रोल्स रॉयस खरेदी करणाऱ्या शिवसेनेच्या या नेत्याने केली ३५ हजारांची वीजचोरी

14 Jul 2021 16:02:52
shivsena_1  H x


कल्याण -
अलीकडेच आठ कोटी रुपयांची रोल्स रॉयस कार खरेदी करणाऱ्या कल्याणमधील शिवसेनेचे नेते आणि सुप्रसिद्ध उद्योजक संजय गायकवाड यांच्यावर सुमारे ३५ हजार रुपयांच्या वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण बिल भरले. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या (महावितरण) अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कल्याणमधील कोळसेवाडी पोलिस ठाण्यात संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात कल्याण पूर्व कोळसेवाडी येथील बांधकाम जागेवर गायकवाडने वीज चोरी केल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर गायकवाड यांनी तीन महिन्यांनंतरही दंडाच्या रक्कमेसह बिल भरले नाही. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज चोरीच्या आरोपाखाली ३० जून, २०२१ रोजी त्यांच्याविरूद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. महावितरणने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १२ जुलै रोजी गायकवाड यांनी ४९ हजार, ८४० रुपयेे चुकते केले आहेत. त्यापैकी ३४ हजार ८४० वीजेच्या चोरीसाठी आणि १५ हजार रुपये हे 'सेटलमेंट' म्हणून भरण्यात आले.
 
 
 
दरम्यान, महावितरणने त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप निराधार असल्याचा दावा गायकवाडांनी केला आहे. गायकवाड म्हणाले की, ते सरकारला कोट्यावधी रुपयांचा कर भरतात. त्याच्यावर घाईघाईने वीज चोरीसारखे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते म्हणाले की, वीजेची बिलही मी भरले आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी संजय गायकवाड यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0