समर्थांना अभिप्रेत ‘चळवळ’ आणि आधुनिक काळातील पुढार्यांनी उभ्या केलेल्या चळवळी यांच्या मूळ स्वरुपात अंतर आहे. अन्यायाविरुद्ध किंवा अपेक्षापूर्तीसाठी चळवळ उभी केली जाते, तेव्हा रजोगुणाचा त्यावर प्रादुर्भाव असतो. त्या चळवळीला जर सत्त्वगुणांची जोड मिळाली, तर तिचे रूप पालटते.
संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास किंबहुना सर्वच प्राचीन संतांच्या काळी पदव्या देणारी विद्यापीठे नव्हती. सर्व संतांचे वाड्.मयीन कर्तृत्व इतके महान आहे की, त्यांच्यासाठी वेगळ्या पदव्या निर्माण कराव्या लागल्या असत्या. पण, जनसामान्यांनी आपल्या अंत:करण विद्यापीठात त्यांना ‘संत’ ही पदवी दिली आहे. लोकांनी त्यांना भगवंताचे अवतार मानले आहे. याहून मोठा सन्मान काय असणार? ‘ज्याने आकळिला भगवंत तो संत’ असे संतांचे लक्षण रामदास स्वामींनी सांगितले आहे. पदवीबद्दल बोलावयाचे तर रामदासांना ‘समर्थ’ ही पदवी जनताजनार्दनाने सन्मानपूर्वक बहाल केलेली आहे. स्वामींनी केलेल्या बहुमोल कार्याच्या ऋणांतून उत्तराई होण्यासाठी स्वामींना ‘समर्थ’ पदवी दिली आहे. लोकांच्या सुखदुःखाची सूत्रे आपल्या हाती घेऊन विवेकपूर्व सामर्थ्याने विविध संघटना उभारून जो लोकांना कार्यप्रवृत्त करतो, त्याला ‘समर्थ’ पदवी मिळते, असे शंकरराव देव यांनी दासबोधातील एका ओवीच्या आधारे दाखवून दिले आहे. स्वामींच्या जीवनकार्याचा आढावा घेऊन ते ‘समर्थ’ पदवीला कसे योग्य आहेत, यावर मागील लेखात सविस्तर चर्चा केलीच आहे.
रामदास स्वामींनी नियोजिलेल्या कठीण कार्यासाठी सज्जनांच्या संघटना तयार केल्या. भक्तमंडळींना एकत्र आणले. संतमंडळींचा शोध घेतला. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही स्वामींनी या ‘मंडळ्या’ मेळवल्या, त्यांना एकत्र आणले आणि कार्याचे दिग्दर्शन केले. जनहितार्थ एखादी चळवळ उभी करायची तर संतसज्जन, भक्त या मंडळींची अनुकूलता महत्त्वाची. त्यांचे संघटन अगत्याचे असे समर्थांना वाटत होते. चळवळीचे सामर्थ्य रामदास स्वामींनी ३५० वर्षांपूर्वीच ओळखले होते. स्वामींना संघटन चातुर्याची कला अवगत होती. त्याचा उपयोग चळवळीसाठी होतो, हे समर्थ जाणत होते. तथापि, त्याच्याही पुढे जाऊन चळवळीला भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, ही अट समर्थांनी महत्त्वाची मानली आहे.
सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचे॥
परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे॥ (दा. २०.४.२६)
चळवळीला भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, याचा अर्थ चळवळही कोणत्याही स्वार्थ हेतूने उभारलेली नसून ती जनहितासाठी लोकांच्या दुःखाचा निरास करून त्यांना सुख-समाधान लाभणे यासाठी आहे. चळवळीचा उद्देश विधायक स्वरूपाचा आहे, हे समजण्यासाठी भगवंताचे अधिष्ठान समर्थांचा काळ आणि आजची परिस्थिती यात फार मोठा फरक आहे. याची जाणीव ठेवून समर्थांचे शब्द समजून घ्यावे लागतात, तरच त्यांच्या शब्दांचे मूल्यमापन करता येते. आजच्या कल्पना त्यांच्या काळावर लादून चालत नाही. समर्थांनी दासबोधात ‘राजकारण’ हा शब्दप्रयोग बर्याच ठिकाणी केलेला आहे. समर्थ म्हणतात, ‘मुख्य हरिकथा निरूपण। दुसरे ते राजकारण॥’ म्हणजे हरिभक्तीला मुख्य स्थान आहे, पण त्या पाठोपाठ राजकारणही तितकेच महत्त्वाचे आहे. तथापि, समर्थकालीन राजकारण आणि आजकालचे राजकारण यात महदंतर आहे, हे आपण सर्वजण जाणता. तसाच प्रकार ‘चळवळ’ या शब्दप्रयोगाविषयी आहे. समर्थांना अभिप्रेत ‘चळवळ’ आणि आधुनिक काळातील पुढार्यांनी उभ्या केलेल्या चळवळी यांच्या मूळ स्वरुपात अंतर आहे. अन्यायाविरुद्ध किंवा अपेक्षापूर्तीसाठी चळवळ उभी केली जाते, तेव्हा रजोगुणाचा त्यावर प्रादुर्भाव असतो. त्या चळवळीला जर सत्त्वगुणांची जोड मिळाली, तर तिचे रूप पालटते. सत्त्वगुणांची साथ म्हणजे चळवळीला लाभलेले भगवंताचे अधिष्ठान. तसं पाहिलं तर सध्याच्या काळात चळवळ उभी करणे तितके कठीण नाही. त्यासाठी अनुयायी मिळतात, पण ती चळवळ कार्यान्वित झाल्यावर सर्व सूत्रे नेत्यांच्या किंवा पुढार्याच्या हातात असणे महत्त्वाचे असते. नेत्याच्या ठिकाणी ढिलेपणा असेल, तर त्याचा गैरफायदा घेऊन चळवळ बहकण्याची शक्यता असते. तसे झाले तर चळवळीसाठी जमा झालेल्या समुदायावर पुढार्यांचा ताबा राहत नाही. चळवळीचे विधायक स्वरुप पालटून ते विनाशक बनते. त्यात तमोगुणाचा शिरकाव झाल्यावर कोणी कोणाचे ऐकत नाही. प्रसंगी मोडतोड, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान पाहायला मिळते. चळवळकर्त्यांच्या वाट्याला काय येते, तर द्वेष, मत्सर, निंदा, नालस्ती. चळवळीच्या मूळ हेतूंचा सार्यांना विसर पडतो. विचारी पुढार्यांच्या हातून चळवळ निसटली, तर ती मूर्खांच्या हाती सापडते. मग तेथे अभूतपूर्व गोंधळाला सुरुवात होते. मूर्खांना असा गोंधळ हवा असतो. अशावेळी शहाण्या नेत्याने वेळीच त्यात हस्तक्षेप केला पाहिजे. तसे झाल्यास चळवळ मूळ मार्गावर आणता येईल. प्रसंगी त्यासाठी शहाण्या नेत्याने स्वत: कष्ट सहन करुन लोकांनाही कष्ट सहन करायला लावले पाहिजे. मूर्खांच्या मूर्खपणाला आवर घालून सर्व सूत्रे आपल्या हाती घ्यावी. आपण कार्य करायला लागून लोकांकडूनही कार्य करून घ्यावे. गोंधळाच्या प्रसंगाने गडबडून न जाता, शहाण्यांनी प्रसंगावधान दाखवून स्थिती सांभाळली पाहिजे. स्वामी सांगतात-
मग ते शहाणे नीट करिती। स्वयें साहोन साहविती।
स्वयें करुन करविती। लोकांकरवी॥ (१८.१०.४२)
नेहमी हे लक्षात ठेवावे की, जगात नाना प्रकारची माणसे असतात. सज्जन त्यात थोडे असले तरी त्या सज्जनांकडूनच लोकांना समाधान मिळत असते. समुदायात अशा ज्ञानी पुरुषांचा विवेक सामर्थ्यसंपन्न असतो. त्यामुळे हा ज्ञानी पुरुष कशा प्रकारे कार्य करतो, हे लोकांना समजत नाही. त्याच्या कार्यपद्धतीचे लोकांना आकलन होत नाही.
ऐसा तो जाणता लोक। समर्थ तयाचा विवेक।
त्याचें करणें काही येक। जनास कळेना॥ (१८.१०.४५)
अशा विवेकसंपन्न ज्ञानी पुरुषाने उभारलेली ही चळवळ भगवंताचे अधिष्ठान असल्याने सर्वांच्या हिताची, लोकांना समाधान मिळवून देणारी असते. विवेकी पुरुषाने याबाबत असे वागावे की, चळवळीचा हेतू साध्य होऊ लागल्यावर ज्ञानी पुरुषाकडे त्याची सूत्रे सोपवून पुढार्याने कोणत्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवता एकांतात निघून जावे, हे खर्या नेत्याचे समर्थलक्षण आहे. समर्थांनी थोडक्यात सांगितले आहे की,
जितुकें काही उत्तम गुण। तें समर्थांचे लक्षण॥
चळवळ यशस्वी होण्यासाठी अशा समर्थ लक्षणांनी युक्त पुरुषाची गरज असते. चळवळीच्या ठिकाणी सामर्थ्य आहे हे खरे, पण तेथे भगवंताचे अधिष्ठान असल्याशिवाय लोकांना सुखी करता येत नाही.
- सुरेश जाखडी