राहुल गांधींच्या निकटवर्तीयास दिल्ली उच्च न्यायालयाचा दणका

14 Jul 2021 13:24:34

Saket Gokhle_1  
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचा निकटवर्तीय साकेत गोखले यास माजी राजनयिक लक्ष्मी पुरी यांची बदनामी करणारे ट्विट्स हटविण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवार, दि. १३ जुलै रोजी दिले आहेत. गोखले याने ट्विट्स न काढल्यास ट्विटरने ते काढावे, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत. साकेत गोखले हा समाजमाध्यमांवर खोटी माहिती प्रसारित करत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे.
 
 
आता न्यायालयानेच त्यावर शिक्कामोर्तब केल्याने गोखले यास मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा निकटवर्तीय आणि कथित माहिती अधिकार कार्यकर्ता साकेत गोखले याने संयुक्त राष्ट्रामधील भारताच्या माजी संयुक्त महासचिव लक्ष्मी पुरी यांची बदनामी करणारे ट्विट्स केले होते. त्यामध्ये पुरी यांनी काळा पैसा आणि अवैध संपत्ती जमविल्याचा आरोप केला होता. पुरी यांनी गोखलेविरोधात मानहानीचा खटला दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केला होता.
 
 
याप्रकरणी न्यायमूर्ती सी. हरी शंकर यांनी सुनावणी करताना साकेत गोखले यास तातडीने बदनामी करणारे ट्विट्स २४ तासांच्या आत काढण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे गोखले याने न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यास ट्विटरने ते ट्विट्स काढून टाकावेत, असेही न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे मानहानी खटल्याची सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत लक्ष्मी पुरी आणि त्यांचे पती, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याविरोधात कोणतेही खोटे आणि बदनामीकारक ट्विटस करू नयेत, अशी तंबीही गोखले यास दिली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0