तुझं अंगण, माझा मोर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2021   
Total Views |

Media_1  H x W:
 
 
चीन-पाकिस्तानचे सख्य म्हणजे स्वार्थी मैत्रीचा एक उत्तम नमुना. दोन्ही देशांमध्ये विविध मुद्द्यांवरून वेळोवेळी मतभेद झालेच तरी अखेरीस पाकिस्तानला आपली नाजूक आर्थिक स्थिती लक्षात घेता, नेहमी नमते घेऊन मुकाट्याने चीनची हांजी हांजीच करावीच लागते. पण, सध्या या दोन्ही देशांमध्ये एक सल मात्र कायम आहे, ती म्हणजे जागतिक माध्यमांकडून या दोन्ही देशांचा होणारा अपप्रचार. आता कर्माची फळं याच जन्मात भोगावी लागतात, त्याप्रमाणे जगभरात कोरोना पसरविण्याचे महापाप करणार्‍या चीनलाही त्याची आज ना उद्या किंमत ही चुकवावीच लागेल. पण, ‘मीडियावॉर’मध्ये पाकिस्तानपेक्षा १०० पावले पुढे असणार्‍या चीननेही आता कोरोनामुळे डागाळलेली स्वत:ची आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारण्यासाठी हातपाय मारण्यास सुरुवात केलेली दिसते. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या ‘पॉलिट ब्यूरो’च्या बैठकीत चीनची प्रतिमा जागतिक स्तरावर उजळवण्यासाठी सरकारला प्रयत्न करण्यासंबंधी स्पष्ट निर्देशही दिल्याचे समजते. दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हेही जागतिक माध्यमांमधील पाकिस्तानच्या आणि एकूणच त्यांच्या नकारात्मक चित्रणाविषयी प्रचंड नाराज आहेत. एकवेळ आपल्याच देशातील पत्रकारांवर हल्ला करून त्यांची तोंडं कायमची दाबताही येतात. पण, आंतरराष्ट्रीय माध्यमांची मुस्कटदाबी तर शक्य नाहीच. मग काय, एकूणच माध्यमांवरचा आपला रोष स्थानिक पाकिस्तानी माध्यमांवर व्यक्त करून ‘वड्याचं तेल वांग्यांवर’ काढण्यातच इमरान खान यांनी धन्यता मानली. तेव्हा, असे हे दोन्ही मित्रदेश या एका बाबतीत मात्र समदु:खी दिसतात. म्हणूनच, या दु:खावर आता कायमस्वरूपी फुंकर घालण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र येऊन कतारच्या ‘अल जजिरा’ आणि रशियाच्या ‘आरटी नेटवर्क’च्या धर्तीवर अशीच एक जागतिक माध्यम संस्था सुरू करण्याचा संकल्प केला आहे. परंतु, चीन आणि पाकिस्तानला वाटते तितके आजच्या जगात प्रतिमावर्धनाचे हे काम नक्कीच सोपे नाही.
 
 
 
आपल्याला आठवत असेलच की, पाकिस्तानने यापूर्वी असाच प्रयोग तुर्की आणि मलेशियाबरोबर करण्याचा घाट घातला होता. जगातील वाढत्या ‘इस्लामोफोबिया’ला प्रत्युत्तर देण्यासाठी अशा एका जागतिक माध्यमाची गरज इमरान खान यांना प्रकर्षाने जाणवली होती. कारण, तुर्की आणि मलेशियाला हाताशी घेऊन आपण जगातील मुस्लीम देशांचे नेतृत्व करू, अशी दिवास्वप्नं खान यांनी पडली होती. परंतु, अल्पावधीतच जागतिक मुस्लिमांचे नेतृत्व गेल्या कित्येक वर्षांपासून मिरवणार्‍या सौदीने डोळे वटारताच खान यांच्या दिवास्वप्नांचा दिवाच एकाएकी विझला. म्हणूनच, आता आपला कर्ताधर्ता चीनशी संधान साधून इमरान खान यांना माध्यमप्रसिद्धीची हौस भागवायची घाई झालेली दिसते. त्याचअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, हे ‘मीडिया हाऊस’ चीनच्या पैशांतून उभे राहील. पण, पाकिस्तानच्या जमिनीवर, म्हणजेच अंगण पाकिस्तानचे असले, तरी या अंगणात नाचणारा मोर मात्र चीनचा. या संयुक्त प्रकल्पाबाबत फारशी तपशीलवार माहिती उपलब्ध नसली, तरी पाकिस्तानच्या जमिनीवर सुरू होणार्‍या या ‘मीडिया हाऊस’मध्ये मोठी गुंतवणूक चीनची असेल, हे नक्की. त्यामुळे ‘मीडिया हाऊस’च्या नावाखाली ‘प्रप्रोगंडा पीआर’ करण्याचाच हा दुहेरी अजेंडा. खरंतर असा प्रयोग करून या दोन्ही देशांना वाटते तसे यांची जागतिक प्रतिमा चुटकीसरशी सुधारेल, असे अजिबात नाही. उलट चीन-पाकिस्तान पुरस्कृत या ‘मीडिया हाऊस’ला किती देश आपल्या भूमीत जागा देतील किंवा वार्तांकन करू देतील, ही शंकाच आहे. कारण, अशा या ‘मीडिया हाऊस’चा अजेंडा हा सर्वस्वी चीन-पाकला वाहिलेला असणार, हे वेगळे सांगायला नकोच. त्यातच आजच्या जगात मुख्य प्रवाहातील माध्यमांपेक्षाही समाजमाध्यमे ही जनमतनिर्मितीत मोलाची भूमिका बजावतात. पण, चीनच्या बाबतीत सांगायचे तर बहुसंख्य जागतिक समाजमाध्यमांना चीनमध्ये तर थाराच नाही. पाकिस्तानमध्ये तर मुख्य माध्यमांसह समाजमाध्यमांवरही लगाम कसण्याचे नापाक उद्योग सुरूच आहेत.
 
 
तेव्हा, आधीच या दोन देशांमधील अंतर्गत माध्यम स्वातंत्र्य धोक्यात असताना, त्यांना एकत्र येऊन ‘मीडिया हाऊस’ उभारण्याचे लागलेले हे डोहाळे फार काळ टिकतील याबाबत साशंकता आहेच. त्यामुळे चीन, पाकिस्तानने प्रतिमानिर्मितीवर असा अमाप पैसा आणि संसाधने खर्च करण्यापेक्षा, सर्व पातळ्यांवर आपली वर्तणूक सुधारल्यास जगाचे सोडा, किमान त्यांच्याच देशातील जनतेच्या मनात यांची प्रतिमा सुधारली तरी मिळवले!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@