कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला ३० लाखांची मदत!

    दिनांक  16-Jul-2021 16:57:22
|

maha _1  H x W:पनवेल : कोविडच्या पहिल्या लाटेत घराबाहेर कफन बांधून पडण्याची नामुष्की ओढवली असतानाही जीव हातावर घेवून विद्युत पुरवठा सुरळीत ठेवताना मृत्यू ओढवलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने ३० लाख रुपये देण्याचे मान्य करून तसे परिपत्रक जारी केल्याची माहिती मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांनी कांतीलाल कडू यांना पाठविलेल्या पत्रातून दिली आहे.
 
 
 
पहिल्या टप्यात कोविडचा कहर माजला होता. वळणावळणावर मृत्यू टपून बसला होता. त्यामुळे घराबाहेर पडणे जिकरीचे झाले होते. डॉक्टर, वैद्यकीय यंत्रणा, पोलिस, स्वच्छता कर्मचारी आदी मोजक्या यंत्रणेसोबत महावितरणचे कर्मचारी, अधिकारी दिवसरात्र फ्रंट वॉरियर्स म्हणून राबत होते. त्यात काही कर्मचाऱ्यांचे कोविडमुळे निधन झाले आहे.
 
 
 
राज्य शासन विविध विभागांना हतबल न होता जमेल तशी मदत घोषित करीत होते. परंतु महावितरणला कुणी वाली उरले नव्हते. त्यांच्या व्यथांना आर्थिक मदतीचे गोंदण देण्यासाठी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी गेल्यावर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पत्र लिहून महावितरण कर्मचारी, अधिकारी अथवा बाह्यकेंद्र कर्मचारी यांच्यावर मृत्यू ओढावल्यास त्यांना 1 कोटीचे विमा कवच द्यावे, जेणेकरून त्यांच्या कुटुंबीयांना घर सावरणे सुलभ होईल अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने ऊर्जा खात्याने शहीद कर्मचारी, अधिकारी, बाह्यकेंद्र कर्मचारी यांच्यावर कोविडमुळे मृत्यू ओढावल्यास 30 लाखाचे कोविड सहाय्य देणार असल्याची घोषणा करून परिपत्रक जाहीर केले आहे.
 
 
ते पत्रक आणि माहिती एका पत्राद्वारे कांतीलाल कडू यांना महावितरणचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांनी दिले आहे. यामुळे पनवेल संघर्ष समितीच्या मागणीचा विचार राज्य शासनाने केला असल्याचे स्पष्ट होत आहे. ३० लाखाच्या अर्थ सहाय्यामुळे कोविडमध्ये शहीद झालेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.