शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत एसओपी बनवा : केशव उपाध्ये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

उपाध्ये _1  H x


महाराष्ट्रातील ८१.९ टक्के पालक मुलांना शाळेत पाठविण्याबाबत सकारात्मक


मुंबई:
शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग १५जुलैपासून सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व पालक, शिक्षक यांच्याकडून शाळा सुरु करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. त्यात ८१.९ टक्के पालक मुलांना शाळेत पाठविण्याबाबत सकारात्मक असल्याचे चित्र आहे. 'पण सरकारने शाळांच्या सॅनिटायझेशनबाबत, मुलांच्या सुक्षिततेबाबत, त्यांची योग्य काळजी घेण्याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून एसओपी तयार करावी,' अशी मागणी भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना केली आहे.
ते म्हणतात, "मागील दीड ते दोन वर्षांपासून शैक्षणिक विषय राज्य सरकारच्या चुकीच्या हाताळणीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जर सरकारने ही परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली असती तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान टाळता आले असते. या सर्वेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, पालकांना आपल्या मुलांच्या भवितव्याची काळजी असणे स्वाभाविकच आहे. पण सरकारने शाळांच्या सॅनिटायझेशनबाबत, मुलांच्या सुक्षिततेबाबत, त्यांची योग्य काळजी घेण्याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून एसओपी तयार करावी. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा," असेही ते म्हणतात.


दरम्यान, सदर सर्वेक्षण १२ जुलै रोजी रात्री ११.५५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले होते. राज्यातील सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी यांनी पालकांना सदर सर्वेक्षणात आपले मत नोंदविण्याचे आवाहन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आले होते. यात महाराष्ट्रातील ६ लाख ९० हजार ८२० पालकांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी ५ लाख ६० हजार पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. एकूण ६ लाख ९० हजार ८२० पालकांपैकी ३ लाख ५ हजार २४८ पालक ग्रामीण भागातील, ७१ हजार ९०४ पालक निमशहरी भागातील आणि ३ लाख १३ हजार ६६८ पालक शहरी भागात राहाणारे आहेत. या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या पालकांपैकी सर्वाधिक म्हणजे ७३ हजार ८३८ पालक हे पुण्यातील होते. तसेच मुंबई मनपा क्षेत्रातील ७० हजार ८४२ पालकांनी आपला प्रतिसाद यामध्ये नोंदवला. त्याप्रमाणे कोल्हापूरमधील ३० हजारहून अधिक, नाशिकमधील ४७ हजारांहून अधिक, साताऱ्यातील ४१ हजारांहून अधिक, ठाण्यातील ३९ हजारांहून अधिक पालकांनी यामध्ये सहभाग नोंदवला.


सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या पालकांपैकी २.८९ टक्के पालकांची मुलं ही नर्सरीमध्ये आहेत. तर पहिली ते पाचवीला पाल्य असणाऱ्या या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या पालकांची संख्या २३.४८ टक्के इतकी आहे. सहावी ते आठवीला पाल्य असणाऱ्या ३१.२१ टक्के पालकांनी या सर्वेक्षणात मत नोंदवले आहे. सर्वाधिक ४१.५४ टक्के पालक हे नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे होते. तसेच ११ वी आणि १२ वीला पाल्य असणाऱ्या पालकांची १५.२६ टक्के इतकी होती. या सर्वेक्षणामधील आकडेवारीवरुन पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भातील तयारी असल्याचे स्पष्ट आहे, त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे पालकांचे लक्ष आहे.
@@AUTHORINFO_V1@@