आफ्रिकेतील गांधींचा कारनामा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jun-2021   
Total Views |

Mahatma Gandhi_1 &nb
 
 
 
बरेचदा देशातील नावाजलेल्या मोठ्या प्रतिष्ठित घराण्यांमधील पुढच्या पिढीला मात्र आपल्या पूर्वजांच्या पुण्याईचा विसर पडलेला दिसतो. कारण, त्यांच्या गैरवर्तणुकीने केवळ त्यांचेच नाव धुळीस मिळते असे नाही, तर त्यांच्या पूर्वजांच्या नावालाही एकप्रकारे काळिमा फासला जातो. असाच काहीसा प्रकार नुकताच घडला तो महात्मा गांधी यांच्या पणती आशिष लता रामगोबिन यांच्याबाबतीत. त्यांनी दक्षिण आफ्रिकेतच केलेल्या एका बेकायदेशीर कृत्यामुळे केवळ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याच प्रतिमेला धक्का पोहोचलेला नसून, एकूणच भारताची प्रतिमाही मलीन झाली आहे. आशिष लता या इला गांधींच्या कन्या. मानवाधिकार कार्यकर्ता इला गांधी या महात्मा गांधींचे पुत्र मणिलाल गांधी यांच्या कन्या. अशा या महात्मा गांधींच्या ५६ वर्षीय पणती आशिष लता रामगोबिन यांनी तब्बल ६० लाख रँड म्हणजेच तब्बल ३.२२ कोटी रुपयांसाठी लुबाडल्याप्रकरणी त्यांना डरबनच्या एका न्यायालयाने आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे, न्यायालयाने त्यांना वरच्या न्यायालयात अपील करण्याची अनुमती दिली नसल्याने त्यांना कारागृहातच दिवस काढावे लागणार आहेत. हे प्रकरण आताचे नसून मुळात २०१५चे आहे. लता यांची न्यू आफ्रिकेतील ‘अलायन्स फुटविअर डिस्ट्रिब्युटर्स’चे संचालक एसआर महाराज यांच्यासोबत ऑगस्ट २०१५मध्ये भेट झाली. त्यावेळी लता यांनी महाराज यांना भारतातून आयात केलेल्या कपड्यांसाठी आयात आणि सीमाशुल्क भरण्यासाठी पैसे कमी पडत असल्याचे सांगितले. तसेच बंदरावर सामान उतरविण्यासाठी तब्बल ३.२२ कोटी रुपयांची गरज असल्याचेही खोटेच सांगितले. एवढेच नाही तर स्वत:चे म्हणणे सिद्ध करण्यासाठी लता यांनी खरेदी करार आणि ऑर्डर पावती दाखवली. परंतु, लता यांनी सादर केलेली सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे महाराज यांना समजले आणि त्यांनी लता यांच्याविरोधात खटला दाखल केला. त्यामुळे ज्या द. आफ्रिकेत महात्मा गांधींना भारतीय म्हणून इंग्रजांनी रेल्वेतून खाली ढकलून दिले, ज्या द. आफ्रिकेत गांधींनी वर्णभेदाविरोधी, अन्यायाविरोधात लढा पुकारला, आज त्याच आफ्रिकेत अन्याय केल्याप्रकरणी गांधीजींच्याच वंशजाला तुरुंगात जायची वेळ येणे, हे सर्वार्थाने खेदजनक आणि देशाची मान शरमेने खाली झुकवणारेच कृत्य म्हटले पाहिजे.
 
 

बंगालचे हतबल शेतकरी

 
 
भारतीय किसान मोर्चाचे राकेश टिकैत यांनी कालच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. दिल्लीत सुरू असलेल्या तथाकथित शेतकर्‍यांच्या आंदोलनाला दीदींनी पाठिंबा द्यावा म्हणून ही भेट असल्याचे समजते. तसेच या भेटीत टिकैत आणि त्यांच्या शिष्टमंडळाने ममतादीदींचे त्यांच्या बंगालमधील विजयाबद्दल अभिनंदन केले आणि शेतकर्‍यांच्या काही मागण्या दीदींपुढे मांडल्या. यामध्ये भाज्या, फळे यांनाही ‘एमएसपी’ लागू करावा आणि इतर काही मागण्यांचा समावेश आहे. एवढेच नाही तर दीदींनी शेतकर्‍यांसाठी असे काही बंगालमध्ये केल्यास ते नक्कीच एक आदर्शवत मॉडेल ठरेल वगैरे सांगून दीदींना हरभर्‍याच्या झाडावर चढविण्याचे उद्योगही या मंडळींनी केले. पण, यानिमित्ताने हाच प्रश्न उपस्थित होतो की, बंगालच्या शेतकर्‍यांविषयी, त्यांच्या प्रश्नांविषयी ही मंडळी नेमके जाणतात तरी किती? कारण, या शेतकरी नेते म्हणून मिरवणार्‍या मंडळींच्या मते, पंजाब-हरियाणाचे शेतकरीच हे खरंतर देशातले शेतकरी असे समीकरण. त्यामुळे ज्या समस्या, ज्या मागण्या पंजाबच्या शेतकर्‍यांच्या असतील, त्या बंगालच्या शेतकर्‍यांच्या असतीलच असे नाही. पण, मुळात या मंडळींना या सगळ्यात रस नाहीच मुळी. कारण, बंगालच्या निवडणुकीपूर्वी हेच टिकैत ममतांचा प्रचार करण्यासाठी नंदिग्राममध्ये दाखल झाले होते, जिथून ममता नंतर पराभूतही झाल्या. पण, ममता बॅनर्जी या मोदीविरोधाचा सध्या सर्वात मोठा चेहरा म्हणून नावारूपाला आल्याने ही मंडळी दिल्लीहून कोलकात्याला पोहोचली. पण, या मंडळींना ही कल्पनाच कदाचित नसावी की, ममतांच्या शासनकाळात बंगालचा जवळपास ९६ टक्के अल्पभूधारक शेतकरी विविध समस्यांमुळे आधीच पिचला आहे. त्यात देशात बंगाल हे एकमेव असे राज्य आहे, जिथे लाखो शेतकर्‍यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा कोट्यवधींचा लाभ अद्याप राज्य सरकारच्या अडेलतट्टू आणि राजकीय स्वार्थाच्या भूमिकेमुळे मिळू शकलेला नाही. त्यात अवकाळी पाऊस आणि ‘यास’ चक्रीवादळानेही बंगालच्या शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. परंतु, बंगालचा बळीराजा संकटात असतानाही दीदींना राजकारणापुढे काही दिसेनासेच झाले आहे. तेव्हा, टिकैत आणि मंडळींना देशातील शेतकर्‍यांचीच एवढीच चिंता असेल तर बंगालच्या शेतकर्‍यांचे प्रश्नही त्यांनी जाणून घ्यावेत आणि त्यांच्या लाडक्या दीदींकडून सोडवून घ्यावेत. बघा जमतंय का ते...
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@