक्षक’ या कलासेवामूल्य असणार्या कला विद्यार्थ्यांना घडविण्याचं कार्य त्या करत आहेत. संवेदनेबरोबरच नाजूक, कलाशिक्षणविषयक संस्कार घडविण्याचं कार्य, चित्रकर्ती वैशाली पाटील या ‘व्रत’ म्हणून पार पाडत आहेत.
त्यांच्या कलाकृतींचे विषयदेखील सामाजिक आणि सांस्कृतिकता जपणारे. त्यांच्या कलाकृतीतील विषयांची निवड, चित्रघटक, रंगांची निवड आणि रंगलेपनासह घटकांची, आकारांची मांडणी ही वैशिष्ट्यपूर्ण रचनांद्वारे आकर्षक बनलेली असते. बर्याचदा कलाकृती आकर्षक असतेही, परंतु ती आशयगर्भ असतेच असं होत नाही. मात्र, आशयगर्भ कलाकृती ही आकर्षक असतेच असते. वैशाली यांच्या कलाकृती या आकर्षक तर आहेच, परंतु त्या तितक्याच आशयगर्भदेखील आहेत. म्हणून त्या स्मृतिप्रवण ठरतात. आदर्श रुढी-परंपरा या सांस्कृतिक अंगांचा भावनात्मक स्पर्श त्यांच्या कलाकृतींद्वारे जाणवतो. नुकताच आषाढ महिना सुरु झाला आहे. ग्रामीण भागात ‘लक्ष्मीआई’ किंवा ‘जरीमरी माता’ या नावाने श्रद्धेय ग्रामदेवतांच्या प्रतीकात्मक गोष्टी, जसे देवीचा मुखवटा वा तांदळा, कवड्यांची माळ, सौभाग्य लेणं म्हणजे हळदी-कुंकू, तेल, धान्य, पीठ वगैरे साहित्याने भरलेली-विणलेली टोपली, बांगड्या आणि हिरव्या खणांनी युक्त अशा स्वरुपात घेतलेले साहित्य घेऊन देवीचे भक्त घरोघरी फिरताना दिसतात. समाजाची त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी आणि कलाकाराची दृष्टी फार मात्र भिन्न असते.
चित्रकर्ती वैशाली यांच्या नजरेतून हे निरीक्षण त्यांनी आशयगर्भ कलाकृतीत परावर्तित केले आहे. एका सुंदर विशुद्ध रंग योजनेत त्यांनी त्यांच्या आदरयुक्त भावनांना ‘कॅनव्हास’वर मोठ्या कृतज्ञतेने मांडलेले जाणवते. अशी एकेक कलाकृती रसग्रहणाद्वारे शब्दबद्ध करताना कदाचित ग्रंथनिर्मिती होईल इतक्या जाणिवांनी ओतप्रोत भरलेल्या त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतील चित्रविषय आहेत.
अत्यंत साधेपणाने एखादी मांडणी करून, अचूकपणे आशयपूर्णतेकडे जाणे ही सामान्य बाब नव्हे. त्यासाठी कलाकारांच्या वैचारिकतेची उंची आणि चिंतनाची खोली किती ठाम आणि मजबूत असावी लागते, याचं बोलकं उदाहरण म्हणजे वैशाली पाटील यांच्या कलाकृती होय. त्यांच्या रंगलेपनातील ताजेपणा, दोन विरोधी रंगसंगतीतील असलेले रंगही त्यांच्या ‘कॅनव्हास’वर खेळीमेळीने राहताना दिसतात. ही किमया आणि जगातील स्त्रीशक्तीचं महत्त्व विशद करण्याची कौशल्यपूर्ण हुकमत या वैशिष्ट्यांनी त्यांची प्रत्येक कलाकृती सजलेली आहे, ‘सजवलेली’ नाही!
त्यांना काही महिन्यांपूर्वी ‘सम्यक प्रतिष्ठान’चा ‘ऋणानुबंध पुरस्कार २०१८’ प्रदान करण्यात आला होता. रंगांबद्दल, आकारांबद्दल, कलाशिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांबद्दल आणि समस्त कला व सांस्कृतिकतेबद्दलचा ऋणानुबंध त्यांच्या कुंचल्यातून व्यक्त होतो, हे व्यक्त करणारा हा पुरस्कार म्हणजे ‘सम्यक प्रतिष्ठान’चाच सन्मान ठरावा... पुरस्काराच्या नावाला शोभेल, साजेल अशी प्रबोधनात्मक कार्य करणारी व्यक्तिमत्त्वे शोधायलादेखील तितकीच सकारात्मक मानसिकता लागते.
सृजनशील कलाकार हा संवेदनेतून सामाजिक वेदना मात्र सकारात्मकतेतून मांडत असतो. पुरूष कलाकारांच्या तुलनेत महिला चित्रकारांच्या कलाकृती या अधिक संवेदनशीलतेने व्यक्त होताना पाहायला मिळतात. मग अशा कलाकाराला मानसिक, सामाजिक नोकरीच्या ठिकाणी वा तत्सम क्षेत्रात कितीही त्रास, अडथळे, अडचणी आल्या तरी असे कलाकार विरोध वा अन्यायाविरोधात आवाज उठवणे, ही स्वाभाविक कृती जरी करत असला, तरी त्याची कृती ‘जीवंत’ असण्याचं लक्षण असते. अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अशा कृती नाईलाजाने का होईना परंतु व्यक्त होतात. आजारपण येतं आणि नंतर ते निघून जातं, तसं या अडथळ्यांकडे संवेदनशील कलाकार बघत असतात. ते गुरफटून वा अडकून बसत नाहीत. कारण, अशा कलाकारांचा रंगाकारांशी ऋणानुबंध असतो. सामाजिक बांधिलकीशी यांची नाळ जोडलेली असते आणि अशा प्रकारच्या कलाकारांच्या कलाकृतीदेखील एक सचित्र सामाजिक बिंब असतात, प्रतिबिंब असतात. प्रतिबिंब प्रतिबिंबच असते, सामाजिक बिंब हे प्रतिबिंब नसते, तर समाजाची एक मिनिचर आकृती असते. चित्रकर्ती वैशाली पाटील या सर्व वेदनांना सहन करून सन्मानाने तसेच ठामपणे उभा राहिलेला एक कलास्तंभ आहेत.
त्यांच्या साधेपणातील अभिव्यक्त होणं, हेच त्यांच्या कलाकृतीतूनही प्रतीत होताना दिसतं. आज सामाजिक संवेदना रूढी आणि परंपरेतील आदर्श सांस्कृतिकता जपणार्या कलावंतांची आवश्यकता आहे. वैशाली पाटील यांच्यासारख्या सृजनशील आणि सर्जनशील कलाकारांची तसेच अशा कलाकारांच्या कलासाधनेचा सन्मान राखण्याची गरज खरंतर सामाजिक गरज आहे. ‘गरज सरो अन्...’ अशी वेळ कलाध्यापकांवर येऊ नये. कारण, कलाध्यापकच भविष्यातील कलाकाराला पैलू पाडत असतो. तो एक सामाजिक वा सांस्कृतिक ‘आयकॉन’च असतो. त्यांच्याप्रति आदर आणि सन्मान ऋणानुबंध जपणं, ही काळाची गरज आहे. वैशाली पाटील या एक प्रातिनिधिक उदाहरण आहेत. त्यांच्यासारख्या महिला कलाकारांनी सांस्कृतिक प्रबोधनाचा रथ ओढण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे. त्यांच्या या कार्यास शुभेच्छा...!
- प्रा. गजानन शेपाळ