स्पर्धा परीक्षा प्रेरणेच्या टेकूवर!

    16-Jul-2021
Total Views |

exams_1  H x W:
 
स्वप्निल लोणकर या स्पर्धा परीक्षेच्या यशाच्या जवळ गेलेल्या विद्यार्थ्याने नुकतीच नैराश्यातून आत्महत्या केली आणि पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षांच्या व्यवस्थापनाबाबत, त्याच्या प्रशासनाबाबत राजकीय, सामाजिक अंगाने चर्चा सुरू झाली. कोणत्याही प्रश्नाबाबत मुळापासून निर्णय होण्यासाठी सामान्यांनी आत्मदहन, मोर्चे, आत्महत्याच करावी का, असा प्रश्न सध्या सामान्यांकडून विचारला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि परीक्षा हा मुद्दाच मुळात राज्याच्या अग्रक्रमावरून बाजूला गेला. परंतु, कोरोनाच्या पूर्वी परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या आणि अर्धवट राहिलेल्या प्रक्रियेमुळे जे विद्यार्थी नोकरीपासून दूर राहिले, ते या काळामध्ये निराशेच्या गर्तेमध्ये गेल्याचे दिसून आले. लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचे स्वप्न बघतात आणि स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी जीवाचे रान करतात. परंतु, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये नैराश्यामध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रेरणेवर टिकून राहायचे, याचे उत्तर त्यांना ना शिक्षण संस्था देताना दिसतात, ना राज्य सरकार देताना दिसते. स्पर्धा परीक्षा घेण्यात याव्यात यासाठी राज्यभरामध्ये मार्चच्या अखेरीस राज्यभरामध्ये आंदोलने करण्यात आली खरी; पण त्याचा संवेदनशील म्हणवून घेणार्‍या मुख्यमंत्र्यांवर कितपत परिणाम झाला, हा खरा प्रश्न आहे. स्पर्धा परीक्षांतून समाजसेवा करण्याची संधी मिळते, या प्रेरणेतून स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांना सध्या पूर्व, मुख्य परीक्षा चक्रव्यूह वाटू लागला आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करण्याआधी खासगी क्लासेस विद्यार्थ्यांना या क्षेत्राकडे आकृष्ट करताना ध्येय आणि प्रेरणेचा डोस पाजला गेल्याने विद्यार्थी या क्षेत्राला फक्त करिअरचा मार्ग म्हणून पाहताना दिसत आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये तग धरून राहण्यासाठी त्या-त्या क्षेत्राला आवश्यक संघर्ष करणे भाग असतानाच, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि त्या संघर्षाचा बाऊ केल्याने सामान्य देशसेवा, समाजसेवेचे एकमेव साधन म्हणून या क्षेत्राकडे पाहत आहे. खासगी क्लासेसना त्यांच्या व्यावसायिक वाढीच्या उद्देशाने त्यांनी दिलेली प्रेरणा हीच अंतिम मानून या क्षेत्रामध्ये आयुष्याची साधारण चार ते पाच वर्षे देताना उमेदीचा काळ प्रेरणेच्या टेकूवर जातो आहे की काय, असे चित्र सध्या समाजामध्ये निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची वाट निवडताना प्रेरणेचा टेकू घेऊन प्रवासाला सुरुवात करणार्‍या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचे मूळ समजून घेऊन याकडे वळणे गरजेचे आहे.
 
 

गुणवत्तेचे मूल्यमापन हवे!

 
 
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल यंदा ९९.९५ टक्के इतका लागला. राज्यातील प्रत्येक विभागाचा निकाल साधारण ९९ टक्क्यांच्या वर लागला असून, कोकण विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या वर्षी दहावीच्या परीक्षा न घेता त्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देत निकाल देण्यात आला. यावर्षी लागलेला निकाल हा सर्वाधिक असून, राज्याच्या निकालाची टक्केवारी वाढूनसुद्धा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे काय, हा प्रश्न मात्र कायम आहे. राज्य सरकारने यावर्षी परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय येत्या काळामध्ये विद्यार्थ्यांना अनेक आघाडीवर घातक ठरला, तर त्यामध्ये चुकीचे ठरणार नाही. कारण, दहावीसारख्या इयत्तेमधून विद्यार्थी करिअर निवड करतो, त्यातून पुढे जाताना त्याच्या ठिकाणी फक्त टक्केवारी नाही, तर गुणवत्ता असणे गरजेचे ठरणार आहे. कोरोनाने प्रत्येक क्षेत्राचे रूपडे बदलले आहे, तसे शिक्षणक्षेत्रामध्येही आमूलाग्र बदल झालेले दिसून येतात. आधुनिकतेची कास धरा, असे सांगू पाहणार्‍या शिक्षणसंस्था खर्‍या अर्थाने कोरोनाच्या परिस्थितीमध्ये नाइलाजाने आधुनिक झाल्या खर्‍या; पण त्यांनी नव्या पद्धतीला किती प्रमाणात आत्मसात केले, हा संशोधनाचा विषय आहे. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दिलेल्या गुणांवर शुक्रवारी लागलेल्या दहावीच्या निकालामुळे शिक्षणक्षेत्रामध्ये नव्या शिक्षणपद्धतीचा स्वीकार कोणत्या पद्धतीने, यापेक्षा गुणवत्ताधारित शिक्षणाकडे जाण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे, हे पाहणे गरजेचे आहे. गुणवत्ता आणि टक्केवारी यांच्यामध्ये गुणवत्तेच्या वाढीसाठी अंतर्गत मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांची अभ्यासक्रमातील गती न बघता, त्याच्या व्यवहारिक पातळीवरील ज्ञानाची परीक्षा घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, दहावीच्या पहिल्या टप्प्यातून विद्यार्थी पुढे जाताना त्याचा शैक्षणिक पाया कोणत्या आधारे भक्कम केला गेला, त्यावर त्याचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे टक्केवारीतून बाहेर येऊन गुणवत्तेचे मूल्यमापन कसे केले जाते, हे बघणे महत्त्वाचे आणि तेच खरे मूल्यमापन ठरणार आहे!
 
- स्वप्निल करळे