प्रपंच व परमार्थ या दोहोंना घेऊन पुढे जाणारा आपला देश : डॉ. मोहनजी भागवत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2021
Total Views |

MOHANJI PHOTO 3 - 15 JULY


नाशिक : परमार्थाशिवाय प्रपंच हा उत्तमरीत्या होत नाही. प्रपंच व परमार्थ या दोहोंना एकत्रपणे पुढे घेऊन जाणारा आपला देश आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. ते गुरुवारी नक्षत्र लोन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या प.पु. स्वामी श्री सावितानंद अमृत महोत्सव सत्कार सोहळा व स्मरणिका प्रकाशन प्रसंगी बोलत होते.
 
 
याप्रसंगी करवीर पीठचे पीठाधीश्वर शंकराचार्य प.पु. जगदगुरु श्री विद्या नृसिंह भारती, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आश्रम तपोवन चे प.पु. माधवगीरीजी महाराज, प.पु. संतोषगीरीजी महाराज रा. स्व. संघ पश्चिम महाराष्ट्र चे प्रांत संघचालक नाना जाधव, रा. स्व. संघ विभाग संघचालक कैलासनाना साळुंके यांसह मान्यवर उपस्थित होते. मात्र, याप्रसंगी शंकराचार्य प.पु. जगदगुरु श्री विद्या नृसिंह भारती व प.पु. माधवगीरीजी महाराज प्रकृती अस्वस्थेमुळे कार्यक्रमास हजर राहू शकले नाहीत. मात्र त्यांच्या शुभेच्छा यावेळी प्रसारित करण्यात आल्या.
 
 
याप्रसंगी बोलताना डॉ. मोहनजी भागवत यांनी स्वामी सावितानंद व रा.स्व. संघ यांच्या ऋणानुबंध यावर प्रकाश टाकला. स्वामी सवितानंद व रा.स्व. संघ यांचे अहेतुक संबंध असून ते अत्यंत नैसर्गिकरित्या निर्माण झाले असल्याचे यावेळी सरसंघचालक यांनी सांगितले. प्रत्येक भौतिक कामात आपले आध्यात्म हे कायम व्यक्त होत असते. असे सांगताना सरसंघचालक म्हणाले की, आपली विचार करण्याची शक्ती ही कधीही एकतर्फी नव्हती. यावेळी जगभरातील भौतकीवादी व आध्यात्मिक विचारसरणी मधील भेद व मृत्यूनंतरचे जीवन याबाबत सरसंघचालक यांनी सोदाहरण मांडणी केली.
 
 
भारतात संत समुदायाने आध्यात्म व जीवन हे वेगळे नसल्याचे मांडले आहे. आध्यात्माची साथ सोडत भौतिक जीवन जगणे हे आनंदाची प्राप्त करून देणारे नक्कीच नसल्याचे यावेळी डॉ. मोहनजी भागवत म्हणाले. भारतातील प्रत्येक महापुरुषांनी त्या काळातील स्थळ काळ नुसार जीवन जगण्याची रीत मांडली आहे. अनेक आघात झाले तरी भारतात हिंदू धर्म यामुळेच कायम टिकून आणि मजबूत राहिला यामागे केवळ महापुरुषांची शिकवण व कार्य असल्याचे सरसंघचालक यावेळी म्हणाले.
 
 
अनेकांना अध्यात्मिक व प्रापंचिक कार्य दोन्ही करत पुढे जावे लागत आहे. नवीन पिढी ही प्रश्न विचारणारी आहे. त्यांना तर्क , पुरावे, प्रमाण देऊन आपले म्हणणे सांगावे लागते. हेच कार्य स्वामी सावितानंद करत असल्याचे सांगत सरसंघचालकांनी त्यांच्या कार्याप्रती गौरवोद्गार काढले. तर्कशुद्ध व अनुभूती आधारवर ज्ञान अत्यंत निस्पृह्तेने मांडण्याचे कार्य स्वामी सवितानंद करत असल्याचे डॉ. मोहनजी भागवत यावेळी म्हणाले.
 
 
रा.स्व. संघ स्वयंसेवकांना भारतीयता, देश,काल,परीस्थितीचे ज्ञान आहे. त्यामुळेच स्वामी सवितानंद व रा.स्व. संघ यांचे संबंध जोडले गेले असल्याचे यावेळी सरसंघचालकांनी नमूद केले. स्वामी सवितानंद हे आध्यात्मिक साधनेचे गुरु असण्याबरोबरच जीवन जगण्याच्या कलेचे देखील गुरु आहेत. अशा शब्दात डॉ. मोहनजी भागवत यांनी त्यांचा गौरव केला. स्वामी सवितानंद हे लोकसंग्रह करत असून सदमार्गावर अनेकांना चालणे कामी प्रेरित करत असल्याचे मोहनजी यावेळी म्हणाले.
 
 
सत्याची साधना हे परमलक्ष्य आहे. सत्याची प्राप्ती झाल्यानंतरच शाश्वत आनंद प्राप्ती होते. यासाठी आपण साधना करणे आवश्यक आहे. साधना उत्तम होणे कामी समाजाची भौतीक स्थिती उत्तम असणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकसंग्रह करणे व त्यांना त्यांचा मार्ग दाखविणे हे आवश्यक आहे. महात्मा हे कळवळ असणाऱ्या वृत्तीचे असतात, त्यांच्यात करुणा असते जे आपल्याला प्राप्त झाले ते इतरांना देखील प्राप्त व्हावे यासाठी कार्य करत असतात. असे महात्मा आपल्या सानिध्यात यावे यासाठी आपल्या अंगी तशी योग्यता बाळगणे आवश्यक असल्याचे सरसंघचालक यावेळी म्हणाले.
 
 
ही योग्यता आपण बाळगणे व ज्यांच्याशी आपला संपर्क येतो त्या सर्वांच्या अंगी बाळगली जावी या कामी कार्य होणे आवश्यक आहे. स्वामी सवितानंद यांनी जे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केले आहे. त्यांच्या जीवनाचे व वचनांचे सतत स्मरण ठेवणे हे आवश्यक असल्याचे सरसंघचालक यावेळी म्हणाले. पुढे जाण्यसाठी चालणे कधीही सोडू नये. आपले चालणे हेच इच्छितस्थळी पोहोचणे आहे. हे कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. स्वामी सवितानंद यांच्या अमृत महोत्सव प्रसंगी आपण जीवनसुधारणेचा संकल्प करणे आवश्यक असल्याचे सरसंघचालक यांनी यावेळी नमूद केले.
 
 
यावेळी बोलताना स्वामी सवितानंद म्हणाले की, माझा आजचा सन्मान हा ईश्वर माझ्या हातून करून घेत असलेल्या कार्याचा गौरव आहे. डॉ. मोहनजी भागवत यांना कोणताही मोह नाही. कसला ही मोह नसलेले ‘मोहनजी’ अशीच त्यांची ओळख आहे. जे काही प्राप्त करायचे आहे ते शरीराच्या माध्यमातूनच प्राप्त करावे लागणार आहे. शरीराच्या माध्यमातून केवळ कार्य होत असते. बाकी सर्व शक्ती , उर्जा हे परमेश्वर देत असतो. आपण सर्व केवळ साधने असून मुख्य स्त्रोत हा परमेश्वर असल्याचे स्वामी सवितानंद यावेळी म्हणाले.
 
 
आपली संस्कृती ही थोर असून दुर्दैवाने आपल्या संस्कृतीतील खऱ्या मर्माचा आपल्याला विसर पडलेला दिसतो. यावेळी स्वामी सवितानंद यांनी रामायण, महाभारत, सत्ययुग ते कलियुग मधील सामाजिक स्थिती यावर सोदाहरण मांडणी करत एकंदरीत सामाजिक स्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी ईश्वरी अवतार निर्माणाचे कारण हे साधूंचे ( सदप्रवृत्तीचे) रक्षण करणे हा आहे. ईश्वर प्रत्येक एका व्यक्तीसाठी जन्म घेण्यास तयार असतोच. ईश्वर आणि आपण यात कमीतकमी अंतर हवे असल्यास आपल्याला आपला जीवनमार्ग सरळ ठेवणे आवश्यक आहे.
हे प्रपंचात राहून करणे देखील शक्य आहे. हाच विचार रुजविण्याचे कार्य रा.स्व. संघाच्या माध्यमातून होत असल्याचे स्वामी सवितानंद यावेळी म्हणाले. दुसऱ्याच्या दुखाने ज्याला त्रास होतो तो खरा संत आहे. केरळात जेव्हा आपदा आली तेव्हा तेथे कोणत्या पंथाचे , धर्माचे लोक आहेत याचा विचार न करता केवळ रा.स्व. संघ मदतीला धावला. हे एक संतांचे लक्षण असल्याचे स्वामी सवितानंद म्हणाले.
 
भारतीय संस्कृतीची महत्ता सांगणे, वाढविणे, दुसऱ्याच्या दुखात सहभागी होणारा समाज घडविणे हेच कार्य रा.स्व. संघ करत असल्याचे स्वामी सवितानंद यावेळी म्हणाले. आपण समाजाचे, देशाचे देणे लागतो याच भावनेतून रा.स्व.संघ कार्य करत असल्याचे स्वामी सवितानंद यावेळी म्हणाले. यावेळी स्वामी सवितानंद यांनी श्रद्धा, भक्ती, मानवी स्वभाव यावर विविध पौराणिक दाखले देत मार्गदर्शनपर भाष्य केले.
@@AUTHORINFO_V1@@