पुणे : शहरालगतच्या २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने अखेर बुधवार, दि. ३० जून रोजी मंजुरी दिली. या २३ गावांच्या समावेशामुळे महापालिकेची हद्द ५१६ चौरस किलोमीटर झाली असून पुणे महापालिका ही राज्यातील सर्वात मोठी महापालिका ठरली आहे.
म्हाळुंगे, सूस, बावधन (बुद्रुक), किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी (बु.), नर्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, वाघोली या गावांचा समावेश आता पुणे महापालिकेत करण्यात आला आहे.
हवेली तालुका नागरी कृती समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून शहरालगतची ३४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ही गावे समाविष्ट करण्याचा निर्णय दिल्यानंतर राज्य सरकारने २०१७ साली ३४ पैकी ११ गावांचा समावेश केला. उर्वरित २३ गावांचा टप्प्याटप्प्याने समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. अखेर राज्य सरकारने याला मंजुरी दिली.