शिवसेनेतला माओवादी!

11 Jul 2021 22:12:47

news _1  H x W:

फादर स्टॅन स्वामींवर सरकारी रुग्णालयात उपचाराची परवानगी देण्यात आली होती. पण आपल्या मस्तवालपणापायी त्यांनी ते नाकारले आणि ‘होली फॅमिली’ रुग्णालयाची निवड केली व तिथेच त्यांचा मृत्यू झाला. मात्र, मोदीद्वेषाची विकृती डोक्यात भरलेल्या संजय राऊतांनी लबाडी करत त्याचा उल्लेखही केला नाही व त्याच्या मृत्यूला हत्या ठरवले. त्यावरून राऊतांना शिवसेनेतला शहरी माओवादी म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 
 
शहरी माओवाद प्रकरणातील एक आरोपी फादर स्टॅन स्वामींच्या मृत्यूवर विधवाविलाप करणार्‍यांत शिवसेना खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचाही समावेश असल्याचे नुकतेच समोर आले. शहरी माओवाद्याच्या निधनाने शोकसागरात बुडालेल्या राऊत यांनी त्यावर ‘रोखठोक’ भाष्य करत स्टॅन स्वामींच्या मृत्यूला केंद्र सरकारने केलेली हत्या ठरवले. फादर स्टॅन स्वामींच्या निधनावरुन विव्हळणार्‍या संजय राऊत यांनी आपल्या लेखातून त्यांचा पक्ष व आताच्या ठाकरे सरकारकडून सातत्याने पायदळी तुडवल्या जाणार्‍या अभिव्यक्तिस्वातंत्र्य किंवा माध्यम स्वातंत्र्याचीही बाजू लावून धरली. अर्थात, या सर्वांतून त्यांना केवळ आणि केवळ केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारलाच लक्ष्य करायचे होते.
 
 
पण राऊत यांनी लिहिलेल्या शब्दाशब्दांतून ते भाजपविरोध नव्हे, तर भाजपविरोधाच्या नावावर देशविरोधासाठी तसेच वनवासींच्या धर्मांतरासाठीही तयार असल्याचे उघड झाले. कारण आतापर्यंत संजय राऊत वा शिवसेना स्वतःला देशभक्त आणि हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेत असे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांशी आघाडी करुनही आपली देशभक्ती व हिंदुत्वनिष्ठा शाबूत असल्याचा दावाही राऊत आणि शिवसेना नेतृत्व करत होते.
 
 
पण आताच्या संजय राऊत यांच्या लेखावरुन त्यांची भक्ती व निष्ठा फक्त सत्तेच्या खुर्चीशी आणि ती खुर्ची मिळवून देणार्‍यांच्याच चरणी वाहिलेली असल्याचे स्पष्ट झाले. त्यातूनच त्यांनी आपल्या नव्या मालकीणबाई आणि नव्या मालकाची मर्जी राखण्यासाठी स्टॅन स्वामींच्या मृत्यूवरुन केंद्र सरकारला शिव्याशाप देत रडून दाखवले. तथापि, राऊत यांच्या टीकेमध्ये वस्तुस्थितीचा लवलेशही नव्हता, तर वातानुकूलित कक्षात बसूनही भाजपद्वेषापोटी केलेली ओकारीच दिसून येत होती. मात्र, त्याचा दुर्गंध फैलावून त्याने आणखी कोणाची बुद्धी नासवण्याआधी आपण सर्वांनीच फादर स्टॅन स्वामी व त्यांच्या मृत्यूमागचे सत्य आणि तथ्य समजून घेणे अगत्याचे ठरेल.
 
 
संजय राऊत यांनी आपल्या लेखातून स्टॅन स्वामींना अतिशय उदात्त कार्य करणारा नायक तर केंद्र सरकारला अन्याय-अत्याचार करणारा खलनायक ठरवण्याचा बदमाशपणा केला आहे. तसेच फादर स्टॅन स्वामींच्या म्हातारपणाचा वा वयाचा वारंवार उल्लेख करत त्यांना जनतेची सहानुभूती मिळेल, याचीही काळजी घेतली आहे. पण स्टॅन स्वामींविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या चार्जशीटमधील नोंदी पाहता ते आणि त्यांचे साथीदार देशाच्या सुरक्षेपुढील गंभीर धोका असल्याचेच स्पष्ट होते. त्यानुसार, स्टॅन स्वामींच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांपैकी बहुतांश कागदपत्रे भारत सरकारने बंदी घातलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) कारवाया व प्रचार-प्रसाराच्या तंत्राबाबतची होती.
 
 
तसेच सुरेंद्र गडलिंग यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांत कॉम्रेड सुधा यांनी कॉम्रेड प्रकाश यांना लिहिलेल्या पत्रांत फादर स्टॅन स्वामींच्या भूमिगत चळवळीतील कार्याची चर्चा झाल्याचे आढळले. स्टॅन स्वामींचा माओवाद्यांशी किती आणि कसा संबंध होता, हे दाखवून देणारी ही केवळ काही उदाहरणे. ‘एनआयए’ने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये फादर स्टॅन स्वामींच्या इतरही देशविघातक उद्योगांची इत्थंभूत माहिती देण्यात आली आहे. पण ‘एनआयए’चा तपास म्हणजे काय, ‘चार्जशीट’ म्हणजे काय आणि त्यावरील न्यायालयाची भूमिका काय, याचे कसलेही ज्ञान नसलेल्या राऊत यांनी स्टॅन स्वामींनाच पीडित ठरवले.
 
 
मात्र, फादर स्टॅन स्वामींच्या मृत्यूवरुन उरबडवेगिरी करण्याआधी संजय राऊतांनी त्यांना न्यायालयाने जामीन का दिला नाही, याचा अभ्यास केला असता तर बरे झाले असते. कारण, स्टॅन स्वामींविरोधात ‘एनआयए’ने सज्जड पुरावे सादर केले होते आणि ते न्यायालयालाही प्रथमदर्शनी मान्य होते, म्हणूनच त्यांना जामीन मिळत नव्हता. पण राऊतांनी आपली कणभर अक्कलही भाजपविरोधासाठी गमावली नि न्यायालयावरही अविश्वास दाखवत फादर स्टॅन स्वामींना महात्मा वगैरे ठरवण्यापर्यंत मजल मारली. त्यावरुन संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयीन अवमानाचाच गुन्हा नोंदवायला हवा, इतके त्यांचे विधान भयानक आहे.
 
 
स्टॅन स्वामी झारखंडमधल्या वनवासींच्या उत्थानासाठी कार्य करत होता. जीवनाच्या अंतिम समयी त्यांना झारखंड येथे जाऊन मित्रांसमवेत वेळ घालवायचा होता, असेही राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेना व खासदार संजय राऊत यांनी हिंदुत्वाला तिलांजली देत धर्मांतराची कड घेतल्याचा याहून निराळा दाखला तो काय असणार? कारण, झारखंडच्या वनवासी भागांत ख्रिश्चन मिशनर्‍यांनी घातलेल्या धुमाकुळाची वृत्ते कधी कधी माध्यमांतून येत असतात, तर बर्‍याचदा ती दाबली जातात. फादर स्टॅन स्वामीदेखील वनवासींमध्येच काम करत होते आणि वनवासींना धर्म निवडण्याचा अधिकार, स्वातंत्र्य असले पाहिजे, असे त्यांचे मत होते.
 
 
भारतीय संविधान व हजारो वर्षांच्या संस्कृतीनुसार वनवासी हिंदू धर्मीयच आहेत, पण तेच स्टॅन स्वामींना मान्य नव्हते. असा इसम वनवासींच्या उन्नतीसाठी काम करत असेल की धर्मांतरासाठी, याचे उत्तर सामान्य माणूसही देऊ शकेल. पण, राऊत यांना ते दिसत नसावे आणि म्हणूनच नरेंद्र मोदी, भाजपद्वेषासाठी ते हिंदुंच्या धर्मांतराला कारणीभूत ठरणार्‍या अनेकांपैकी एक असलेल्यांनाही पाठिंबा देताना दिसतात. त्यांच्या नैसर्गिक मृत्युला केंद्र सरकारने केलेली हत्या व मोदींसह इतरांना गुन्हेगार ठरवतात. मात्र, फादर स्टॅन स्वामींनी केलेल्या देशविघातक कृत्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. त्यांच्या वयाचा दाखला देत त्यांना साधा जामीनही मिळाला नाही, म्हणून अश्रू ढाळतात.
 
 
पण ८४ वर्षे वय असले म्हणजे स्टॅन स्वामीच काय कोणालाही देशविरोधी कारवायांचा परवाना मिळत नाही. वयाच्या आडून देश तोडण्याचे धंदे झाकून ठेवता येत नाही. तरी इतके होऊनही फादर स्टॅन स्वामींवर सरकारी रुग्णालयात उपचाराची परवानगी देण्यात आली होती. पण आपल्या मस्तवालपणापायी त्यांनी ते नाकारले आणि ‘होली फॅमिली’ रुग्णालयाची निवड केली व तिथेच त्यांचा मृत्यू झाला. मात्र, मोदीद्वेषाची विकृती डोक्यात भरलेल्या संजय राऊतांनी लबाडी करत त्याचा उल्लेखही केला नाही व त्यांच्या मृत्यूला हत्या ठरवले. त्यावरुन राऊतांना ‘शिवसेनेतला शहरी माओवादी’ म्हटल्यास वावगे ठरणार नाही, तसेच शिवसेनेची पुढची वाटचाल कोणत्या विचारांवर असेल, हेही यातून दिसते.
 
 
आता माओशाहीकडे वळण्याची सज्जता केलेल्या संजय राऊत आणि शिवसेनेने केवळ एका लेखावरच थांबू नये, तर स्टॅन स्वामी गेल्याचे फारच दुःख होत असेल तर त्यांनी शिवसेना भवनात दुखवटा पाळायला हवा, तसेच चौकाचौकात श्रद्धांजली वाहणारे फलक लावायला हवेत. या सगळ्यातून फादर स्टॅन स्वामी माओवादाचे व धर्मांतराचे किंवा फादर फ्रान्सिस दिब्रिटोंसारखे लोक स्टॅन स्वामींच्या समर्थनाचे नि धर्मांतराचे धंदे करत आहेत नि त्यात शिवसेनाही सामील झाल्याचे सर्वांसमोर येईल. अर्थात, याबाबत आमचे काही म्हणणे नाही, पण तपास यंत्रणा काय म्हणतात, हे तरी राऊत आणि शिवसेनेने पाहायला हवे होते. कारण तर्क-कुतर्क, वाद-विवाद यापलीकडेही देव, देश आणि धर्म आहे.
Powered By Sangraha 9.0