गंगा-जमुनी तहजीबचा बुरखा फाटला

01 Jul 2021 22:08:54

cases_1  H x W:
 
 
 
देशात अनेक ठिकाणी उत्तर प्रदेशात नुकत्याच उघड झालेल्या धर्मांतराच्या पद्धतीने धर्मांतराची रॅकेट्स चालविली जात आहे, त्यावर वेळीच कारवाई न केल्यास त्याचा राष्ट्रीय सुरक्षेला सर्वांत मोठा धोका निर्माण होणार आहे. तो धोका आज लगेच समोर येणार नाही. मात्र, आणखी पाच ते सात वर्षांनी लोकसंख्येचे बदललेले गणित हे राष्ट्रीय सुरक्षेसह हिंदूंच्या गळ्याशी येईल.
 
 
 
गेल्या दोन आठवड्यांमध्ये गेली ७० वर्षे देशातील बहुसंख्य हिंदूंवर लादण्यात आलेल्या गंगा-जमुनी तहजीबचा बुरखा फाडणार्‍या दोन घटना घडल्या. मात्र, त्याविषयी देशातील पुरोगामी, लिबरल आणि फॅसिस्टवादाचा कथितरीत्या विरोध करणार्‍या मंडळींनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणे टाळले आहे. त्या दोन घटनांवर ना चॅनल चर्चा झाल्या, ना वृत्तपत्रांमध्ये भरभरून लिखाण झाले, ना कोण्या सिनेमाची गाणी लिहिणार्‍याने निषेध केला, ना कोणाला देशात अघोषित आणीबाणी आल्याचे वाटले, ना कोणा नट-नटीला ‘नॉट माय रिलीजन’चे पोस्टर हाती घेऊन फोटोशूट करावेसे वाटले. एकूणच प्रस्थापित मंडळींनी या दोन घटना जास्तीत जास्त दाबून कशा ठेवता येतील, याचीच काळजी घेतली. कारण ही प्रकरणे या मंडळींसाठी आणि त्यांच्या विचारसरणीसाठी त्रासदायक होती. त्याविरोधात बोलल्यास आपले गंगा-जमुनी तहजीबचे दुकान बंद पडण्याची भीती या मंडळींना होती. त्यामुळे एरवी न झालेल्या ‘मॉब लिंचिंग’विषयी भरभरून बोलणारे, ‘फॅक्ट चेक’ करणारे लोक अगदी शांत होते. मात्र, त्यांच्या शांत राहण्यामुळे फायदाच झाला आहे. कारण ही मंडळी शांत राहिली तरीही या घटना देशभरात पोहोचल्याच आणि देशातील नागरिकांनी त्याची योग्य ती दखलही घेतली.
 
 
 
पहिली घटना घडली ती उत्तर प्रदेशात. उत्तर प्रदेश ‘एटीएस’ने अन्य धर्मीय प्रामुख्याने हिंदूंना जबरदस्ती आणि फसवणुकीने मुस्लीम करणारी एक टोळी पकडली. गेल्या दोन वर्षांत या टोळीच्या सदस्यांनी तबब्ल एक हजार हिंदूंना फसवणुकीने आणि जबरदस्तीने मुस्लीम बनविले होते. या टोळीची कार्यशैली अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होती. या टोळीने मूकबधीर हिंदू विद्यार्थ्यांना आपले लक्ष्य बनविले. त्यासाठी टोळीच्या सदस्यांनी मूकबधिरांसाठीची असलेली विशेष भाषा-‘साईन लॅग्वेज’ही शिकली होती. उत्तर प्रदेशातील नोएडा येथील सेक्टर ११७मध्ये ‘नोएडा डेफ सोसायटी’ हे कर्णबधिरांसाठीचे निवासी विद्यालय आहे. येथील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून या टोळीने त्यांना मुस्लीम करून घेतले आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांचे माता-पिता व अन्य कुटुंबीयांना त्यांच्या मुलांचे धर्मपरिवर्तन झाल्याचे सांगितले जात नाही. दिव्यांगांच्या हतबलतेचा फायदा घेऊन ही टोळी आपल्या मुस्लीम धर्मांतराचे ध्येय साध्य करीत असल्याचे तपासात समोर आले आहे. या टोळीचा एक म्होरक्या मोहंमद उमर गौतम हा मूळचा हिंदू. मात्र, त्याने प्रथम मुस्लीम धर्म स्वीकारला आणि त्यानंतर अन्य हिंदूंना मुस्लीम करण्यासाठी त्याने काम सुरू केले. उत्तर प्रदेशातील चार जिल्ह्यांसह देशभरात या टोळीचे काम पसरलेले होते. उत्तर प्रदेश ‘एटीएस’ने आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, त्यामध्ये धर्मांतरे घडविण्यासाठी या टोळीला हवालामार्गे कोट्यवधी रुपये पोहोचविले जात होते. या टोळीला पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ मदत करीत असल्याचेही प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
 
 
 
हीच घटना बिगरभाजप पक्षाचे सरकार असलेल्या राज्यात घडली असती, तर ती पुढे आलीच नसती. मात्र, उत्तर प्रदेशचे नेतृत्व योगी आदित्यनाथ करीत असल्याने ही घटना पुढे आली. आता अनेक लोक याचा संबंध पुढील वर्षी होणार्‍या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीशी जोडण्याचा प्रयत्न करतील. भाजप निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक ध्रुवीकरण करीत असल्याचाही आरोप करतील. मात्र, त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य कमी होत नाही. देशात अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने धर्मांतराची रॅकेट्स चालविली जात आहे, त्यावर वेळीच कारवाई न केल्यास त्याचा राष्ट्रीय सुरक्षेला सर्वांत मोठा धोका निर्माण होणार आहे. तो धोका आज लगेच समोर येणार नाही. मात्र, आणखी पाच ते सात वर्षांनी लोकसंख्येचे बदललेले गणित हे राष्ट्रीय सुरक्षेसह हिंदूंच्या गळ्याशी येईल.
 
 

‘लव्ह जिहाद’विरोधात शीख समुदायाची आक्रमकता

 
 
‘लव्ह जिहाद’ अशी कोणतीही संकल्पना अस्तित्वात नाही, प्रेमाला धर्माचे बंधन नसते, अशी डायलॉगबाजी करणारा एक वर्ग देशात अस्तित्वात आहे. अर्थात, प्रेमाला धर्माचे बंधन नसते यात तथ्यही आहे. कारण, कोणालाही कोणासोबतही प्रेम होऊ शकते, तो पूर्णपणे वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, खोटे नाव धारण करणे, त्यानंतर मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविणे, लग्न करणे आणि नंतर मुस्लीम धर्म स्वीकारण्यास भाग पाडणे, या प्रकाराचे समर्थन प्रेमाला धर्माचे बंधन नसते, या डायलॉगने करता येणार नाही. देशातील हिंदुत्ववादी संघटना अनेक वर्षांपासून ‘लव्ह जिहाद’चा धोका समाजासमोर मांडत आहेत. मात्र, त्यावरून हिंदुत्वाला बदनाम करण्याचेच प्रकार घडले. ‘लव्ह जिहाद’चा धोका केवळ हिंदू समाजालाच नाही, त्याविरोधात केरळमधील ख्रिश्चन समुदायानेही ओरड केली आहेच. मात्र, गंगा-जमुनी तहजीबचे पोस्टर लावून दुकान चालविणार्‍यांना त्याचे भान नाही.
 
 
काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात आणि श्रीनगरमधील मजहूर नगर परिसरातील दोन शीख तरुणींना जबरदस्ती मुस्लीम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले आहे. बडगाममधील १८ वर्षीय युवतीस फूस लावून तिचे धर्मांतर करण्यात आले. तर मजहूर नगर परिसरातील २२ वर्षीय युवती आपल्या मुस्लीम मित्राच्या लग्नास गेली असता तेथून बेपत्ता झाली. तिचेही धर्मांतर केले असल्याचे नंतर समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे १८ वर्षीय युवतीचा विवाह ४० वर्षांच्या मुस्लीम पुरुषासोबत लावण्यात आला होता. त्या पुरुषाचे यापूर्वीच एक लग्न झाले आहे. युवतीच्या माता-पित्यांनी विरोध केला असता, मुलीस तिच्या कुटुंबाकडे सोपविण्यात आले आहे. तर २२ वर्षीय युवतीने आपण आपल्या मर्जीने लग्न केले असल्याचे न्यायालयास सांगितले आहे.
 
 
काश्मीरमध्ये दोन शीख तरुणींसोबत घडलेली ‘लव्ह जिहाद’ची घटना आणि त्याविरोधात शीख समुदायाने दाखविलेली आक्रमकता ही अतिशय कौतुकास्पद आहे. त्याचे पडसाद केवळ काश्मीर आणि पंजाबमध्येच नव्हे, तर देशाची राजधानी दिल्लीसह देशभरात विविध ठिकाणी उमटले आहेत. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’ ही संकल्पना हिंदूंनी जाणीवपूर्वक तयार केली आहे, या पुरोगामी मंडळींच्या दाव्यातील हवा आता निघाली आहे.
 
 
त्यामुळे आता राष्ट्रीय पातळीवर धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’विरोधी कठोर कायदा होण्याची गरज निर्माण झाली आहे. देशात सध्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांनी तशी पावले टाकली आहेत. शीख समुदायानेही केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेऊन जम्मू-काश्मीरमध्येही ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. या कायद्यामुळे असंख्य हिंदू, शीख, ख्रिश्चन आणि बिगरमुस्लीम धर्मीय मुलींचे आयुष्य बरबाद होण्यापासून वाचणार आहे. त्याचप्रमाणे धर्मांतरविरोधी कायद्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला निर्माण होणार्‍या धोक्याचाही बिमोड करता येणे शक्य होणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0